नदी कुणासाठी जीवनदायिनी तर कुणासाठी माय… कित्येक शहरं, गावं नद्यांवर वसलेली. कैकांचा पिंड या पाण्यावर पोसलेला आणि स्वभावांचे विशेषही त्यानुसार ठरलेले. माणसांपासून ते मुक्या जनावरांपर्यंत सर्वांच्याच जगण्याला नदीचा भक्कम आधार. शांत नदीचा प्रवाह. संध्याकाळचे सगळे रंग पाण्यात उतरले आहेत. अजून अंधार पडायचा आहे. नदीकाठच्या गवताचा अशा वेळी एक उग्र असा वास यायला लागतो. दिवसभर स्वत:च्या बाहूंनी अंतर कापणारा नावाडी किनाऱ्यावर विसावला आहे. त्या नावाड्याची छाया नदीच्या पाण्यावर दूरवर पसरली आहे. जराशा तरंगानेही ती डचमळते… किंवा एखाद्या घाटावर दिवे प्रवाहात सोडले जात आहेत आणि अशा असंख्य दिव्यांची तारकादळे जणू पाण्याच्या पृष्ठस्तरावर हेलकावत हेलकावत पुढे पुढे जात आहेत. कधी एखाद्या ठिकाणी सुंदर असे झोकदार वळण घेऊन मार्गस्थ झालेली नदी अचानक लुप्त होते, दिसतच नाही. कुठे एखाद्या नदीचे पात्र अक्षरश: रखरखीत. विवस्त्र अवस्थेतली ही नदी अगतिक, असहाय भासू लागते. कुठे नदीचा प्रवाह अतिशय संथ गतीने तर कुठे तिची उतावीळ लगबग आणि पुढे निघून जाण्याची घाई… कुठे फेसाळत्या पाण्यासह दुथडी भरून वाहणारी तर कुठे अरुंद प्रवाहात अक्षरश: तटतटून जाणारी. नदीची अशी असंख्य दृश्यरूपे, चित्रे आपल्या मनावर कोरलेली. कुणासाठी ती जीवनदायिनी तर कुणासाठी माय… कित्येक शहरं, गावं नद्यांवर वसलेली. कैकांचा पिंड या पाण्यावर पोसलेला आणि स्वभावांचे विशेषही त्यानुसार ठरलेले. माणसांपासून ते मुक्या जनावरांपर्यंत सर्वांच्याच जगण्याला नदीचा भक्कम आधार. ती वाहते म्हणजे जणू सर्वांना जगण्याचीच हमी देते. अनेक साम्राज्ये नदीतटावर स्थापित झाल्याची साक्ष मिळते. कित्येक ठिकाणी मोठमोठ्या नद्यांना अडवून त्यांचे पाणी शेताशिवारात खेळवले गेले आणि त्यामुळे त्या परिसरात एक समृद्धी आली. पण नद्यांनी केवळ जीवनच दिलंय असं नाही तर भारत जोडण्याचंही काम केलंय. राज्याच्या आणि देशाच्याही सीमा ओलांडून या नद्या वाहत राहतात. त्यांचे प्रवाह माणसांना जोडून घेतात. सळसळणाऱ्या मासोळ्यांमुळे प्रवाहात उमटणारे शहारे आणि किनाऱ्यापर्यंत येणाऱ्या माणसांची सुखदु:खं, वेदनेचे कढ नद्यांशिवाय कोणाला माहीत असणार…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा