रवींद्र माधव साठे

आध्यात्मिकता हे आपल्या विचारविश्वाचे एक मूलद्रव्य आहे. त्याची वर्तमानाशी सांगड घालत वाटचाल करणे गरजेचे आहे..

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

कोणत्याही राष्ट्रातील नागरिकांची स्वाभाविक इच्छा असते की, आपले राष्ट्र विश्वभरात सर्वात शक्तिशाली झाले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा एक प्रभावशाली गुण असतो. व्यवस्थापनशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाले तर प्रत्येकाचा एक यूएसपी असतो ज्याच्या आधारे व्यक्ती आपला विकास करते. राष्ट्राचाही यूएसपी असतो व तो ओळखून ते राष्ट्र आपली प्रगती करते.

जगात अशी किती तरी उदाहरणे आहेत की सुस्थितीतील राष्ट्रांची विपरीत परिस्थितीत पीछेहाट झाली. पोलंडचा इतिहास बघितला तर त्याचे अनेक वेळा विभाजन झाले. दोन्ही महायुद्धांत जर्मनी पराभूत झाला. इस्रायलचे नागरिक १८०० वर्षे आपल्या मातृभूमीत पाऊल ठेवू शकले नाहीत. तीनही राष्ट्रे पुन्हा प्रगती करू शकतील असे वाटले नव्हते. परंतु ही तीनही राष्ट्रे पुन्हा उभी राहिली कारण त्यांची पीछेहाट ही परिस्थितीजन्य होती, त्यांच्यात क्षमता असून विपरीत परिस्थितीमुळे ते मागे पडले. जगाच्या तुलनेत भारत मागे का पडला याची कारणमीमांसा अनेकदा केली जाते. या देशाचा इतिहास ज्यांनी वाचला असेल त्यांना हे तथ्य समजेल की स्वातंत्र्यापूर्वीचा सुमारे १२०० वर्षांचा आपला इतिहास असामान्य आहे. हा दीर्घ कालखंड विपरीत परिस्थितीचा राहिला.

युद्धकाळात राष्ट्र प्रगती करू शकत नाही ही सर्वमान्य गोष्ट आहे. इथेही या काळात समाजात जातिभेद निर्माण झाले. अस्पृश्यता आली, भाषासंघर्ष, संकीर्ण पंथभेद आले, विकृती आल्या. एके काळी आपल्या इथे कालानुरूप स्मृती निर्माण होत होत्या, परंतु नवव्या शतकानंतर त्यात खंड पडला. आंतरिक क्षमता असूनही परिस्थितीजन्यतेमुळे भारताचा विकास होऊ शकला नाही. स्वातंत्र्यानंतर येथील राज्यकर्त्यांनी भारतीय विचारविश्वाकडे काहीसे दुर्लक्ष केले. आपले ‘स्व’ (यूएसपी) आपण विसरलो. विकासाच्या विदेशी मॉडेलच्या मागे लागलो.

उपनिषदकाळापासून असलेले चिरपुरातनत्व व नित्यनूतनत्व थेट विवेकानंद, गांधी, डॉ. आंबेडकर, सावरकर, डॉ. लोहिया यांनी मांडले. त्यामुळे भारतीय विचारविश्व आपण समजून घेतले पाहिजे कारण तोच आपल्या राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा मुख्य आधार आहे.

भारतीय भावविश्व सकारात्मक व सर्वसमावेशक आहे. विदेशात प्रोटेस्टंट चळवळ उभी राहिली. प्रोटेस्टंट या शब्दातच नकारात्मकता आहे. कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट मंडळी परस्परांविरोधात उभी राहिली. युरोपातील बहुतेक राष्ट्रे प्रतिक्रियात्मक स्वरूपात निर्माण झाली. युद्धातून राष्ट्रे उभी राहिली. जगातील राष्ट्रे भौतिकदृष्टय़ा समृद्ध झाली तरी तिथे नागरिकांना मनाची शांती मिळाली नाही.

रशियाचे हुकूमशहा स्टॅलिन यांची कन्या श्वेतलाना १९६७ मध्ये एकदा भारतात आली होती. पत्रकारांनी तिला येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा ती उत्तरली की, ‘येथील पवित्र गंगा नदीच्या किनारी एक कुटी बांधून जीवनाचा अंतिम काळ इथे व्यतीत करावा अशी माझी इच्छा आहे.’ प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांचा नातू एकदा भारतात आला होता. त्याची ही भेट ‘हरे राम हरे कृष्ण’च्या माध्यमातून होती. पत्रकारांनी त्याला विचारले की, ‘एवढी प्रचंड धनसंपत्ती असताना तू हरे राम हरे कृष्णच्या चळवळीत का सहभागी झालास?’  त्यावर त्याने उत्तर दिले की, ‘भारतात येऊनच मला शांती मिळते, संपत्ती आहे ती भगवान श्रीकृष्णाची!’  हेन्री फोर्डच्या नातवाला आणि श्वेतलानाला असे का वाटले, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रकारच्या भावना त्यांच्यात कशा निर्माण होतात? कारण केवळ अर्थ आणि काम यातून मनुष्य सुखी होऊ शकत नाही. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे अर्थ व काम याचा अभाव नसावा आणि प्रभावही नसावा. तरच मनुष्य सुखी होतो आणि ते सुख अखंड आणि चिरंतन असते. द्रष्टय़ांनी यास मोक्ष असे म्हटले आहे. या मोक्षप्राप्तीसाठी मनुष्याने आपली रुची, प्रतिभा, प्रकृती, परिस्थिती, आपापला मानसिक, शारीरिक, बौद्धिक व आध्यात्मिक स्तर या सर्वाचा विचार करून मार्गधारणा निश्चित केली पाहिजे.

आपल्या द्रष्टय़ांनी विचार केला होता की बाह्य परिस्थिती आणि मन या दोहोंना महत्त्व आहे. दोघेही परस्परांवर प्रभाव टाकतात, परंतु मनुष्याचे मन ही सर्वाधिक मौलिक गोष्ट आहे. कारण परमेश्वराने केवळ मनुष्याच्या मनास इच्छाशक्ती प्रदान केली आहे आणि म्हणून जोपर्यंत त्यावर संस्कार होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ समाजरचना होऊ शकणार नाही.

विदेशातील दृष्टिकोन आणि आपली विचारपद्धती यांत मूलभूत अंतर आहे.  नेपोलियन जेव्हा आदर्शवाद विसरून पद आणि स्थानाच्या मागे लागला तेव्हा त्याच्या विचारांत परिवर्तन झाले. यावर त्याचे प्रसिद्ध वाक्य असे की, ‘मेन आर लाइक फिगर्स, दे आर व्हॅल्यूड अकॉर्डिग टू दि पोझिशन दे ऑक्युपाय’. व्यक्ती उच्च पदावर गेली की त्याचे ‘मोठेपण’ वाढते, परंतु आपल्याकडे याच्या उलट सांगितले आहे. ‘प्रासाद शिखरास्थोऽपि काको ना गरुडायते’. गरुड जमिनीवर किंवा झाडावर बसला आणि कावळा राजप्रासादाच्या शिखरावर जाऊन बसला तरी कावळा गरुड होणार नाही. त्यामुळे आपली अशी धारणा राहिली आहे की केवळ पद आणि त्याचे स्थान याच्या आधारावर मनुष्याचे मोठेपण ठरत नाही, ते एक अंतर्गत मूल्य आहे. व्यक्तीची आंतरिक योग्यता, व्यक्तीचे कार्य, विचार आणि व्यवहार हा त्याचा मापदंड आहे. भारताचे राष्ट्रजीवन वैशिष्टय़पूर्ण आहे. ते शासनावलंबी व शासनकेंद्रित नाही. इथे स्वायत्त रचनेस प्राधान्य मिळत गेले. शासन कोणाचेही राहो, समाजजीवन सुरू राहिले. हिंदूस्थानच्या बाहेर असे मानले जाते की शासन साध्य आहे आणि समाज साधन आहे, पण आपण असे मानतो की समाज साध्य आहे आणि शासन एक महत्त्वाचे साधन आहे.

आध्यात्मिकता हे येथील विचारविश्वाचे एक मूलद्रव्य आहे. स्वामी विवेकानंदांना आद्य शंकराचार्यानी रचलेले निर्वाण-षटक प्रिय होते. त्यातील ‘अहं निर्विकल्पो निराकार रूपा:.. चिदानंद रूप: शिवोऽह शिवोऽहं।’ हे कडवे अधिक महत्त्वाचे वाटले. ज्याचे मन विकल्परहित झाले तो खऱ्या समतेचा व्यवहार करू लागतो. तो अंतर्बाह्य आध्यात्मिक आहे तोच सर्वभूतहितरत बनतो. डॉ. लोहिया यांनी ‘मार्क्‍स, गांधी आणि सोशियालिजम’ या पुस्तकात पृष्ठ ४० वर ‘दि मीनिंग ऑफ इक्वॅलिटी’ हा लेख लिहिला आहे व त्यात आध्यात्मिक वृत्तीचा गौरव केला आहे. विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञान हे तर महत्त्वाचेच पण त्यास अध्यात्माची जोड हवी. म्हणून स्वामी विवेकानंदांनी समाजवादाला अध्यात्माचे अधिष्ठान हवे असे म्हटले. शरीरापेक्षा आत्मा महत्त्वाचा असून मानवास ईश्वर माना कारण आत्मा हा परमात्म्याचे रूप आहे, असे स्वामीजींनी सांगून हे अध्यात्म व्यवहारात उतरविण्याचे सर्वाना आवाहन केले. माणूस केवळ भाकरीसाठी जगत नाही तर ‘मॅन लिव्हज बाय दि वर्ड ऑफ गॉड’ असे आपण म्हणतो. माणसामाणसांत देवत्व आहे, असे आपले तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळे अध्यात्म म्हणजे समाजापासून वेगळे राहून विरक्त जीवन जगणे नव्हे.

आपल्या देशातील विचारप्रणाली मनुष्याच्या मनावरील संस्कारांना मानते. सर्व चराचर, अस्तित्व एक आहे आणि आम्ही त्याचे अंश आहोत; हा अंगांगीभाव आपले जीवनमूल्य असल्यामुळे मनुष्याचे मन अहंकाराच्या वर उठू शकले, हा आपला विश्वास आहे. प्रत्येक माणूस स्वार्थी असतो, परंतु मनुष्यावर संस्कार होऊ शकतात आणि हळूहळू समाजाचे तो देणे लागतो हा भाव निर्माण करून इतरांसाठी तो झिजला तो माणूस ही शिकवण चैतन्य प्रभू, नारायण गुरू, तुकाराम महाराज व सर्व सत्पुरुषांनी दिली. व्यक्ती आणि समाज यांचे जैविक नाते आहे. इथे आपण ‘माइंड-बॉडी डायकॉटॉमी’ मानली नाही तर मनुष्याचे अंतरंग व बहिरंग यांचे परस्पर नाते असून मन शुद्ध असले तर तनाकडून चांगला व्यवहार होतो. त्यामुळे इथे आपण संस्थात्मक परिवर्तनापेक्षा मानसिक परिवर्तनास महत्त्व दिले आहे. व्यक्ती आणि समष्टीचे जैविक, भावनिक व आंतरिक नाते मानले आहे. ‘हा’ किंवा ‘तो’ असा विचार न करता ‘हा’ आणि ‘तो’ असे आपण म्हणतो.

आपल्या विचारविश्वाचा आणखी एक पैलू म्हणजे ‘समग्रता’. कोणत्याही गोष्टीचा समग्रतेने विचार करणे हे आपले एक वैशिष्टय़. आज आपण पाहतो की अमेरिकेत ‘ग्रीन पार्टी’ स्थापन झाली आहे. त्यांचा मुख्य भर आहे तो, ‘फोर पी’वर- पर्सन, पीपल, प्लॅनेट, पीस. पं. दीनदयाळजींनी एकात्म मानवदर्शनात हेच तर सांगितले होते. आज विश्वसुद्धा शांतता, हवामान बदल अशी भाषा करत आहे. निसर्गाचे, साधनसंपत्तीचे शोषण नव्हे तर दोहन करावे असे आपले तत्त्वज्ञान. कारण आपण सर्व समाजाचा, चराचराचा एकात्म विचार करतो. संक्षेपात काय तर आपले विचारसंचित व आपली अंतर्गत मूल्ये यांचा आपण योग्य तो उपयोग करून घेतला नाही म्हणून भारताचा अपेक्षित विकास झाला नाही. परंतु आपण असा कधीच दावा केला नाही की पुरातन ते सर्व चांगले व अर्वाचीन ते अस्वीकारार्ह.

आपल्या देशात प्राचीन काळापासून जे विचारधन उपलब्ध आहे, ते वर्तमानकाळाशी जुळवून घ्यायचे आणि अर्वाचीन काळात विदेशातून जे विचार व्यक्त केले गेले आहेत ते भारताच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे हे सूत्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडले. त्यांच्या या सूत्राचाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अवलंब करीत आहेत. म्हणूनच एक नवा भारत हळूहळू आकार घेत आहे.  राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रवादाचा सामाजिक आशय या विषयांवरील हे अंतिम सदर लिहिताना मनापासून समाधान मिळत आहे.

(समाप्त)

लेखक ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’चे सचिव आहेत.

ravisathe64@gmail.com