पी. चिदम्बरम
पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे लाल किल्ल्यावरून भाषण करून आपले म्हणणे मांडत आहेत. पण लोकांना अपेक्षित असलेले त्यांचे भाषण कसे असू शकते, याचा हा मासला..
बंधू आणि भगिनींनो!
बरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य आणि नवजीवन मिळाले. आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याच शब्दांत सांगायचे तर, आपण ‘नियतीशी करार’ केला. स्वातंत्र्यानंतर आलेल्या सगळय़ाच सरकारांनी राज्यघटनेचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी तसेच आपल्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी; आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी; आणि आपल्या लोकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या वाटचालीमध्ये अडथळे आले, अनेकदा अपयशही आले. पण जेव्हा जेव्हा आपण अडखळलो आणि पडलो तेव्हा तेव्हा उठून उभे राहिलो आणि आपली वाटचाल सुरूच ठेवली. लोकशाही मार्गाने आपली ही वाटचाल सुरू होती. त्यामुळे आपल्याला आपल्या चुका सुधारता आल्या आणि अपयशांवर मात करता आली. म्हणूनच आपण दरवर्षी लोकशाही मार्गानेच चालत राहण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करतो.
खरे बोलायची वेळ
आजपर्यंत मी लाल किल्ल्यावरून तुमच्याशी आठ वेळा बोललो आहे. मी तुमच्याशी बोलतो ते देशाचा पंतप्रधान म्हणून आणि पक्षाचा नेता म्हणून. आज, मला एका वेगळय़ा मुद्दय़ावर बोलायचे आहे. आज मी तुमच्याशी सरकारचा प्रमुख म्हणून बोलतो आहेच, पण त्याचबरोबर तुमची दु:खे, चिंता, आशा आणि आकांक्षा समजून घेणारा आणि वाटून घेणारा तुमच्यासारखाच या देशाचा एक नागरिक या भूमिकेतूनदेखील आज मला तुमच्याशी बोलायचे आहे. मला तुम्हाला काही तरी खरे सांगायचे आहे. ते काही बाबतीत वेदनादायक आहे, पण तुम्ही मला समजून घ्याल, याची मला जाणीव आहे.
गेल्या आठ वर्षांत माझ्या सरकारने अनेक चुका केल्या आहेत. त्यांचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पहिली चूक नोटाबंदीची होती. नोटाबंदीमुळे काळा पैसा संपेल, भ्रष्टाचार कमी होईल आणि दहशतवाद संपेल असा सल्ला मला देण्यात आला होता. याबाबत रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरने दिलेल्या इशाऱ्याकडे मी लक्ष दिले नाही. नोटाबंदीमुळे जी उद्दिष्टे साध्य होतील असे सांगितले होते, त्यापैकी कोणतेही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. याउलट, नोटाबंदीमुळे विकास दर मंदावला, त्यामुळे रोजगाराचे प्रचंड नुकसान झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाखो सूक्ष्म, लघु तसेच मध्यम स्वरूपाचे उद्योग बंद झाले.
पुढची चूक जीएसटी कायद्यासंदर्भात होती. त्याच्या मसुद्यावर फारसे कामच केले गेले नाही आणि वर तो कायदा घाईघाईने संमत करण्यात आला. तेव्हाही मी मुख्य आर्थिक सल्लागारांचा आणि विरोधी पक्षनेत्यांचा सल्ला ऐकायला हवा होता आणि जीएसटीचा मर्यादित, एकल दर स्वीकारायला हवा होता असे आता मला वाटते. तसे न केल्यामुळे आपण केंद्र सरकारला मनमानी अधिकार देणाऱ्या, केंद्र आणि राज्यांमध्ये अत्यंत अविश्वास निर्माण करणाऱ्या, व्यापारी तसेच व्यावसायिक समुदायामध्ये प्रचंड असंतोष निर्माण करणाऱ्या आणि महागाईला खतपाणी घालणाऱ्या या कायद्याच्या कचाटय़ात सापडलो आहोत, असे मला आता जाणवते आहे. मी अशा एका वाघावर स्वार झालो आहे की ज्याच्यावरून आता मी उतरू शकत नाही, हे मला माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळे मला आता प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि विरोधी नेत्यांशी सल्लामसलत करायची आहे आणि सध्याच्या जीएसटीच्या जागी जीएसटी २.० आणायचे आहे.
चुकीचे निर्णय मागे घेतले
माझ्याकडून आणखीही काही चुका झाल्या, पण त्यांच्याशी संबंधित निर्णयांना विरोध झाल्यानंतर मी ते बदलले. नवीन भूसंपादन कायदा सौम्य करण्याचा प्रयत्न मी वेळीच सोडून दिला. त्याचप्रमाणे, तीन कृषी कायदे मुळातच चुकीचे आहेत असे माझ्या लक्षात आले आणि म्हणून मी ते आनंदाने रद्द केले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर -एनपीआर), नागरिकत्व सुधारणा कायदा (सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट- सीएए) आणि नुकतीच जाहीर केलेली अग्निपथ योजना यादेखील अत्यंत घातक, स्फोटक चुका आहेत. देशाचे ध्रुवीकरण करणाऱ्या आणि देशांतर्गत संघर्षांला खतपाणी घालणाऱ्या या दु:साहसापासून मी लवकरच माघार घेईन, याचीही मी तुम्हाला खात्री देतो.
माझ्या देशबांधवांनो! मी तुम्हाला वचन देतो की प्रार्थनास्थळ कायद्याची व्याप्ती मर्यादित करण्यासाठी किंवा समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समाजातील काही विभागांकडून येणाऱ्या दबावाला मी बळी पडणार नाही. मी तुम्हाला वचन देतो की संसद आणि राज्य विधान मंडळांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश आरक्षणाची तरतूद करण्यासाठी मी घटना दुरुस्ती विधेयक पुन्हा सादर करेन. जीएसटी दर, पेट्रोल तसेच डिझेलवरील अ-सामायिक उपकर आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचेही मी तुम्हाला वचन देतो.
दरी कमी करणे
गतकाळातील काही प्रसंगांमध्ये मी आणि माझ्या मंत्र्यांनी, माझ्या सरकारने हाती घेतलेल्या वेगवेगळय़ा उपक्रमांबद्दल दावे केले आहेत. मी प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण केले जातील, असेही मी आश्वासन दिले होते. ही सगळी आश्वासने म्हणजे निवडणुकीच्या काळातील जुमले (खोटी आश्वासने) होते. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. प्रत्येक कुटुंबाला घर असेल; आणि अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या पातळीवर पोहोचेल, हे मी केलेले दावेदेखील अशा दाव्यांपैकीच होते. हे सगळे प्रत्यक्षात आणण्यासाठीचे काम अजून सुरू आहे, हे मी मान्य करतो. मी असाही दावा केला होता की, आपल्या देशात आता कुणीही नैसर्गिक विधीसाठी उघडय़ावर जात नाही, घरोघरी शौचालय आहे आणि प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. पण हे दावे खरे नव्हते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी-५ मधून दिसून आले आहे की, आजही २५.९ टक्के ग्रामीण कुटुंबांकडे आणि ६ टक्के शहरी कुटुंबांकडे त्यांच्या घरात शौचालयाची सुविधा नाही. सर्वेक्षण केलेल्या ३० राज्यांपैकी एकाही राज्यात नैसर्गिक विधींसाठी उघडय़ावर जाणे बंद झालेले नाही. स्मार्ट पॉवर इंडिया आणि निती आयोग यांनी २०२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, १३ टक्के लोकसंख्या एकतर ग्रिडशी जोडलेली नाही किंवा वीज वापरतच नाही. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल ते निश्चित करणे आणि त्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. ती करून नव्या तारखा जाहीर करण्याचे मी तुम्हाला आश्वासन देतो.
वाढती जातीय दरी ही माझ्यासमोरची सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. विशेषत: महिला, दलित, मुस्लीम आणि आदिवासी या सगळय़ांना जोपर्यंत या देशात आपण सुरक्षित, भयमुक्त, निर्धोक आहोत असे वाटत नाही आणि देशाच्या विकासाची फळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत कोणताही देश प्रगती करू शकत नाही. माझ्या पक्षाने आपले पूर्वग्रह सोडले पाहिजेत हे मला मान्य आहे. माझ्या सरकारमधील लोकांनी जनतेमध्ये फूट पाडणारी वक्तव्ये करणे थांबवण्यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे. जनतेमध्ये द्वेषभावना वाढवणारी वक्तव्ये करणाऱ्यांना शासन केले गेले पाहिजे. देशातील विविधता आणि अनेक तत्त्ववादाला प्रोत्साहन दिले पाहिजे. समाजातील सर्व थरांतील, सर्व वर्गामधील लोकांना सामावून आपल्यामध्ये घेण्यासाठी, त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मला वाटते.
बंधूंनो आणि भगिनींनो! आपण एका मोठय़ा प्रवासाला सुरुवात केली आहे. या महान देशाची आणि देशातील सर्व जनतेची सेवा करण्याची मी प्रतिज्ञा करतो आहे. या ऐतिहासिक प्रवासात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी व्हा, असे मी तुम्हाला आवाहन करतो आहे.
जय हिंद!