आज लोकमान्य टिळकांचे पुण्यस्मरण. विनोबांची आणि लोकमान्यांची एकदाच भेट झाली, तथापि गीतेच्या अध्ययनासाठी लागणारी प्रेरणा त्यांना टिळकांकडून मिळाली. टिळकांप्रमाणेच विनोबांनी स्वचरित्राची उभारणी गीतेच्या तत्त्वज्ञानावर केली आणि या ग्रंथातून ‘साम्ययोग’ प्राप्त केला. विनोबांचे गीतेवरील विवेचन, गीता प्रवचनांच्या रूपाने विश्वविख्यात झाले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी ‘अ‍ॅप्लाइड गीताई’चे प्रयोग केले. त्याची ओळख ‘भूदान यज्ञ’ अशी आहे.

भूदान हा मुख्य प्रयोग आणि त्याचे आणखी शोधन म्हणजे ग्रामदान, प्रखंडदान, संपत्तिदान, आदींचा समुच्चय म्हणजे भूदान गंगा. गीताईची प्रस्थानत्रयी आणि भूदानाची गंगा दोहोंच्या ऐक्यातून ‘साम्ययोग’ आकाराला आला. भूदानाचे यशापयश सर्व जण पाहतात; तथापि विनोबांना या आंदोलनात दोन गोष्टी दिसल्या. पहिली ईश्वरी कृपा आणि दुसरी भारतीय संस्कृती.

ज्या क्षणी तेलंगणातील रामचंद्र रेड्डी यांनी स्वेच्छेने भूमिहीनांना जमीन देण्याची तयारी दाखवली, त्या क्षणी विनोबांना भूदान यज्ञ ही ईश्वरेच्छा आहे याची जाणीव झाली. पुढे एक तपाहून अधिक काळ ते या कामासाठी भारतभर फिरले तेव्हा त्यांना दानाला अनुकूल अशा भारतीय संस्कृतीचे दर्शन झाले.

विनोबांच्या मते, सर्वोदय विचार भोग नव्हे तर त्याग करायला शिकवतो आणि यामुळेच भूदान यज्ञ यशस्वी झाला. भूदान यज्ञ यशस्वी झाला ही काही साधी गोष्ट नाही. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ही एकमेव घटना आहे. चार लाख लोकांनी जमीन दान केल्याचे दुसरे उदाहरण नाही. यामागे भारतीय संस्कृतीची अक्षुण्ण धारा आहे. ज्यांनी दिले नाही त्यामागे त्यांचा मोह नव्हे तर असमर्थता होती. दानाची महती सर्वमान्यच होती.

या आंदोलनामुळे एक अभूतपूर्व राजकीय संवादही झाला. साम्यवादी व सर्वोदयी यांच्यातील राजकीय चर्चा ही घटना भूदानामागील आध्यात्मिक बैठकीइतकीच महत्त्वाची मानली पाहिजे. रक्ताचा एक थेंबही न सांडता सर्वहारा आणि ‘प्रस्थापित’ यांनी सकारात्मक चर्चा केली ही घटना क्रांतीएवढीच महत्त्वाची होती. आपापली मते थोडी बाजूला ठेवून उभय गटांनी उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याच्या भिन्न मार्गाना समजून घेतले.

साम्यवाद्यांना विनोबांमध्ये ‘कमराद बाबा’ दिसला, तर विनोबांना साम्यवाद्यांची गरिबांविषयीची कळकळ आईच्या मायेसारखी वाटली. विनोबांच्या विद्वत्तेबद्दल सहसा दुमत नसते, पण त्यांचे ‘वर्गविहीन’ होऊन उपेक्षित समाजघटकांमध्ये जवळपास संपूर्ण आयुष्य घालवणे लगेच जाणवत नाही. या अनुषंगाने गौतमभाई बजाज यांनी संपादित केलेली विनोबांची ‘फोटो-बायोग्राफी’ जरूर पाहावी. भूदान आंदोलनातील भूमिहीनांसोबतची त्यांची छायाचित्रे फार अर्थपूर्ण आहेत. आचार्य विनोबा आणि उपेक्षितांची महत्ता ओळखून त्यांच्याशी एकरूप होणारे विनोबा हे एकच आहेत याचे प्रत्यक्ष दर्शन त्या ग्रंथांमध्ये होते.

विनोबांची अक्षर-साहित्य सेवा आणि उपेक्षितांची महत्ता ओळखून झटणे समोर आले की सहजपणे नाही, पण तत्त्वत: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मरण होते. आज त्यांच्या जयंतीचे औचित्य आहेच.

– अतुल सुलाखे

Story img Loader