डिझेल इंजिनातील कर्ब उत्सर्जन शुद्धतेबाबत मोटारीच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी जर्मनीतील फोक्सवागेन कंपनीच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्यास मंगळवारी जर्मनीतील एका न्यायालयाने संस्थगित तुरुंगवास (सस्पेन्डेड सेन्टेन्स) आणि दंडाची शिक्षा ठोठावली. ऑडी या फोक्सवागेनच्या उपकंपनीचे माजी मुख्याधिकारी रुपर्ट स्टॅडलर हे अशा प्रकारची शिक्षा झालेले फोक्सवागेन समूहातील पहिले वरिष्ठ अधिकारी. त्यांच्यावर प्रत्यक्ष अफरातफरीचा आरोप नाही. परंतु गैरप्रकार लक्षात आल्यानंतरही त्यांना वेळीच आवर घातला नाही आणि ग्राहकांना संबंधित सदोष मोटारींची विक्री थांबवण्यासाठी पुरेशी तत्परता दाखवली नाही, या दोन मुद्दय़ांवरून दोषी ठरवत न्यायालयाने स्टॅडलर यांना २१ महिने संस्थगित कारावास आणि ११ लाख युरोंचा (साधारण ९.९ कोटी रुपये) दंड ठोठावला. स्टॅडलर यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांना तुलनेत सौम्य शिक्षा ठोठावण्यात आल्या. स्टॅडलर हे ऑडी आणि फोक्सवागेन अशा दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठपदावर कार्यरत होते आणि फोक्सवागेन समूहाच्या संचालक मंडळावरही होते. त्या पदांवर मिळणारे घसघशीत वेतन विचारात घेऊन स्टॅडलर यांना २० लाख युरोंचा दंड ठोठाण्यात यावा, अशी विनंती सरकारी पक्षाने केली होती. परंतु ती मान्य झाली नाही. फोक्सवागेन समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोरातील कठोर शासन व्हावे अशी जर्मनीतली जनभावना आहे. या भावनेची बूज न्यायालयाने राखली नाही, अशी टीका आता तेथे होऊ लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा