‘साम्ययोग हा असा समग्र, सर्वागीण जीवनविचार आहे की त्याचा कोणत्याही वादाशी विरोध नाही आणि कोणत्याही वादाचा तो परिपोषही करीत नाही. तो कोणाच्याही प्रतिक्रियेतून जन्मलेला नाही.’
– विनोबा
विनोबांच्या वरील वचनामध्ये साम्ययोगाचे नेमके रूप दिसते. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे, ‘साम्ययोग, साम्यवादाप्रमाणे व्यक्तीची उपेक्षा करत नाही. सखोल विचार केला तर ध्यानात येईल की मनुष्याला आत्मविकास करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत त्याला सुख लाभू शकत नाही.’ या आणि अशा सखोल भूमिकांच्या आधारे साम्ययोग, भांडवलशाही, साम्यवाद आदी विचारसरणींकडे पाहतो. उदा. भांडवलशाही सर्वप्रथम आपल्या शरीरातच आहे. कारण त्या व्यवस्थेत ते वाढले आहे. त्याला त्या व्यवस्थेतील अनिष्ट गोष्टी जडल्या आहेत. त्या प्रयत्नपूर्वक सोडाव्या लागतील. त्यामुळे आपला देह, आपले घर हाच पहिला मोर्चा आहे. लौकिक गोष्टींचा विचार करण्याची ही साम्ययोगाची रीत आहे.
विनोबांच्या मते, भारतात आत्म्याचा विचार अखंडपणे सुरू आहे. साम्ययोगाची व्यवस्था करण्यासाठी कृत्रिम उपायांची गरज नाही. हे सांगताना विनोबा एका महत्त्वाच्या तत्त्वाकडे आपले लक्ष वेधतात. जेव्हा तत्त्वज्ञान बळकट असते, तेव्हा समाजशास्त्र, राजकारण, आर्थिक धोरण, इ. गोष्टी तदनुकूल होतात. आपली समस्या लोकसंग्रहाने सुटू शकेल. जो सर्वाना संग्रहित करतो, छिन्न भिन्न होऊ देत नाही, तोच धर्म अशी गीतेची शिकवण आहे.
सर्वोदय आणि साम्यवाद यांच्या लौकिक समस्यांचा प्रयत्न गीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. आमच्या सामाजिक सेवेच्या सफलतेचा आधार वर्गसंघर्ष नसून सर्वोदय आहे. आम्हाला सर्वामध्ये अविरोध निर्माण करायचा आहे. साम्ययोग दर्शनाचा हा महत्त्वाचा पैलू आहे. भूदान यज्ञ हे साम्यवादविरोधी आंदोलन आहे अशी टीका तेव्हा झाली होती. आजही होते. तथापि भूदानाचा एकमेव उद्देश साम्ययोगाची स्थापना करणे हा आहे, असा निर्वाळा विनोबांनी दिला होता.
अर्थात वेळ पडली तर आदर्श समाजरचनेच्या आड येणाऱ्या अनिष्ट गोष्टींना विनोबा विरोध करणार हे स्पष्ट होते. असा विरोध त्यांनी केलाही. एखाद्या उत्तम शल्यकर्मासारखे त्या विरोधाचे रूप होते. रोगी संपावा यासाठी शल्यकर्म करत नाहीत. तर त्याला निरामय आयुष्य मिळावे हा त्याचा हेतू असतो. विनोबांनी हे तत्त्व आचरणात आणले आणि विकसितही केले. एवढेच नव्हे तर प्रसंगी त्यांनी काँग्रेसच्या राजकारणाचीही समीक्षा केली. गुणवर्णन आणि दिशादर्शन हे विनोबांच्या समीक्षेचे रूप होते. ही पद्धती साम्ययोगात गृहीत आहे. चराचरांचा परमसाम्याच्या पायावर विचार करायचा असे ठरवले की गुणयुक्त समीक्षा अटळ ठरते. एवढे होऊनही समोरचा वेगळी भूमिका घेताना दिसला की त्याच्या समोर सहकार्यासाठी हात पुढे करावा लागतो.
विनोबांना साम्ययोगाच्या आधारे ‘सर्वोदय समाजा’ची उभारणी करायची होती. इतक्या व्यापक कार्यासाठी अशी पूर्वतयारी आवश्यक असते. साम्ययोगाचा स्वीकार म्हणजे ही पूर्वतयारीच आहे. साम्ययोगासारख्या स्वयंभू आणि समग्र दर्शनाचे फलित याहून वेगळे कसे असेल?
– अतुल सुलाखे