दंगल नियोजित असो वा उत्स्फूर्त – तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न विस्कटायच्या दिशेने आपला प्रवास जोमाने सुरू आहे. दुर्दैवाने आपणच त्याचे वाटेकरी आहोत आणि शिकारदेखील!
चित्रपटाचं निमित्त होऊन आणि इतिहासातली मढी उकरून मागील आठवड्यात नागपूरमध्ये दंगल झाली. एखाद्या क्षुल्लक कारणाचे पर्यावसान धार्मिक सलोखा बिघडण्यामध्ये होणे हे नित्याचे झाले आहे. एका संस्थेच्या अहवालानुसार भारतामध्ये २०२४ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दंगलींचे प्रमाण ८४ टक्क्यांनी वाढले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त दंगलीच्या संख्येसह उत्तर प्रदेशला मागे टाकून शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणारा पुरोगामी महाराष्ट्र आता धार्मिक ध्रुवीकरणाचे केंद्रस्थान होऊ लागला आहे. आपल्या अस्मिता वेशीला टांगण्याच्या या वृत्तीचा आढावा घेताना असे लक्षात येईल की अलीकडच्या काळातील दंगलीच्या कारणांचा शोध घेताना समाजमाध्यमांची भूमिका निर्णायक ठरली आहे. जागतिकीकरण म्हणजे स्थानिक घटनांचा जागतिक पटलावर सहजतेने उमटणारा प्रतिध्वनी! मात्र समाजाकडे पाहताना आपण अस्मितांचे आणि ध्रुवीकरणाचे ‘जागतिकीकरण’ करून घेतले आहे. ज्या प्रकारे पूर्वापार अस्तित्वात असणाऱ्या जागतिकीकरणाला तांत्रिक प्रगतीमुळे वेग मिळाला त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पूर्वापार चालणाऱ्या जातीय हिंसेला आणि द्वेषाला समाजात पसरण्यास वेग मिळाला आहे.

दंगलींचे बदलते स्वरूप

दंगलींच्या जागतिकीकरणावर विचार करताना असे लक्षात येईल की आधी ज्या भागात घटना घडली तिथेच त्याचे पडसाद सुरुवातीला दिसून यायचे आणि नंतर ती इतरत्र पसरायची. बऱ्याचदा दंगलींचा प्रसार मोठ्या शहरांपुरताच मर्यादित होता. गांधी हत्येनंतरची ब्राह्मणविरोधी दंगल, बाबरी पतनानंतरची हिंसा असो वा गोध्रा! ही सर्व उदाहरणे वरील वैशिष्ट्ये दाखवतात. मात्र २०१० नंतरच्या दंगलींचा विचार करता आपल्या असे लक्षात येईल की घटना एके ठिकाणी घडते आणि त्याचे परिणाम दुसरीकडे उमटतात. चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला, औरंगजेबाची कबर मराठवाड्यात तर दंगल नागपुरात! माहितीच्या जलद वहनामुळे हिंसक घटना विखुरलेल्या दिसतील. २०२३ मध्ये हरियाणामधील नुह जिल्ह्यात हिंदू व्यक्तीला मुस्लीम जमाव मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि दंगल भडकली. नंतर झालेल्या तपासात उघड झाले की तो व्हिडीओ भारतातील नसून सीरियामधील होता. २०१३ च्या मुझफ्फरनगरच्या दंगलीत असे आढळून आले की भावना भडकवणारा व्हिडीओ पाकिस्तानचा असून स्थानिक असल्याचे भासवले गेले. २०२० ची ५३ जणांचे बळी घेणारी दिल्ली दंगल समाजमाध्यमांचा उपयोग करून नियोजन केलेल्या हिंसाचाराचा उत्कृष्ट नमुना होती. अनेक राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी सुनियोजित दंगलीसाठी व्हाट्सअॅप ग्रुपचा वापर केला. नुकत्याच झालेल्या नागपूरच्या घटनेत तपासकर्त्यांना ९७ खोट्या पोस्ट विविध समाजमाध्यमांवर आढळून आल्या. भडकणाऱ्या दंगलीसाठी घोषणा आणि तलवारींची जागा आता समाजमाध्यमांवरील व्हिडीओ आणि अल्गोरिदमने घेतली आहे.

दंगल आणि तंत्रज्ञान

तंत्रज्ञानामुळे सुलभ झालेले स्थलांतर आणि बेसुमार वाढलेली शहरे हे दंगलींचे एक महत्त्वाचे कारण दिसून येईल. ऐतिहासिक शहरांमध्ये शांततापूर्ण सहजीवनाची परंपरा घट्ट रोवली होती आणि मिश्र लोकसंख्येला एकमेकांच्या जीवनशैलीचा परिचय असल्यामुळे सहसा या शहरांमध्ये दंगे होत नसत. मात्र स्थलांतरामुळे ही सामाजिक वीण उसविली गेली. मिश्र संस्कृतीशी अपरिचित समाज आणि शहराच्या वारशाशी नसलेल्या भावनिक नात्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाची बीजे स्थलांतराबरोबर पसरली गेली आणि वाढत्या शहरीकरणासोबत दंगलींना सुगीचे दिवस आले. पुढे जाऊन उपलब्ध स्राोतांवर हक्क बजावण्यासाठी सुरू झालेली स्पर्धा राजकीय गटांनी धार्मिक अंगाने संघटित करण्यास सुरुवात केली. सध्याच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमांबरोबरच, क्रिप्टोचलनासारख्या तंत्रज्ञानामुळे धार्मिक सलोखा बिघडविण्यास आर्थिक मदत गुप्तपणे करणे सुलभ झाले. आधी एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणचे लेबल लावून भावना भडकविण्यासाठी वापरला जायचा. आता मात्र डीपफेक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारामुळे दुर्हेतूक माहिती उत्पादित करणे अधिक सोपे झाले आहे. सामान्य माणसाला सत्याचे स्पष्ट आकलन होत नाही, तो भ्रमित होऊन एखाद्या कलहात विवेक बाजूला ठेवतो. तसेच आपण मागे पडू या भीतीमुळे (फोमो) झुंडीला शरण जातो. त्याची ही मानसिकता वाढीस लागली आहे. ध्रुवीकरणाच्या युगात उपद्रवी घटकांना शिक्षा न होता त्यांचे राज्यकर्त्यांकडून होणारे उदात्तीकरण, मंत्र्यांसारख्या जबाबदार घटकांकडून केली जाणारी प्रक्षोभक विधाने, त्याकडे राज्यसंस्थेकडून केले जाणारे दुर्लक्ष आणि समाजमाध्यमांवरील विकृत गौरवीकरण यामुळे कायद्याची भीड चेपली गेली. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचे सत्कार, पुण्यातील झुंडबळीच्या आरोपीचे समाजात उजळ माथ्याने वावरणे, स्थानिक गुंडगिरीचे धर्माच्या आधारावर होणारे वर्गीकरण आणि त्याला समाजमाध्यमांवर मिळणारा हिडीस पाठिंबा हे सर्व तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर सामाईक मती कुंठित झाल्याचे दर्शविणारी उदाहरणे आहेत.

माहितीचे मायाजाल

फेसबुक, एक्स या कंपन्यांची या सामाजिक घुसळणीत काय भूमिका असेल? एकीकडे तपासात दंगल भडकाविणाऱ्या चित्रफिती खोट्या असल्याचे सिद्ध होत असताना ती माहिती आधीच फेसबुकच्या सर्व्हरवर असेल तर ती प्रसारित होण्याआधीच त्याला प्रतिबंध का केला जात नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधताना असे लक्षात आले की, दैनिक गार्डियनच्या अहवालानुसार २०२० मध्ये दिल्ली निवडणुकीच्या आधी जातीय विखार पसरविणारी बनावट खाती बंद करण्याचे फेसबुकचे नियोजन होते, मात्र बहुतांश खाती केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी निगडित असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना या धोरणास मुरड घालावी लागली. अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त वापरकर्ते आणि २० हजार कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या या देशात सत्ताधाऱ्यांशी वाकडे घेणे हे फेसबुकला जड गेले असावे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार दिल्ली दंगलीच्या आधी बहुतांश द्वेषमूलक मजकूर हिंदी, बंगाली अशा स्थानिक भाषांमध्ये निर्मित झाला होता. स्थानिक भाषांच्या मजकुराचे विश्लेषण करण्याचे कौशल्य २०२० मध्ये फेसबुकने विकसित केले नव्हते. मात्र सर्वाधिक गंभीर आहे ते सामान्य माणूस या सर्व प्रचाराचा बळी कोणत्या प्रकारे पडतो ते! न्यूयॉर्क टाइम्सने २०१९ मध्ये एक प्रायोगिक खाते केरळस्थित रहिवासी असल्याचे भासवून बनविले आणि त्या खात्याला फेसबुककडून मिळणाऱ्या सर्व शिफारशींचा सरसकट स्वीकार केला. सर्व पेजेस फॉलो केले, विविध ग्रुप जॉइन केले. तीन आठवड्यांत संशोधकांना त्यांचे खाते द्वेषपूर्ण मजकूर आणि चित्रफिती, दुर्हेतुक माहिती आणि जातीय हिंसेसाठी उद्याुक्त करणाऱ्या सामग्रीने भरलेले आढळले. एका सामान्य, निष्पाप व्यक्तीचे माहितीजालात अडकल्यानंतर होणारे अध:पतन या प्रयोगाने दाखवले.

आजच्या डिजिटल युगाने मानवी भावनांना शस्त्र बनविले आहे. समाजमाध्यमे हिंसाचार पोसण्यासाठी परिसंस्था म्हणून काम करत आहेत. जिथे हिंसक विचार विशिष्टपणे वापरकर्त्यापर्यंत पोहोचविण्यापासून त्याच्या कृती नियंत्रित करण्यापर्यंत या माध्यमांचा आवाका आहे. वाढत्या स्क्रीन टाइमबरोबर लोक भोवतालचे वास्तव सोडून डिजिटल/ आभासी जगाला वास्तव मानून त्यानुसार आपले आचार-विचार बनवत आहेत. या माध्यमांवर संयमापेक्षा सणसणीत बातम्यांना हवा मिळते आणि जास्तीत जास्त प्रकाशझोतात येण्याच्या स्पर्धेत आपले अल्गोरिदम एकीकडे विखारी बनत आहेत, तर दुसरीकडे लोक विखारी सामग्री बनवून अपलोड करत आहेत. हे मानसिक परावलंबन व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुपमार्फत झुंडीमध्ये परावर्तित होऊन या विखारास व्यक्त होण्यासाठी मूर्त स्वरूप मिळत आहे. २०२३ च्या पुसेसावळी दंगलीत संशयित म्हणून पकडला गेलेल्या मुझम्मिल बागवान याचे एक वाक्य फारच बोलके आहे- ‘भारतामध्ये कायद्याने तुम्ही दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष आहात. मात्र जर मुस्लीम असाल तर समाजाच्या नजरेत निर्दोष सिद्ध असेपर्यंत दोषी आहात.’ एकूणच ‘सदसद्विवेकबुद्धी’ जो मानवी अस्तित्वाचा पाया आहे त्याचा ऱ्हास होऊन व्यवहारज्ञान म्हणजे ‘सतर्कता’ (व्हिजिलॅण्टिझम) आणि धार्मिक शत्रुत्व म्हणजे ‘देशभक्ती’ या नव्या व्याख्या उदयास येत आहेत.

नागपूरची दंगल पांगली, निर्बंध उठले. मात्र पिढ्यांची मिळकत असलेला जातीय सलोखा मात्र पोरका झाला. या प्रत्येक दंग्याबरोबर, वैविध्यपूर्ण, धर्मनिरपेक्ष भारताचे स्वप्न पाहिलेल्या संविधानाला मात्र हताश होऊन उमाळे दाटत असतील. दंगल नियोजित असो वा उत्स्फूर्त- तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर ते स्वप्न विस्कटायच्या दिशेने आपला प्रवास जोमाने सुरू आहे. दुर्दैवाने आपणच त्याचे वाटेकरी आहोत आणि शिकारदेखील! आगामी काळात धार्मिक दंगे संगणकाच्या काही क्लिक्सच्या अंतरावर आहेत. गरजेची आहे ती त्यांना रोखण्याची सत्तेतील ‘श्रीं’ची इच्छा! अन्यथा ‘दंगल दंगल बात चली हैं, पता चला है!’ हे राज्यशकटाचे गाणे व्हायला वेळ लागणार नाही.

phanasepankaj@gmail.comतंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक