अतुल सुलाखे
सत्याग्रहाची शिकवण जशी आईकडून मिळते तशी विनोबांची विधायक भूमिका आई किंवा कुटुंबच शिकवते. लहानपणी आपण कुणाशी सूडबुद्धीने स्पर्धा करू लागलो की आई सांगते, दुसऱ्याची रेष खोडू नको तुझी रेष वाढव. आपण रेष वाढवली आणि आसुरी आनंद झाला की आई म्हणते, क्षमा कर आणि पुढे जा. विनोबांची अशुभावर प्रेम करायची आणि विधायक कार्यात स्वत:ला गुंतवून ठेवायची शिकवण आणि लहानपणीचा आईचा उपदेश यात खूप साम्य आहे.
ही शिकवण आपण विसरतो कारण आपण अनेक कारणांनी विधायक वृत्ती सोडतो. आपण सोडली नाही तर समाज आपल्याला विघातकेच्या दलदलीत खेचतो. ही दलदल किती भयावह आहे हे विनोबांनी गीता प्रवचनांच्या सोळाव्या अध्यायात सांगितले आणि भूदान यज्ञाची दीक्षा देऊन बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला. गांधीजींनी लोकांच्या हाती चरखा दिला आणि विधायकतेचे आचरण करून लोकांसमोर स्वतंत्र दर्शन ठेवले.
विनोबांच्या सत्याग्रहात जीवनपद्धतीला अत्यंत महत्त्व आहे. दुर्जनांचा प्रतिकार म्हणजे बाहेरच्या दुर्जनतेचा स्वत:च्या हृदयात शोध घेणे. विनोबांच्या परिवर्तनासाठी खुद्द गांधीजींनी असे पाऊल उचलले होते. त्याचे असे झाले की, आरंभी बुद्धीला पटतील तेवढेच आश्रमाचे नियम विनोबा पाळत असत. डायरी लिहिणे, सूत कातणे या गोष्टी विनोबा रोज करत नसत. एक दिवस गांधीजी त्यांना म्हणाले, ‘तुझा रोज कातण्यावर विश्वास नाही, यात माझाच दोष आहे. मी आत्मशोध घेईन.’ इथे संभाषण संपले. त्यानंतर काही दिवसांनी विनोबा गांधीजींना म्हणाले, तुम्हाला शब्द देतो की आजपासून पुढची १२ वर्षे मी रोज कातेन.’ हा अनुभव विनोबांनी सार्वत्रिक केला असणार हे उघड आहे.
सत्याग्रह म्हणजे जीवनपद्धती, कार्यपद्धती आणि विशिष्ट प्रसंगी उपायपद्धती आहे. त्यांच्या मते, सत्याग्रह म्हणजे सातत्य. जो थोडा वेळ चालतो तो सत्याग्रह नव्हे. सत्याग्रह ही जीवननिष्ठा आहे आणि आपले रोजचे जगणे त्या पायावर आधारित हवे. सत्याग्रहात प्रतिकार कसा असावा याचे स्पष्टीकरण करताना विनोबांनी फार सुंदर उदाहरण दिले आहे. माझ्या पायात काटा रुतला तर, ज्या हळुवारपणे मी काढेन तितक्याच हळुवारपणे मी समोरच्या व्यक्तीचे दोष काढले पाहिजेत. यासाठी विश्वात्मभाव आपल्या ठायी मुरला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. भगवान पतंजलीपासूनची उदाहरणे ते देतात.
पतंजलींच्या मते पूर्ण अिहसेमध्ये सहजच वैराचा त्याग होतो. परिपूर्ण भगवद्भावनेसमोर दुर्जनता उभीच राहात नाही, असे एकनाथ महाराज म्हणत, तर सत्याग्रहाला पराजय माहीत नाही ही गांधीजींची भूमिका होती. सत्याग्रहाचे सामाजिक संस्कार कुठून सुरू होतात यावर विनोबांनी ‘नई तालीम’ हा मार्ग सुचवला. गांधीजींची ‘नई तालीम’ हे सत्याग्रहाचे अभिन्न अंग आहे असा त्यांचा विश्वास होता. या विषयावर एक महाग्रंथ लिहिता येईल, असे ते म्हणत. विनोबांनी असा ग्रंथ खरोखरच लिहायला हवा होता. त्यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्यावर समान आणि शुभ संस्कार झाले असते. मूल, कुटुंब, समाज यांच्यातील ऐक्याची वाट गांधीजी आणि विनोबांनी दाखवली, आपल्याला तिच्यावर चालायचे आहे.