सौदी अरेबियामध्ये युक्रेनचे भवितव्य ठरवण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात बोलणी सुरू झालेली आहेत. या वाटाघाटींमध्ये कुठेही अमेरिकेव्यतिरिक्त ‘नेटो’ सदस्य देश आणि इतर युरोपिय देशांना स्थान नाही. नेटो म्हणजे उत्तर अटलांटिक सहकार्य संघटना. एके काळी अमेरिकेच्या पुढाकाराने तत्कालीन सोव्हिएत रशियावर वचक बसवण्यासाठी आणि युद्धजर्जर युरोपला युद्धमुक्त ठेवण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली. आज त्याच नेटोला कधी नव्हता इतका धोका रशियाकडून पोहोचत आहे आणि अशा वेळी नेटोचा आधारस्तंभ असलेला अमेरिका युरोपीय देशांच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी रशियाशी सौहार्दपूर्ण चर्चा करत आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स म्युनिक सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने जर्मनीत उपस्थित होते. त्यांच्या भाषणातून युक्रेन युद्धाच्या समाप्तीविषयी काही मुद्दे उपस्थित केले जातील असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ‘युरोपला धोका रशिया किंवा चीनपासून नाही’ अशी सुरुवात करून व्हान्स यांनी गाडी भलत्याच रुळांवर आणली. ब्रिटनसह बहुतेक युरोपीय देश तेथील मतदारांना स्थलांतरित आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी वाटणाऱ्या चिंतेबाबत अनभिज्ञ आहेत असे पूर्णपणे संदर्भबाह्य वक्तव्य ते करते झाले. मूळ मुद्दा सोडून भलत्याच विषयाला हात घालायचा नि त्यावरून आकाशपाताळ एक करायचे ही ‘शिकवण’ व्हान्स यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून त्वरित आणि योग्य प्रकारे आचरणात आणल्याचे या निमित्ताने दिसून आले. त्यांच्या वक्तव्यावर युरोपियन राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाचे नेते हतबुद्ध झाले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्कीही या परिषदेस उपस्थित होते. पुतिन यांना कसे रोखायचे आणि युद्ध कसे समाप्त करायचे याविषयी सकारात्मक चर्चा झाली असे व्हान्स यांच्याबरोबर वैयक्तिक भेटीविषयी झेलेन्स्की कसनुसे म्हणाले.

युद्ध कसे थांबवायचे आणि पुतिन यांना कसे रोखायचे, यावर जी चर्चा आणि वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. पण युरोपात नव्हे, तर सौदी अरेबियामध्ये! आणि या वाटाघाटींमध्ये युक्रेन नाही आणि युरोपही नाही! या वाटाघाटी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्रेन युद्ध ‘थांबविण्या’विषयी पुढाकाराचीच पुढची पायरी ठरते. युक्रेन युद्धाविषयी ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट ९० मिनिटे चर्चा केली आणि नेटोच्या ठरावाच्याच ठिकऱ्या उडवल्या. युक्रेनमधून व्याप्त भूभागातून माघार घेतल्याशिवाय रशियाशी चर्चा करायची नाही अशी नेटोची भूमिका होती. युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेच्या भूमिकेतील ध्रुवीय बदलांची ती नांदी होती. युक्रेनचे भवितव्य ठरवण्यासाठी होणाऱ्या वाटाघाटींमध्ये युक्रेनलाच स्थान नाही. गतशतकात वसाहतवाद शिगेला पोहोचला होता त्या वेळी अनेकदा दोन किंवा अधिक बड्या सत्तांमध्ये बेटांची, देशांची किंवा आफ्रिकेसारख्या खंडाचीही ‘वाटणी’ व्हायची. त्यात संबंधित भूभागांच्या प्रभारी शासकांना वा जनतेला विचारातही घेतले जात नव्हते. आज जग पुढे सरकले आहे. तरीदेखील युक्रेनच्या ‘फाळणी’वर अमेरिका आणि रशियाकडून सौदी अरेबियात शिक्कामोर्तब केले जात आहे. २०१४ मधील युद्धपूर्व स्थिती पूर्ववत करण्याची मागणी व्यवहार्य नाही, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ मध्यंतरी युरोपातच ब्रुसेल्स येथे वदले होते. तेव्हा युक्रेनच्या युद्धावर अमेरिका कोणाच्या बाजूने उभा राहील हे पुरेसे स्पष्ट झाले होतेच.

उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी या भूमिकेचाच वेगळ्या शब्दांमध्ये पुनरुच्चार केला. त्यांच्या मते आणि त्यांचे साहेब डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, युरोपसमोर मुख्य समस्या रशियाच्या आक्रमणाची नसून, स्थलांतरितांच्या आक्रमणाची आहे. स्थलांतरितांचे युरोपवर आक्रमण आणि युरोपिय शासकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील आक्रमण (म्हणजे नेमके काय हे स्पष्ट नाही) यावरच व्हान्स बोलत राहिले. त्यांनी सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने जर्मनीतील एएफडी या कडव्या उजव्या पक्षाच्या अध्यक्षांचीही भेट घेतली. ट्रम्प यांचे सगळेच सहकारी हुबेहूब ट्रम्प यांचेच शब्द वापरतात, त्यांच्यासारखेच बोलतात. एकच बाब वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी मांडली गेल्यास तीस पोपटपंची असे संबोधले जाते. ट्रम्प यांचे ‘व्हिजन’ जगभर पोहोचवण्यासाठी विवेकबुद्धी नव्हे तर पोपटपंचीची गरज लागते. बोलविता धनी एकच असतो, ‘बोलके पोपट’ बदलत राहतात. कधी व्हान्स यांच्या रूपाने, कधी मस्क यांच्या रूपाने तर कधी हेगसेथ यांच्या रूपाने.

Story img Loader