अतुल सुलाखे
विनोबा म्हटले की संत, आचार्य, ऋषी, जंगम विद्यापीठ आदी विशेषणे समोर येतात. तथापि ‘संत, स्थितप्रज्ञ’ आदींची कल्पना केवळ ठरावीक गटातील मंडळींनाच करता येते. परंतु या गडबडीत विनोबांची एक ओळख विसरली जाते. वस्तुत: ती विनोबांनीच करून दिली आहे. चिंतनातून प्रयोग आणि प्रयोगातून चिंतन अशी त्यांची कार्यपद्धती होती. सोप्या शब्दांत सांगायचे तर विनोबा ‘शास्त्र-ज्ञ’ होते. अनेकविध शास्त्रांचे विद्यार्थी होते. प्रखर बुद्धिनिष्ठ (स्व-बुद्धिनिष्ठ नव्हे) होते.
त्यांचा हा तर्कनिष्ठ स्वभाव मूळचाच होता. आईसोबतच्या संवादांमधून ही गोष्ट प्रकर्षांने जाणवते. विचार हा त्यांच्या अध्ययन आणि अध्यापनाचा आधार होता. त्यांनी गृहत्याग केला त्यामागेही एक विचार होता. प्रखर वैराग्याला त्यांनी संन्यासाचे रूप दिले नाही. त्यांची गांधीजींशी झालेली भेट हा मात्र काहीसा अपवाद होता. तथापि विनोबा गांधीजींच्या विचारांची कसून चिकित्सा करत. गांधीजींशी त्यांचा जो पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्यावरून ही बाब स्पष्ट होते. गांधीजींच्या सर्व प्रयोगांमध्ये विनोबा नेहमीच आघाडीवर होते. आहार ते सत्याग्रह अशा सर्व प्रयोगांची विनोबांनी फेरमांडणी केली. जमीन खणण्यापासून ती मिळवण्यापर्यंत विनोबा प्रयोगाअंती काम करत राहिले.
त्यांच्या प्रयोगनिष्ठेमुळे आणि तत्त्वांविषयीच्या प्रगाढ निष्ठेमुळे त्यांना प्रथम सत्याग्रही हा मान मिळाला. तुरुंगवासातील त्यांचे अनुभव या प्रयोगशील मनोवृत्तीची साक्ष देणारे आहेत. आमटी करणे ते धान्य दळणे अशा अनेकविध छोटय़ामोठय़ा कामांमध्ये त्यांनी प्रयोग केले. प्रत्येक तुरुंगवासात त्यांचे निरंतर अध्ययन सुरू असे. आपला प्रयोग अयशस्वी झाला तर अस्सल शास्त्रज्ञ ते चटकन मान्य करतो. विनोबांच्या ‘लोकनागरी’ लिपीबाबत असे घडले. भारताला जोडणारी त्यांची ही कृती लोकांच्या पचनी पडली नाही. परिणामी त्यांनी ही लिपी स्वत:पुरती मर्यादित ठेवली.
ब्रह्मचर्य, दारूबंदी आदी प्रश्नांवरचे त्यांचे विचार सरधोपट नव्हते. एखाद्या प्रश्नाच्या शक्य तेवढय़ा सर्व बाजू विचारात घेऊन ते कोणत्याही विषयावर आपले विचार मांडत, कुणी विचारांच्या साहाय्याने आपली भूमिका त्यांच्या समोर मांडली तर ती स्वीकारण्याची त्यांची तयारी असे. वैज्ञानिक विचार सामाजिक क्षेत्रात आणताना त्यावर सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय आणि आध्यात्मिक संस्कार करावे लागतात. त्यातच हे चिंतन समूहासाठी करायचे तर त्यात मोठे बदल करावे लागतात.
ज्या भाषेत विनोबांनी आपले विचार मांडले ती भाषाही त्यांच्या प्रयोगाचा भाग होती. त्यांचे आयुष्याच्या पूर्वार्धातील आणि उत्तरार्धातील साहित्य यादृष्टीने जरूर पाहावे. विनोबांचे मरण हाही एक प्रयोग होता. रोगाने मरण्यापेक्षा भोगाने मरणे ठीक या भूमिकेवरून त्यांचे प्रायोपवेशन पर्व सुरू झाले. सूर्य आपली किरणे जशी आवरून घेतो तद्वत कर्मयोगीही अलिप्त होत जातो.
विनोबांना अवहेलनेला उत्तर देणे अशक्य नव्हते, पण त्यांना आपली माती इतस्तत: पसरावी असे वाटत होते. असंख्य प्रयोग करून एक शास्त्रज्ञ या जगातून गेला. आज विनोबांची महती आपल्याला मान्य नसली तरी त्यांच्या विचारांची माती आपल्या समोर आहे. तिची मशागत करायला हवी.