अतुल सुलाखे

सत्य, अहिंसा, प्रेम, मैत्रीचे संस्कार आपल्याला सर्वप्रथम आईकडून अत्यंत सहजपणे मिळतात. कधी ओव्या, कधी एखादा अभंग तर कधी गोष्ट यातून हे संस्कार पोहोचतात. अशा शुभसंस्कारांची ही दोन उदाहरणे. ‘शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति: नमोऽस्तु ते’ दिवा उजळल्यावर म्हटला जाणारा श्लोक आपण केव्हा शिकलो आणि तो आपल्या ठायी केव्हा मुरला हे सांगणे कठीण आहे.

यातील ‘शत्रुबुद्धिविनाशाय’ हा शब्द प्रयोग फार महत्त्वाचा आहे. दिव्याच्या ज्योतीला नमस्कार करायचा तो शत्रूच्या दुष्ट बुद्धीचा नाश व्हावा म्हणून. आत्मज्योत उजळली की दीपज्योत श्रद्धेय वाटते आणि मांगल्याची सृष्टी अवतरते. याबाबत किंतु राहू नये म्हणून ज्ञानोबा, आणखी नेमकी प्रार्थना करतात. दुष्टांचा दुष्टपणा अथवा दुष्टबुद्धी नष्ट व्हावी. त्यांना सत्कर्माची गोडी लागावी आणि एका जीवाचे दुसऱ्या जीवाशी मैत्र निर्माण व्हावे. ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे.’ अशा प्रकारची शिकवण नसती तर सर्वोदयाचे तत्त्वज्ञान या भूमीत निर्माणच झाले नसते. इतकेच नव्हे तर त्याचा विचारही करता आला नसता. मांगल्याचे तत्त्व हाडीमांसी रुजल्याचे उपहास हेही लक्षण असते. परंपरेचा हा अभिन्न हिस्सा गांधी आणि विनोबांनी लौकिक आणि पारलौकिक जागृतीसाठी विकसित केला.

विनोबांच्या सत्याग्रहाच्या शोधनात त्यांनी आग्रह शब्दाऐवजी अनाग्रह शब्द योजला, कारण आग्रह शब्द आला की सत्य बाजूला पडते. व्यक्ती आणि समूहाचा आग्रह जोर धरतो. म्हणून सत्य-अनाग्रह. त्यांनी प्रतिकार शब्दही नाकारला. कारण प्रतिकाराने हृदय परिवर्तन होत नाही. ते प्रतिकाराऐवजी ‘शस्त्रक्रिया’ शब्द वापरत. कारण शस्त्रक्रिया उभय पक्षांसाठी हिताची असते. फार तर भीती किंवा काळजी वाटू शकते पण सुखद आरोग्याची अधिक ओढ असते. म्हणून ‘सत्याधिष्ठित अनाग्रही शस्त्रक्रिया’ असे विनोबांच्या सत्याग्रहाचे वर्णन करता येईल.

उत्तम वस्तूचे निरंतर चिंतन आणि मनन करणे, छोटय़ा गोष्टींना नाहक महत्त्व न देणे, तटस्थ वृत्तीने काही सुचले तर ते लगेच मांडून निराग्रही होणे ही सत्याग्रहाची लक्षणे आहेत. आचरण, वाणी आणि विचार यांच्या सम्यक शक्तीवर विश्वास ठेवून लोकांचे हृदय परिवर्तन करणे म्हणजे सत्याग्रह. विचारशक्तीवर ज्याचा विश्वास नाही तो विनोबांच्या मते, सत्याग्रहीच नव्हे.

विनोबांच्या चिंतनाची मुळे भारतीय दर्शनात आहे. क्षमाशीलता, कष्ट करण्याची तयारी, विरोधाला शुभचिंतनासाठी साहाय्य, याही पलीकडे जाऊन सत्याग्रहाला जीवन पद्धती बनवणे ही सत्याग्रहीची प्रमुख कर्तव्ये आहेत. विनोबांचे हे चिंतन भारतीय तर आहेच पण प्रत्येक व्यक्तीला बाळकडूच्या रूपात मिळते. जगातील कोणताही धर्म, हे चिंतन नाकारू शकत नाही. खरे तर त्यांचीही ओढ कल्याणाचीच आहे. आविष्कार वेगळे आहेत इतकेच.

हे विश्व एक आहे आणि मी त्याचा एक भाग हा विचार लहानपणी आपल्याला मिळतो आणि महापुरुष तो सातत्याने आपल्या चित्तावर ठसवतात. ज्यांना दुर्जन म्हटले जाते त्यांना ही बाब पटवून देणे एक वेळ सोपे आहे, तथापि अनेकदा सज्जनांच्या विरोधातही सत्याग्रह करावा लागतो आणि तो अधिक कठीण असतो. विनोबांनी त्यावरही चिंतन केले आहे.

Story img Loader