मातृभाषेतूनच निर्मिती करणाऱ्या साहित्यिकाला गद्य की कविता असे बंधन नसते, अशा लेखकांना नेमका आशय वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्यप्रकाराची आडकाठी नसते, याचे एक उदाहरण म्हणजे अलीकडेच दिवंगत झालेले पंजाबी कवी- कथाकार- लेखक सुखजीत. वयाच्या अवघ्या ६२ व्या वर्षी, म्हणजे तसे अकालीच त्यांना मृत्यूने घेरले. १९९७ मध्ये पहिले पुस्तक आणि २०२१ मध्ये फक्त पाचवे. यापैकी चौथ्या पुस्तकाला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार, इतक्या कमी शब्दांत सुखजीत यांची कारकीर्द सांगता येणार नाही.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : भाजपने काय साधले ?
कारण या कारकीर्दीला स्पष्टवक्तेपणाची धार होती, संवेदनशीलतेचा ओलावा होता, सामाजिक निरीक्षणशक्तीची धग तिच्यात होती आणि ही धग शब्दांतून समाजापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्यही होते. ‘रंगां दा मनोविज्ञान’ या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून साहित्यप्रांतात पदार्पण करणारे सुखजीत हे ‘नामधारी’ पंथीय शीख कुटुंबातले. या पंथातले लोक फक्त पांढरेच कपडे घालतात, रंगीत नाही. पण केवळ ग्रंथसाहेबासह अनेक धर्मांच्या आध्यात्मिक वाचनाने, सर्वच प्रकारच्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या वाचनाने सुखजीत यांना कोणा एका पंथापुरते राहाणे अशक्यच होते. ‘हां मैं रेप एन्जॉय करदी आं’ या दुसऱ्या पुस्तकाच्या निव्वळ नावामुळे खळबळ उडाली… पण सुखजीत ठाम राहिले. ‘या कथांमधला रेप शारीरिक नाही, तो आजची जी भ्रष्ट व्यवस्था आपण मुकाट सहन करतो आहोत- किंबहुना तिचे लाभही आनंदाने घेतो आहोत, तो नीतिमूल्यांवरला अत्याचार आहे’- असे त्यांचे म्हणणे. अखेर हल्ली ‘ हां मैं एन्जॉय करदी आं’ एवढ्याच नावानेही ॲमेझाॅनवर या कथासंग्रहाची एक आवृत्ती मिळते आहे. पण नावातला हा बदल बहुधा, सुखजीत यांना गेल्या काही महिन्यांत आजाराने ग्रासल्यावरच झाला असावा. ‘अंतरा’ या कथासंग्रहातली त्याच शीर्षकाची कथा जगण्या-मरण्यातल्या अंतराबद्दल आहे. माणूस केवळ शरीरानेच जगतो का, या प्रश्नाकडे वाचकांना नेणारी आहे. पण ‘मैं अयानघोष नही’ या तिसऱ्या कथासंग्रहाला २०२१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अयानघोष हा ‘कृष्णाच्या राधेचा नवरा’… पंजाबी साहित्यविश्वात स्त्रीवाद सुमारे अर्धशतकभर पंजाबच्या मातीतूनच उगवून आलेला असताना, पुरुष-जाणिवांचा शोध घेण्याच्या फंदात कुणी पुरुष-लेखक पडले नव्हते, त्या वाटेवरही सुखजीत गेले आणि जगण्यात खरेपणा असणाऱ्यांनाच जगण्यातले खरे प्रश्न जाणवतात, हे त्यांच्या लेखणीने पुन्हा दाखवून दिले… तिला राष्ट्रीय पातळीवरची दादही मिळाली! या सच्चेपणाचे कौतुक लोक करत असतानाच त्याच्या उलटतपासणीचे काम ‘मैं जैसा हूं, वैसा क्यों हूं’ या आत्मपर पुस्तकातून सुखजीत यांनी हाती घेतले होते. त्याचा दुसरा खंड लिहून पूर्ण होण्यापूर्वीच, १२ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.