साहित्य अकादमीने १९८९ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना अकादमीचे ‘महत्तर सदस्यत्व’ (फेलोशिप) बहाल केले. ते स्वीकारताना तर्कतीर्थांनी केलेले भाषण हे त्यांच्या भारतीय भाषा व साहित्याचे आकलन स्पष्ट करणारे होते. राष्ट्रीय स्तरावरील भाषण म्हणून त्याला महत्त्व होते. ते साहित्य अकादमीने त्या वेळी हिंदी, इंग्रजीत प्रकाशित केले. या महत्तर सदस्यत्वाचे गौरवपत्रही (सायटेशन) हिंदी, इंग्रजीत प्रकाशित करण्यात आले होते. मूळ हिंदी, इंग्रजीतील भाषण व गौरवपत्र आजही आंतरजालावर वाचण्यास जिज्ञासूंना उपलब्ध आहे. तर्कतीर्थ समग्र वाङ्मयात या भाषणाचे मराठी भाषांतर देण्यात आले आहे.

तर्कतीर्थ आपल्या भाषणात समजावतात की, काव्यशास्त्रज्ञ दंडीने म्हटले आहे की, शब्द प्रकाश नसता, तर जग अंधारे राहिले असते. शब्द म्हणजे भाषा. कारण, ती शब्दातून जन्मते. ‘भाषा’ शब्दाचा एक अर्थ मानवता असा आहे. भाषा आणि मानवता या दोन गोष्टी जगात सर्वत्रच आढळतात. भाषा फक्त मानवातच आहे. ती मानवेतर प्राण्यांत नाही. मानवेतर प्राण्यांत भावसंप्रेषण होते; पण भाषिक संप्रेषण नाही. ते केवळ ध्वनिसूचक असते. भाषा सार्थक शब्दांतून आकाराला येते. मनुष्य अन्य प्राण्यांपेक्षा शक्तीने दुबळा असला तरी बुद्धीने श्रेष्ठ आहे.

साहित्य शब्द ‘सहित’ शब्दापासून बनलेला असल्याने साहित्य मानवहिताचे असणे, हे ओघाने आलेच. अॅरिस्टॉटल माणसास ‘राजनीतिक प्राणी’ मानतो, तर डार्विन ‘टेक्नॉलॉजिकल अॅनिमल’. (मॅन इज टेक्नॉलॉजिकल अॅनिमल) प्राणी, पक्षी साधने निर्माण करू शकतात; पण त्यांचा विकास नाही साधू शकत. मनुष्य साधन विकास घडवून आणतो. मानववंशशास्त्रज्ञांनी गेल्या दोनशे वर्षांच्या माणसाच्या साहित्यिक व असाहित्यिक भाषांचा अभ्यास केला आहे. यातून लक्षात आलेली गोष्ट अशी की, ६३-६४ स्वर-व्यंजनांपेक्षा अधिक वर्ण जगात सापडत नाहीत. सर्व भाषा साहित्यिक नाहीत. बोली व भाषाभेदांमुळे मुख्य भाषा साहित्यिक होण्याचा क्रम आढळतो. मुख्य भाषेच्या प्रभावामुळे तिच्या अन्य भाषा, बोली अस्तंगत होत राहतात. असे असले तरी अभिजात भाषा जपण्याचा माणसाचा कल दिसून येतो.

भाषा लोकभाषा बनत राजकीय महत्त्व धारण करते. यातून भाषिक अस्मितेचे प्रश्न निर्माण होत असतात. राष्ट्रवादाची भावना यातून उदयाला येते. युरोपात राष्ट्रवाद आणि भाषा यांचा निकटचा संबंध असून, भाषेतून राष्ट्रे निर्माण झाली आहेत. विसाव्या शतकात जग जवळ आल्याने भाषिक आदान-प्रदान होऊन ज्ञानभाषेचे केंद्रीकरण होत आहे.

साहित्य अकादमी या पार्श्वभूमीवर भाषासंवर्धनाचे करीत असलेले कार्य महत्त्वाचे आहे. तिने भारतीय भाषेचे धोकेही समोर आणले आहेत. त्यानुसार आपली विद्यापीठे उच्च शिक्षणात इंग्रजीस प्राधान्य देत असल्याने भारतीय भाषा विकासास मर्यादा पडतात. भारतात इंग्रजीचे वाढते प्रस्थ भारतीय भाषांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यासाठी विद्यापीठीय स्तरावर भारतीय भाषांचे महत्त्व वाढायचे तर अध्ययन, अध्यापन, संशोधन, भाषांतर यात तंत्रज्ञान जोडत विकास योजना आखली पाहिजे. संस्कृतसारखी अभिजात भाषा जपली पाहिजे. कारण ती सर्व भारतीय भाषांची जननी आहे.

एखाद्या मानवी समुदायाची भाषा, जी साहित्यनिष्ठ लोकभाषा बनते, ती हळूहळू त्या समाजाची आर्थिक आणि राजकीय व्यवहाराची भाषा बनत जाते. यातून त्या भाषेत राजकीय शक्ती येते. त्यातून त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेश वा प्रांतात, त्या सुसंस्कृत, शिक्षित समाजात त्या भाषेविषयीची अस्मिता वा अहंता (अहंकार) तयार होतो. त्यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना तयार होते. त्या विशिष्ट भाषा समूहास त्यातून राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होते. अठराव्या, एकोणिसाव्या शतकात याच आधारे युरोप आणि अमेरिकेत धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची निर्मिती झाली होती.

विसाव्या शतकात दळणवळणाच्या साधनांच्या विकासामुळे जीवन गतिमान झाले. त्यातून भाषिक व्यवहार व आदान-प्रदानास भाषांतरांमुळे गती आली. त्यातून भिन्नभाषी मानवी समाज अथवा देश मानसिकदृष्ट्या एकमेकांजवळ आले. भाषांतर पद्धतीच्या प्रचलनामुळे वा वाढत्या प्रमाणामुळे विश्वव्यापी मानव संस्कृतीत एकात्मता भावना निर्माण झाली. भारतीय राष्ट्रीयत्व मात्र बहुभाषिक व बहुसांस्कृतिक अंगाने विकसित होत राहिले.

– डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com

Story img Loader