इंग्लंडमध्ये गतसप्ताहात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापौर निवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कौन्सिलर किंवा नगरसेवक निवडणुकांमध्ये हुजूर (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्षाला ५१५ जागा जिंकता आल्या. तर प्रमुख विरोधी मजूर (लेबर) पक्षाने ११५८ जागांवर विजय मिळवला. हुजूर पक्ष आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या दृष्टीने आणखी एक नामुष्कीची बाब म्हणजे, पार्लमेंट निवडणुकांमध्ये अनंतकाळ तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या लिबरल डेमोक्रॅट्स पक्षानेही स्थानिक पातळीवरल्या ५२२ जागांवर विजय मिळवला! गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बहुतेक प्रमुख पक्ष गेल्या वेळच्या तुलनेत अधिक जागा जिंकत असताना, हुजूर पक्षाला ३९७ जागा गमवाव्या लागल्या. मजूर पक्ष (८) आणि लिबरल डेमोक्रॅट्स (२) यांनी १० कौन्सिलमध्ये हुजूर पक्षाला सत्ताभ्रष्ट केले. महापौरपदांसाठी झालेल्या थेट निवडणुकांमध्येही लंडनची प्रतिष्ठेची लढत मजूर पक्षाने तिसऱ्यांदा जिंकली. इतर आणखी काही महत्त्वाच्या शहरांमध्येही बाजी मारली. तर ब्लॅकपूल साऊथ या पार्लमेंट पोटनिवडणुकीत मजूर पक्षाने हुजूर पक्षाची जागा खेचून आणली. सुनक यांच्यासाठी वैयक्तिक नामुष्कीची बाब म्हणजे, त्यांच्या नॉर्थ यॉर्कशायर मतदारसंघातच महापौर निवडणुकीत हुजूर पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. हा मतदारसंघ वर्षानुवर्षे हुजूर पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाई.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पहिली बाजू : आरोग्यावरील खर्चाचा भार हलका!

या स्थानिक निवडणुकांमध्ये हुजूर पक्षाची पीछेहाट होणार, याविषयी विश्लेषक आणि सर्वपक्षीय राजकारण्यांमध्ये मतैक्य होते. पण पराभव इतका भीषण असेल, याची अटकळ बहुतेकांनी बांधली नव्हती. ब्रिटनचा भाग असलेल्या स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या भागांचे प्रतिबिंब या निकालांमध्ये पडलेले नाही. त्यामुळे केवळ इंग्लंडमधील निवडणुकांच्या आधारे ब्रिटनचा राष्ट्रीय कौल ठरवणे योग्य होणार नाही, असे हुजूर पक्षातील मोजक्या सुनक समर्थकांचे म्हणणे आहे. सुएला ब्रेव्हरमनसारखे त्या पक्षातील सुनक विरोधक मात्र वेगळी भाषा बोलू लागले आहेत. पराभव खूपच व्यापक असल्यामुळे सुनक यांची जागा घेण्यास या घडीला तेथे फार कोणी इच्छुक नाही. पण हुजूर पक्षाने ‘अधिक उजवीकडे’ सरकणे अपरिहार्य ठरते, असे ब्रेव्हरमन आणि इतर काही जण बोलू लागले आहेत. ‘उजवीकडे सरकणे’ म्हणजे प्राधान्याने स्थलांतरित विरोधी धोरणे राबवणे आणि सरकारी योजनांवर खजिना रिता करणे असे निसरडे उपाय योजावे लागतील. यातून दीर्घकालीन राजकीय आणि आर्थिक विकार संभवतात. शिवाय इतके करूनही निवडणूक जिंकण्याची हमी मिळेलच, असे नाही.

हेही वाचा >>> संविधानभान : हम लोग तो ऐसे दीवाने…

२०१९मधील निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या हुजूर पक्षावर अशी वेळ येईल असे त्यावेळी तरी फार थोड्यांना वाटले असेल. गेली १४ वर्षे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हुजूर पक्ष सत्तेवर आहे. गेल्या निवडणुकीत तर १९३५नंतरच्या सर्वाधिक मानहानीकारक पराभवास मजूर पक्षाला सामोरे जावे लागले. त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता. अनुभवी जेरेमी कॉर्बिन यांचे कालबाह्य नेतृत्व आणि कीर स्टार्मर यांचे नवथर नेतृत्व या कालखंडात या पक्षाला उभारी मिळण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. परंतु लोकानुनयी धोरणांचा सोस, तसेच राजकीय दृष्टिकोन आणि आर्थिक भान यांचा अभाव यांमुळे बोरिस जॉन्सन आणि लिझ ट्रुस यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाच्या जनाधाराचा ऱ्हास झाला. ‘ब्रेग्झिट’चे पाऊल म्हणावे तसे न फळणे आणि करोनाकाळात शीर्षस्थ नेत्यांचे बेजबाबदार वर्तन यांमुळे सत्तेत असूनही हुजूर पक्ष चाचपडत होता. अखेर त्यांतल्या त्यात जाणकार व संवेदनशील असलेले सुनक यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवण्यात आले. पण अनुभवाचा अभाव आणि पक्षातीलच अनेकांकडून दुरापास्त झालेले सहकार्य यांमुळे सुनक यांच्यासमोरची वाटचाल अधिक बिकट बनली आहे. हुजूर पक्षाचे मताधिक्य आगामी पार्लमेंट निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घटणार याची त्यांनाही कल्पना आहे. त्यासाठीच त्यांनी नुकताच एका मुलाखतीत ‘मजूर पक्षाबरोबर स्कॉटिश नॅशनल पार्टी, लिबरल डेमोक्रॅट्स आणि ग्रीन पार्टी यांच्या युतीचे सरकार ब्रिटनसाठी धोक्याची घंटा ठरेल’, असा इशारा दिला. राक्षसी बहुमतानिशी गादीवर विराजमान असलेल्या सत्तारूढ पक्षाने आणि त्यांच्या नेत्याने असा नकारात्मक प्रचार सुरू केला, म्हणजे या मंडळींचा स्वकर्तृत्वावर विश्वास उडालेला आहे हे खुशाल समजावे. यातून त्रिशंकू पार्लमेंट अस्तित्वात येणे हेसुद्धा अशा सत्ताधाऱ्यांसाठी पराभवनिदर्शकच ठरते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi sunak s party suffers heavy defeat in uk local elections zws