महेश सरलष्कर
महाराष्ट्रातील जागावाटप तुलनेने सोपे, पण प. बंगालचा डावे-ममता तिढा आणि दिल्ली व पंजाबात ‘आप’ची अढी सोडवावी लागेल..

दिल्लीत ‘इंडिया’ची बैठक झाल्यापासून कटकथा (कॉन्स्पिरसी थिअरीज) रचल्या जात आहेत. इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात बैठकीआधी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे नाव घेतले जात होते. तीन दिवस ठाण मांडून बसलेल्या ममतांनीही नेत्यांच्या लॉबिइंगला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. मात्र बैठकीत अचानक ममता आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या दोन नेत्यांनी असे का केले असावे, या मुद्दयावर सध्या खल सुरू आहे. खरगेंच्या नावावर काँग्रेसने उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्थात त्यात फारसे नवल नाही. खरगे पक्षाध्यक्ष असले तरी त्यांच्याभोवती राहुल गांधींचे निष्ठावान आहेत. राहुल गांधींचे नाव पुढे करायचे असेल तर हे नेते उघडपणे प्रतिक्रिया देणार नाहीत हे ओघाने आलेच! पण, तीन आठवडय़ांपूर्वीच खरगेंच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशनावेळी, ‘खरगे योग्य वेळी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष झाले,’ असे म्हणत सोनिया गांधींनी जाहीरपणे खरगेंना पािठबा दिला. त्या कार्यक्रमामध्ये ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा, ‘द्रमुक’चे टी. आर. बालू या नेत्यांनीही खरगे हेच ‘इंडिया’चे पंतप्रधान पदाचे चेहरे होऊ शकतात, असे सूचित केले होते. त्यामुळे ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये खरगेंचे नाव सुचवले गेले तेव्हा खरे तर आश्चर्य वाटण्याजोगे काही नव्हते. तरीही कटकथा का फिरू लागल्या आहेत?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> आरोग्याचे डोही : विज्ञान – एक चळवळ

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनता दलाचे (सं) प्रमुख नितीशकुमार यांच्याशी संवाद साधल्यापासून ‘इंडिया’मध्ये काही तरी बिनसले असल्याची चर्चा केली जात आहे. त्याचा संबंध ममतांच्या प्रस्तावाशी जोडला जाऊ लागला आहे. खरगेंचे नाव घेतल्यामुळे नितीशकुमार नाराज असल्याचे बोलले जात आहे. एका कटकथेनुसार ममता आणि केजरीवाल भाजपच्या दबावाखाली काँग्रेसचा बळी देत असल्याचे सांगितले जाते. मोदींविरोधात खरगेंचा चेहरा असेल तर दक्षिण-उत्तर विभाजन होऊन भाजपला त्याचा उत्तरेत दणदणीत लाभ मिळेल असे मानले जात आहे. खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले की, नितीशकुमार पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून बाहेर होतील. मोदीविरोधात लढण्यासाठी हिंदी पट्टयातील नेता हवा, तो नितीशकुमारच असू शकतील, ही कटकथेतील उपकथा आहे. या कथा-उपकथेत आणखी एक पिल्लू ममतांनीच सोडून दिलेले आहे. वाराणसीमध्ये मोदींविरोधात प्रियंका गांधी-वाड्रा ‘इंडिया’कडून योग्य उमेदवार ठरू शकतील असाही मुद्दा ‘इंडिया’च्या बैठकीत उपस्थित झाला होता. ‘इंडिया’च्या बैठकीनंतर महाआघाडीतील नेत्यांनीच गोंधळ उडवून दिला आहे. त्यामुळे कथा-उपकथा रचल्या जात आहेत. पण, खरा मुद्दा जागावाटपाचा असून ‘इंडिया’मध्ये याच मुद्दयावरून गदारोळ चालू आहे.

दोन आठवडे लांबणीवर?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची आखणी झाली असून पक्षाने दोन दिवसांची राष्ट्रीय बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. ‘इंडिया’ला मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभव बाजूला ठेवून लोकसभा निवडणुकीचा विचार करावा लागणार आहे. घोडामैदान चार महिन्यांवर आल्यामुळे ‘इंडिया’च्या घटक पक्षांना एकत्रितपणे भाजपविरोधात रणनीती तयार करावी लागणार आहे. पण, जागावाटपाचा प्रश्न सुटल्याशिवाय ‘इंडिया’तील घटक पक्ष एकत्र येऊ शकणार नाहीत, त्यांचे मतभेद मिटवू शकणार नाहीत हे दिल्लीतील बैठकीनंतर स्पष्ट झालेले आहे. बैठकीमध्ये ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी जागावाटपाबाबत निर्वाणीचा इशारा दिलेला होता. ३१ डिसेंबपर्यंत जागावाटप झालेच पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. एका आठवडयामध्ये राज्या-राज्यांतील जागांबाबत सामंजस्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवडयापर्यंत जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : मोहिनी गिरी

काँग्रेसने ‘इंडिया’तील घटक पक्षांशी जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यांची समिती नियुक्त केलेली आहे. त्यामध्ये अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल हे कसलेले नेते आहेत. ही समिती प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांशी बोलून पक्षासाठी किती जागांवर दावा करायचा याचा अंदाज घेईल. या समितीची शनिवारी पहिली बैठक मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी झाली. प्रदेश काँग्रेसच्या चर्चेचा पहिला टप्पा पार पाडल्यानंतर ही समिती ‘इंडिया’तील घटक पक्षांशी जागावाटपासाठी वाटाघाटी करेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला तडजोड करावी लागेल. त्यासाठी प्रादेशिक पक्ष काँग्रेसवर दबाव आणू लागले असल्याचे दिसते.

‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये जागावाटप झाले की, भाजपविरोधात एकास एक उमेदवार किती मतदारसंघांमध्ये दिले जातील हे स्पष्ट होईल, त्यावर ‘इंडिया’ची ताकदही स्पष्ट होईल. दक्षिणेत तमिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेस यांची युती असून तिथे जागावाटपाचा प्रश्न फारसा गंभीर नाही. कर्नाटकात काँग्रेस थेट भाजपविरोधात लढेल. तेलंगणामध्ये तिहेरी लढत होणार असली तरी, काँग्रेससाठी जागावाटपाचा प्रश्न उद्भवत नाही. केरळमध्ये काँग्रेस व डाव्या पक्षांनी वेगवेगळे लढणे अपेक्षित आहे, तिथे भाजप प्रतिस्पर्धी नाही. आंध्र प्रदेशात काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि तेलुगु देसम अशी लढत होईल. पण इथे काँग्रेस-तेलुगु देसम यांच्यात आघाडीची चाचपणी होऊ शकते का, यावरच गणित अवलंबून असेल.

कशालाही अर्थ नसेल..

‘इंडिया’मध्ये जागावाटपाचा खरा प्रश्न महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये असेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये ३०-३५ जागांबाबत मतभेद नसल्याचे सांगितले जाते. उर्वरित जागांवर रस्सीखेच सुरू असून त्यावर मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो. काँग्रेसला दिल्ली आणि पंजाबमधील जागावाटपाचा पेच तातडीने सोडवावा लागेल. अन्यथा काँग्रेसला पुन्हा पंजाबवर पाणी सोडावे लागेल. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीवेळी झालेला घोळ काँग्रेस टाळू शकेल. पंजाबमध्ये सत्ता आपकडे असली तरी, तिथे काँग्रेस अजूनही मजबूत आहे. त्यामुळे काँग्रेसने सर्वच्या सर्व १३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर दिल्लीतही आप व काँग्रेस एकमेकांविरोधात लढतील, त्याचा फायदा भाजपला मिळू शकेल. दिल्लीत ‘आप’ने चार आणि काँग्रेसने तीन जागा वाटून घेतल्या तर, पंजाबमध्येही जागावाटपाचे सूत्र निश्चित करावे लागेल. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी दाखवलेला उद्दामपणा पंजाबमध्ये दाखवला तर गणित फिसकटू शकते.

‘इंडिया’साठी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनंतर महत्त्वाचे राज्य म्हणजे बिहार. इथे जनता दल (सं) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या वाटणीमध्ये काँग्रेसच्या पदरात पडलेल्या जागांची संख्या अल्पच असेल. पश्चिम बंगालमध्ये नवी उपकथा तयार होऊ लागल्याचे सांगितले जाते. इथे काँग्रेस व माकप यांची युती असून ‘माकप’ने तृणमूल काँग्रेसला सोबत घेऊन जागावाटपाचा प्रस्ताव फेटाळला आहे. डावे पक्ष व काँग्रेस आघाडीने एकत्रितपणे तृणमूल व भाजपविरोधात लढले पाहिजे, असा ‘माकप’चा आग्रह आहे. या युतीतून काँग्रेसने बाहेर पडून तृणमूल काँग्रेसशी जागावाटपाच्या वाटाघाटी केल्या तर, इथे नवे गणित मांडले जाईल. तसे झाले नाही तर, पश्चिम बंगालमध्ये तिहेरी लढत होईल. आता राहिला उत्तर प्रदेश. इथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची नाराजी दूर करून काँग्रेसला जागावाटप यशस्वी करावे लागणार आहे. ‘इंडिया’तील जागावाटपाची गुंतागुंत सोडवल्याशिवाय नेत्यांच्या संयुक्त सभा, किमान समान कार्यक्रम वा पंतप्रधान पदासाठी खरगेंचा पर्याय या कशालाही अर्थ नसेल.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने ‘इंडिया’तील खासदारांना निलंबित करून एकत्र येण्यासाठी चालना दिली आहे. जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनातही ‘इंडिया’तील घटक पक्षांचे नेते वा त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कटकथांच्या वावडया, नाराजीचे नाटय रंगवले जात असले तरी, ‘इंडिया’च्या बैठकीला मुंबईतील उपस्थित सगळेच नेते आले होते. त्यामुळे पुढील दोन आठवडय़ांच्या कालावधीत ‘इंडिया’च्या रणनीतीला रंगरूप मिळण्याची शक्यता आहे.

mahesh.sarlashkar@expressindia.com

Story img Loader