अर्थशास्त्र ही एक महत्त्वाची सामाजिक विज्ञानाची शाखा आहे, हे दाखवून देणाऱ्या बिनीच्या अर्थवेत्त्यांमध्ये रॉबर्ट इमर्सन लुकास ज्युनियर हे एक न टाळता येणारे नाव आहे. समष्टी आर्थिक विश्लेषणाला तर्कशुद्धतेचा पैलू आणि धोरणात्मक सुधारणांतून अर्थव्यवस्थेतील सरकारच्या हस्तक्षेपाची परिणामकारकता (किंबहुना फोलपणा) दाखवून देणारा सिद्धांत त्यांनी मांडला, ज्यासाठी ते अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे (१९९५) मानकरी ठरले. सरलेल्या सोमवारी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. १९७५ पासून ते अध्यापन करीत असलेल्या शिकागो विद्यापीठाने हे वृत्त दिले.
लुकास यांनी आर्थिक अन्वेषण, अध्यापन आणि आर्थिक नायकत्वाच्या संकल्पनाच बदलवून टाकल्या. ऐंशीच्या दशकातील त्यांच्या कामाकडे अर्थविषयक संशोधनात लक्षणीय परिवर्तन घडवून आणणारा वारसा म्हणून पाहिले जाते. वस्तू व सेवांचे ग्राहक आणि त्या वस्तू व सेवांच्या निर्मात्या कंपन्या या दोहोंच्या तर्कशुद्ध आस-अपेक्षा आणि त्या आधारे होणारे त्यांचे तर्कशुद्ध वर्तनच आर्थिक निर्णयांना वळण देते. सरकारने कितीही दावे केले आणि आर्थिक व वित्तीय धोरणांद्वारे अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून प्रत्यक्षात समस्याच वाढतात, असे लुकास यांचा सिद्धांत सांगतो. त्यांची ही मांडणी म्हणजे केनेशियन आर्थिक सिद्धांताच्या मुळावरच घाव होता. अर्थव्यवस्थेची भरभराट व मागणी व्यवस्थापित करण्यासाठी सरकारने राजकोषीय आणि पतधोरणाचा सक्रिय वापर करावा, असे केनेशियन मानतात. या केनेशियन धारणेवर लुकास यांनी थेट हल्ला चढविला.
हा ‘लुकास विरोधाभास’ (पॅराडॉक्स) त्यांनी लुकास-उझावा या प्रारूपाद्वारे प्रभावीपणे मांडला. ज्यात दीर्घकालीन आर्थिक वृद्धी ही मानवी भांडवलाच्या संचयांतून साधली जाऊ शकते याचे स्पष्टीकरण देण्यात आले. तुलनेने भांडवलाचे दुर्भिक्ष्य असलेल्या प्रदेशांकडे ओघानेच भांडवलाचे वहन होते या प्रस्थापित गृहीतकाला यातून धक्का दिला गेला. लोकांचे आर्थिक वर्तन आणि आर्थिक निवडी हे घटक त्यांचा गत अनुभव आणि त्यांच्या भविष्यातील अपेक्षांवर आधारित असतात, हा लुकास यांचा नोबेल विजेता सिद्धांत आहे. खुद्द त्यांच्या या वैचारिक जडणघडणीवरही त्यांच्या गत आयुष्याचा मोठा प्रभाव होता. १५ सप्टेंबर १९३७ मध्ये जन्मलेले ते चार भावंडांमधील थोरले होते. त्यांचे माता-पिता याकिमा (वॉशिंग्टन) येथून सिएटलमध्ये रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाले. हे स्थलांतर १९३७-३८ मधील मंदीच्या तडाख्याने धुळीस मिळाले. नोबेल विजेते अर्थवेत्ते असले तरी लुकास यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण हे इतिहास शास्त्रातील होते. अर्थशास्त्र हीच इतिहासाची प्रेरक शक्ती आहे या निष्कर्षांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि शिकागो विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पीएचडी मिळविली. त्यांनी त्याच विद्यापीठात चार दशके अध्यापन, संशोधन केले. सध्या जगावर घोंघावत असलेल्या मंदीच्या सावटात सरकार व मध्यवर्ती बँकांना राजकोषीय हस्तक्षेपाबद्दल अधिक गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडणाऱ्या लुकास यांचे योगदान इतिहासात कायम अजरामर राहील.