अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यज्ञात आहुती दिल्यानंतर जे काही शिल्लक राहते त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करण्याची आज्ञा आहे. या लेखमालेमध्ये अभंग व्रते, एकसमन्वय, सामाजिक समता, शक्तिस्थापना, प्रस्थानत्रयी, आत्मज्ञान आणि भूदानाच्या अनुषंगाने विज्ञान आदींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. विनोबांच्या चिंतनाचे आणखी काही विशेष पाहायला हवेत.

विनोबांनी परमेश्वरानंतर विचारशक्ती महत्त्वाची मानली. कुणीही यावे आणि स्वत:चा विचार मला पटवून द्यावा आणि माझ्याकडील विचार समजावून घ्यावा, असे ते म्हणत. या विचारशक्तीला त्यांनी प्रेम आणि करुणेची जोड दिली. साम्ययोगात सत्याचा पाया गृहीत आहे. सत्य, प्रेम, करुणा आणि विचार या चौकटीत विनोबांना अभिप्रेत अशी व्यवस्था आहे. याला ते विचार शासन म्हणतात. सत्य-आग्रहाऐवजी त्यांनी सत्य ग्रहणाची निवड केली त्यामागेही सूक्ष्म रूपात विचार होता.

हे विचारतत्त्व आरामखुर्चीत बसून साधत नाही. विचार शब्दाची व्युत्पत्ती सांगताना विनोबांनी चर धातू महत्त्वाचा मानला आहे. त्याचा अर्थ चालणे.  विनोबांच्या आयुष्यात चालण्याला अपार महत्त्व असण्याचे हेही कारण होतेच. भूदान आणि ग्रामदानाच्या निमित्ताने त्यांनी भारताचे दर्शन घेतले. जमिनीसारख्या संसाधनाचा अधिकार सर्वाना असावा या हेतूने त्यांची पदयात्रा होती. नावात यज्ञ आणि आशयात साम्ययोगाचे सामाजिक अंग ही अहिंसक क्रांती होती. शब्द जुने आणि आशय नवा ही त्यांची अहिंसक क्रांतीची कल्पना होती.

जमिनीचा प्रश्न घेतल्याने जल, जंगल, जमीन, जात आणि जन या पाचही सामाजिक घटकांचा विचार करावा लागतो. विनोबांच्या समन्वयाचा हा विशेष आहे. गीतेचे तत्त्वज्ञान त्यांनी भूदानात शोधले. भूदान आणि गीतेवरील व्यापक चिंतन यांचा मेळ म्हणजेही साम्ययोग. हा साम्ययोग म्हणजे सर्वोदयाकडे घेऊन जाणारा पथ आहे, ही त्यांची धारणा होती. गांधी- विनोबा ही जोडी अशीही पाहता येते. १९१६ ते १९८० एवढय़ा मोठय़ा कालखंडावर या जोडीचा म्हणजे साम्ययोग आणि सर्वोदयाचा प्रभाव होता.

विनोबांना उंच टेकडी होण्याची इच्छा नव्हती. माझी माती इतस्तत: पसरावी असे त्यांना वाटत असे. भारतीय समाजमानसावर हा कसदार थर किमान सात दशके होता. विनोबांनी मांडलेला साम्ययोग काही हजार वर्षांची संस्कृती कवेत घेतो. वेद, उपनिषदे, परधर्मीयांना पूजनीय असणारे ग्रंथ, ऋषी, आचार्य, संत, साधू आदींचा समन्वय असे हे दर्शन आहे. आधुनिक भारतातील न्यायमूर्ती रानडे ते पंडित नेहरू असा त्यांच्या विचारांचा पैस आहे. पुन्हा त्यांचे समग्र चिंतन लोकभाषेत आणि करुणापूर्ण आहे. हे सर्व जमिनीच्या प्रश्नाशी जोडल्यामुळे त्याला अमूल्य परिमाण लाभले.

सहदेवाला जिवंत कर हे सांगणारा धर्मराज पाहिला की विनोबांना अभिप्रेत असणारा धर्म लक्षात येतो आणि त्यांचा देवही समजतो. आधुनिक भारताची रचना कशी असावी याचे ते सखोल चिंतन आहे. आधुनिक भारताचे दर्शन एका न्यायमूर्तीने घडवले आणि त्याला एका धर्ममूर्तीने तडीस नेले. हा धर्म सहदेवाला मानणारा आणि जाणणारा होता.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog justice to dharmamurti vinoba of contemplation bhudan ysh
Show comments