सौदी अरेबियामध्ये युक्रेनचे भवितव्य ठरवण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात बोलणी सुरू झालेली आहेत. या वाटाघाटींमध्ये कुठेही अमेरिकेव्यतिरिक्त ‘नेटो’ सदस्य देश आणि इतर युरोपिय देशांना स्थान नाही. नेटो म्हणजे उत्तर अटलांटिक सहकार्य संघटना. एके काळी अमेरिकेच्या पुढाकाराने तत्कालीन सोव्हिएत रशियावर वचक बसवण्यासाठी आणि युद्धजर्जर युरोपला युद्धमुक्त ठेवण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली. आज त्याच नेटोला कधी नव्हता इतका धोका रशियाकडून पोहोचत आहे आणि अशा वेळी नेटोचा आधारस्तंभ असलेला अमेरिका युरोपीय देशांच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी रशियाशी सौहार्दपूर्ण चर्चा करत आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स म्युनिक सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने जर्मनीत उपस्थित होते. त्यांच्या भाषणातून युक्रेन युद्धाच्या समाप्तीविषयी काही मुद्दे उपस्थित केले जातील असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ‘युरोपला धोका रशिया किंवा चीनपासून नाही’ अशी सुरुवात करून व्हान्स यांनी गाडी भलत्याच रुळांवर आणली. ब्रिटनसह बहुतेक युरोपीय देश तेथील मतदारांना स्थलांतरित आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी वाटणाऱ्या चिंतेबाबत अनभिज्ञ आहेत असे पूर्णपणे संदर्भबाह्य वक्तव्य ते करते झाले. मूळ मुद्दा सोडून भलत्याच विषयाला हात घालायचा नि त्यावरून आकाशपाताळ एक करायचे ही ‘शिकवण’ व्हान्स यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून त्वरित आणि योग्य प्रकारे आचरणात आणल्याचे या निमित्ताने दिसून आले. त्यांच्या वक्तव्यावर युरोपियन राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाचे नेते हतबुद्ध झाले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्कीही या परिषदेस उपस्थित होते. पुतिन यांना कसे रोखायचे आणि युद्ध कसे समाप्त करायचे याविषयी सकारात्मक चर्चा झाली असे व्हान्स यांच्याबरोबर वैयक्तिक भेटीविषयी झेलेन्स्की कसनुसे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा