‘‘बटाट्याचे चिप्स काय किंवा सेमीकंडक्टर चिप काय, दोघांत असा काय मोठा फरक आहे?’’ (पोटॅटो चिप्स ऑर सेमीकंडक्टर चिप्स, व्हॉटस् द डिफरन्स?) – जपानी कंपन्यांशी सुरू असलेल्या स्पर्धेत पिळवटून निघत असताना जेव्हा अमेरिकी चिप कंपन्या, त्यांनी स्थापन केलेल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन (एसआयए) या दबावगटातर्फे अमेरिकी शासनाने चिप उद्याोगाला धोरणात्मक स्तरावर महत्त्व द्यावं म्हणून जोमानं प्रयत्न करत होत्या, त्या वेळी एका सरकारी अर्थतज्ज्ञानं हे वादग्रस्त विधान केलं होतं. जपानी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, वरकरणी हास्यास्पद वाटणाऱ्या या विधानाचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मथितार्थ स्पष्ट होता. जर जपानी कंपन्या कमी किमतीत त्याच दर्जाच्या किंवा त्याच किमतीत श्रेष्ठ दर्जाच्या ‘चिप्स’चं उत्पादन करू शकत असतील- मग त्या बटाट्याच्या असोत किंवा सेमीकंडक्टर- तर अमेरिकी ग्राहकांनी जपानी कंपन्यांकडून चिप खरेदी करण्यात व्यावसायिकदृष्ट्या काहीच चुकीचं नव्हतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरचं विधान तर्काला धरून आहे किंवा नाही यावर पुष्कळ मतमतांतरं असू शकतील. पण अमेरिकेमध्ये त्याच दरम्यान एका व्यावसायिकानं त्या अर्थतज्ज्ञाचं हे विधान शब्दश: खरं करून दाखवलं. त्या व्यावसायिकाचं नाव जॅक सिम्प्लॉट व त्याने गुंतवणूक केलेल्या चिप उत्पादक कंपनीचं नाव होतं ‘मायक्रॉन’! एकोणीसशे ऐंशीच्या दशकात निराशेच्या गर्तेत सापडलेल्या अमेरिकी चिप उद्याोगाला उभारी देण्याचं काम केलेल्या आणि जपानच्या नाकावर टिच्चून डीरॅम मेमरी चिपनिर्मिती व्यवसायात यशस्वी होऊन दाखवलेल्या या कंपनीची आणि मूलत: बटाट्याचे चिप्स बनविण्याच्या उद्याोगात असूनही; अमेरिकेतला डीरॅम चिप उद्याोग मरणपंथाला लागला असूनही मायक्रॉनच्या धोरणांवर विश्वास ठेवून त्यात गुंतवणूक करण्याचं धाडस दाखवणाऱ्या जॅक सिम्प्लॉटची कहाणी निव्वळ विलक्षण आहे.

मायक्रॉनची स्थापना सिम्प्लॉटनं त्यात गुंतवणूक करण्याच्या काही वर्षे आधीच जो आणि वॉर्ड पार्किन्सन या जुळ्या बंधूंनी अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेल्या आयडाहो या त्यांच्या मातृराज्यात १९७८ साली केली. सुरुवातीपासूनच कंपनीने आपलं सर्व लक्ष हे डीरॅम मेमरी चिपनिर्मिती उद्याोगावर केंद्रित केलं होतं. वास्तविक तो कालखंड हा कोणत्याही अमेरिकी सेमीकंडक्टर कंपनीनं मेमरी चिप उद्याोगात बस्तान बसवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल होता. तोशिबा, फुजित्सु, हिताची सारख्या जपानी चिपनिर्मिती कंपन्यांनी अत्यंत कार्यक्षम तरीही किफायतशीर अशा डीरॅम चिप्सची निर्मिती करून मेमरी चिपक्षेत्रात अमेरिकी कंपन्यांना जेरीस आणलं होतं. त्यामुळेच इंटेल, नॅशनल सेमीकंडक्टर, एएमडीसारख्या आघाडीच्या अमेरिकी चिपकंपन्या मेमरी चिपक्षेत्रातून आपला गाशा गुंडाळण्याच्या बेतात होत्या.

अशा विपरीत परिस्थितीतही मायक्रॉनच्या संस्थापकांनी डीरॅम चिपनिर्मिती उद्याोगात शिरण्याचा आपला इरादा जराही बदलला नाही. मायक्रॉनच्या संस्थापकांपैकी एक, वॉर्ड पार्किन्सन हा कंपनी स्थापन करण्याआधी ‘मॉस्टेक’ या एकेकाळच्या बलाढ्य अमेरिकी मेमरी चिपनिर्मिती कंपनीत चिप संरचनेवर काम करत असे. आपल्या या अनुभवाचा तसेच मॉस्टेकमधल्या वरिष्ठांच्या ओळखीचा फायदा घेत त्यानं मायक्रॉनसाठी पहिलं डीरॅम चिप उत्पादनाचं कंत्राट मॉस्टेककडून मिळवलं. पण जपानी कंपन्यांच्या रेट्यासमोर जिथे भल्याभल्यांची गाळण उडत होती तिथे मायक्रॉनसारख्या नवख्या कंपनीचा कितपत टिकाव लागला असता? आणि झालंही तसंच! मॉस्टेकनंतर मायक्रॉनला पुढे एकही नवं कंत्राट मिळत नव्हतं आणि त्यानंतर थोड्याच अवधीत, मायक्रॉनचा एकमेव ग्राहक असलेल्या मॉस्टेकलाच घरघर लागली. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मायक्रॉन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. तिच्या अस्तित्वावरतीच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

दुसऱ्या बाजूला जॅक सिम्प्लॉट या व्यक्तीचा भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स किंवा सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यापैकी कशाशीच दूरान्वयानंदेखील कोणताही संबंध नव्हता. तो आयडाहो राज्यात प्रामुख्याने बटाट्याची शेती करणारा एक सधन शेतकरी. लहानपणापासूनच चिकित्सक आणि चळवळ्या स्वभावाचा असल्याने तो केवळ बटाट्याची शेती करून शांत बसणं शक्यच नव्हतं. अमेरिकेत शीघ्रान्न (फास्ट फूड) संस्कृती फोफावल्यापासून बर्गर, पोटॅटो वेजेस, फ्रेंच फ्राईज अशा पदार्थांची मागणी पुष्कळ प्रमाणात वाढली होती. सिम्प्लॉटनं या परिस्थितीचा फायदा उचलत फ्रेंच फ्राईजसाठी वापरता येतील अशा प्रतींच्या बटाट्यांची शेती करायला घेतली. सिम्प्लॉट एवढ्यावरच थांबला नाही. पुढं जाऊन त्यानं सालं काढलेल्या बटाट्यांचं वर्गीकरण करून त्यानंतर त्यांचं प्रथम निर्जलीकरण आणि पुढे त्यांना गोठवण्याचं यंत्र विकसित केलं. अशा प्रक्रिया केलेल्या बटाट्यांमधून फ्रेंच फ्राईज तयार करणं शीघ्रान्न विकणाऱ्या साखळ्यांना (फास्ट फूड चेन) अत्यंत सोयीचं ठरत असल्याने सिम्प्लॉटकडे ग्राहकांची रीघ लागायला लागली. एक वेळ अशी होती की मॅकडोनाल्डच्या अमेरिकाभरातील उपाहारगृहांमध्ये फ्रेंच फ्राईज बनविण्यासाठी लागणाऱ्या बटाट्यांचा निम्मा पुरवठा एकटा सिम्प्लॉट करत असे. १९८० पर्यंत तो आयडाहोमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनला.

या पार्श्वभूमीवर सेमीकंडक्टर तंत्रज्ञानासारख्या हाय-टेक उद्याोगात सिम्प्लॉटसारख्या व्यक्तीनं शिरकाव करण्याचं तसं काहीच प्रयोजन नव्हतं. पण ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मायक्रॉन आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत होती तेव्हा पार्किन्सन बंधूंना एका समर्थ गुंतवणूकदाराची आत्यंतिक गरज होती. आयडाहो राज्य हे काही कॅलिफोर्नियाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक किंवा चिप तंत्रज्ञानासाठी ओळखलं जात नव्हतं. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाचं सामर्थ्य ओळखून भविष्यवेध घेऊ शकेल असा गुंतवणूकदार आयडाहोमध्ये मिळणं जवळपास अशक्य होतं. आपल्या काही वैयक्तिक स्तरावरील ओळखींचा वापर करून पार्किन्सन बंधूंनी काही प्राथमिक निधी (सीड फंडिंग) जमवला होता. मॉस्टेकच्या दिवाळखोरीनंतर मायक्रॉननं तिच्या हाती असलेलं एकुलतं एक कंत्राटही गमावल्यामुळे या निधीच्या मदतीनं जेमतेम काही महिनेच कंपनीचा टिकाव लागला असता.

अशा विपरीत परिस्थितीतही दोन गोष्टींच्या बाबतीत मात्र पार्किन्सन बंधू ठाम होते. एक म्हणजे काही ठोस हाती जरी हाती नसलं तरी त्यांना कंपनी बंद करायची नव्हती. उलट त्यांचा इरादा हा जपानी स्पर्धेला नेटाने तोंड देण्याचा होता. दुसरं म्हणजे धोरणात्मक स्तरावर मायक्रॉनसाठी डीरॅम मेमरी चिपनिर्मिती उद्याोगच केंद्रस्थानी राहील हा त्यांचा निर्णय पक्का होता. जपानी कंपन्यांहूनही अधिक किफायतशीर पद्धतीने डीरॅम चिपनिर्मिती कशी करता येईल, कंपनीचे परिचालन व चिपनिर्मिती प्रक्रियेची अत्युच्च कार्यक्षमतेनं कशी अंमलबजावणी करता येईल हेच विचार त्यांच्या मनात दिवसरात्र घोळत असत.

पण सेमीकंडक्टर उद्याोगक्षेत्रातल्या प्रतिथयश अमेरिकी चिपनिर्मिती कंपन्यांची वर्तणूक ही जपानी स्पर्धेबाबतीतल्या पार्किन्सन बंधूंच्या विचारांशी संपूर्णपणे विरोधी होती. जिथे मायक्रॉन जपानी कंपन्यांशी डीरॅम चिपनिर्मितीक्षेत्रात दोन हात करण्याच्या पवित्र्यात होती तिथे जवळपास सर्वच अमेरिकी चिप कंपन्या मेमरी चिपनिर्मितीला कायमस्वरूपी सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयाप्रत आल्या होत्या. पार्किन्सन बंधूंना अमेरिकी चिप कंपन्यांचं हे धोरण बुचकळ्यात टाकत होतं. ज्या तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ अमेरिकी कंपनीने रचली त्या तंत्रज्ञानाला आज केवळ जपानी कंपन्यांचा शिरकाव झाल्यामुळे तिलांजली देणं त्यांना एकाच वेळी अतार्किक आणि पळपुटेपणाचं लक्षण वाटत होतं. आज मेमरी चिपक्षेत्रावर जपानची मक्तेदारी आहे, उद्या आणखी कोणत्या देशाची होईल, पण मग त्यासाठी अमेरिकेने या उद्याोगातच न पडणं कितपत योग्य आहे असा रास्त प्रश्न पार्किन्सन बंधूंना पडत होता.

तात्त्विकदृष्ट्या पार्किन्सन बंधूंचे प्रश्न जरी योग्य असले तरीही कंपनी केवळ तत्त्वांच्या आधारे चालवता येत नाही, तिला पैशाच्या निरंतर प्रवाहाची (कॅशफ्लो) गरज भासते. मायक्रॉनला डीरॅम मेमरी चिपनिर्मितीत टिकवून ठेवण्यासाठी पार्किन्सन बंधूंना आपले विचार एका तगड्या गुंतवणूकदाराच्या गळी उतरवणं गरजेचं होतं. सुदैवानं त्यांना अशी संधी लवकरच चालून आली. मायक्रॉनला प्राथमिक निधीचा पुरवठा करणाऱ्या एका गुंतवणूकदारानं त्यांना जॅक सिम्प्लॉटची भेट घेण्याचा सल्ला दिला.

सिम्प्लॉटची शेतीची पार्श्वभूमी माहिती असल्यानं पार्किन्सन बंधू साशंक मनानं त्याला भेटायला गेले. नाहीतरी त्या घडीला त्यांच्यापाशी दुसरा कोणता पर्यायही नव्हता. पण चर्चेच्या केवळ दोन तीन फेऱ्यांनंतर सिम्प्लॉटने मायक्रॉनमध्ये चक्क १० लाख अमेरिकी डॉलर गुंतवण्याचा आपला इरादा जाहीर केला. सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचा कोणताही गंध नसताना आणि डीरॅम उद्याोग आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असतानाही सिम्प्लॉटनं एवढी मोठी जोखीम का उचलली असेल? याचं विश्लेषण पुढील सोमवारी!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rise of the micron joe and ward parkinson dram chip manufacturing america amy