डिझेल इंजिनातील कर्ब उत्सर्जन शुद्धतेबाबत मोटारीच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी जर्मनीतील फोक्सवागेन कंपनीच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्यास मंगळवारी जर्मनीतील एका न्यायालयाने संस्थगित तुरुंगवास (सस्पेन्डेड सेन्टेन्स) आणि दंडाची शिक्षा ठोठावली. ऑडी या फोक्सवागेनच्या उपकंपनीचे माजी मुख्याधिकारी रुपर्ट स्टॅडलर हे अशा प्रकारची शिक्षा झालेले फोक्सवागेन समूहातील पहिले वरिष्ठ अधिकारी. त्यांच्यावर प्रत्यक्ष अफरातफरीचा आरोप नाही. परंतु गैरप्रकार लक्षात आल्यानंतरही त्यांना वेळीच आवर घातला नाही आणि ग्राहकांना संबंधित सदोष मोटारींची विक्री थांबवण्यासाठी पुरेशी तत्परता दाखवली नाही, या दोन मुद्दय़ांवरून दोषी ठरवत न्यायालयाने स्टॅडलर यांना २१ महिने संस्थगित कारावास आणि ११ लाख युरोंचा (साधारण ९.९ कोटी रुपये) दंड ठोठावला. स्टॅडलर यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांना तुलनेत सौम्य शिक्षा ठोठावण्यात आल्या. स्टॅडलर हे ऑडी आणि फोक्सवागेन अशा दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठपदावर कार्यरत होते आणि फोक्सवागेन समूहाच्या संचालक मंडळावरही होते. त्या पदांवर मिळणारे घसघशीत वेतन विचारात घेऊन स्टॅडलर यांना २० लाख युरोंचा दंड ठोठाण्यात यावा, अशी विनंती सरकारी पक्षाने केली होती. परंतु ती मान्य झाली नाही. फोक्सवागेन समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोरातील कठोर शासन व्हावे अशी जर्मनीतली जनभावना आहे. या भावनेची बूज न्यायालयाने राखली नाही, अशी टीका आता तेथे होऊ लागली आहे.

गेल्या दशकाच्या सुरुवातीस युरोपात आणि विशेषत: जर्मनीमध्ये डिझेलच्या मोटारींचे पेव फुटले. डिझेल हे पेट्रोलच्या तुलनेने अधिक प्रदूषक इंधन असे अमेरिकेतील मोटार उत्पादक आणि विश्लेषकांचे ठाम मत. परंतु ‘स्वच्छ’ डिझेल तंत्रज्ञान आम्ही विकसित केले असून, त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत युरोपात स्वस्तातील मोटारी धावू लागतील, असा युरोपातील मोटार कंपन्यांचा दावा असे. कारण डिझेल अधिक प्रदूषक, तरी पेट्रोलपेक्षा स्वस्तच. जर्मनीच्या मोटार कंपन्यांनी अमेरिकेपासून भारत व चीनपर्यंत अनेक मोठय़ा बाजारपेठांमध्ये डिझेलच्या ‘स्वस्त’ मोटारी विकण्याचा सपाटा लावला. बीएमडब्ल्यू आणि डायमलर बेन्झ (मर्सिडिझचे निर्माते) या कंपन्या उच्चभ्रू आणि अतिउच्चभ्रूंसाठीच मोटारी बनवतात. परंतु फोक्सवागेन कंपनीने अधिक परवडण्याजोग्या मोटारी आणल्या. अमेरिकेत या कंपनीच्या विविध नाममुद्रांच्या मोटारी विकल्या जात होत्या. त्यांच्या तपासणीच्या वेळी मोटारीतील सॉफ्टवेअर विशिष्ट कर्ब उत्सर्जनांक दर्शवायचे, पण प्रत्यक्ष रस्त्यावर मोटारी चालताना अधिक उत्सर्जन व्हायचे. चाचणीच्या वेळी दर्शवलेले उत्सर्जन सादर करून, कंपनी अशा ‘शुद्ध डिझेल’च्या मोटारी ग्राहकांच्या गळय़ात मारायची. ही चोरी अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने (ईपीए) प्रथम उघडकीस आणली. कालांतराने हे प्रकार युरोप आणि इतरत्रही केल्याचे आणि अशा जवळपास १.१ कोटी मोटारींमध्ये चोरटे सॉफ्टवेअर बसवल्याचे फोक्सवागेनने कबूल केले.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rajender Meghwar Pakistans first Hindu cop
पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी; कोण आहेत राजेंद्र मेघवार?
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास

फोक्सवागेनवर अमेरिकेसह इतर देशांतील न्यायालयांमध्येही खटले सुरू आहेत. फसवणूक आणि भरपाई या दोन गुंतागुंतीच्या मुद्दय़ांवर सुरू असलेले हे खटले वर्षांनुवर्षे चालू शकतात. पण फोक्सवागेनचे मुख्यालय असलेल्या जर्मनीने या बाबतीत पुढाकार घेणे अपेक्षितच होते. २०१५मध्ये उघडकीस आलेल्या आणि ‘डिझेलगेट’ असे (बद)नामकरण झालेले हे प्रकरण फोक्सवागेन आणि जर्मन उद्योगसंस्कृतीला मोठा धक्का होता. बाजारपेठेची गरज आणि अभिलाषा मोठय़ातल्या मोठय़ा कंपनीलाही कोणत्या स्तरापर्यंत नेऊ शकते, हे या उदाहरणाने स्पष्ट झाले. गैरप्रकार उघडकीस आला त्यावेळी फोक्सवागेनने नुकतेच जपानच्या टोयोटा कंपनीला सर्वाधिक खासगी मोटार उत्पादक म्हणून मागे टाकले होते. तरीही फोक्सवागेनला शासन करण्याविषयी जर्मन राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता होती. अँगेला मर्केल यांच्या सरकारने जी चौकशी सुरू केली, ती ओलाफ शोल्त्झ यांचे सरकार पुढे नेत आहे. स्टॅडलर यांना झालेली शिक्षा गैरप्रकाराचे गांभीर्य आणि फोक्सवागेन कंपनीचा राक्षसी महसूल पाहता फारच किरकोळ असल्याची टीका जर्मनीमध्ये सुरू झाली आहे. परंतु दंड आणि भरपाईच्या मालिकेला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे यापुढेही अनेक अधिकाऱ्यांना शिक्षा वा दंड वा दोन्ही होत राहणार हे नक्की. आता डिझेल इंजिनांविषयीचे ममत्व मागे पडले असून, विजेवर चालणाऱ्या मोटारी हे सर्वच प्रमुख मोटार उत्पादकांचे प्रधान उद्दिष्ट बनले आहे. पण या बाजारकल्लोळामध्ये अमेरिकी ‘ईपीए’सारख्या संघटनांचे आपण सर्वानीच आभार मानले पाहिजेत. सक्षम, स्वतंत्र आणि जागरूक नियामक असल्याने हे घडले. मोटार बाजारपेठ वेगाने विस्तारणाऱ्या भारतासारख्या देशातील नियामक व सरकारने म्हणूनच दक्ष राहिले पाहिजे.

Story img Loader