अतुल सुलाखे
भूदान यज्ञाच्या अनुषंगाने विचारकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली होती हे साम्यवाद आणि साम्ययोग यांची तुलना करताना आपण पाहिले. भूदानाच्या वाटय़ाला स्तुतीही आली आणि टीकाही. साहजिकच टीकेचीही नोंद घ्यावी लागली. जेव्हा ‘प्रथम सत्याग्रही’ म्हणून विनोबांची निवड झाली तेव्हा ‘विनोबा कोण आहेत?’ या शीर्षकाखाली लेख लिहावा लागला होता. अर्थात स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांना आणि समाजातील आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी पुरुषांना विनोबांचे महत्त्व ठाऊक होते. विनोबांचे गुरू स्वामी केवलानंद सरस्वती आणि पावसचे स्वामी स्वरूपानंद यांनी भूदान यज्ञ हे कर्मयोगाचे उत्तम उदाहरण असून विनोबा आदर्श कर्मयोगी आहेत असा निर्वाळा दिला. कॉ. बी. टी. रणदिवे ते स्वामी स्वरूपानंद असा विनोबांच्या कार्याचे महत्त्व जाणणाऱ्यांचा पैस आहे. त्याचीही नोंद इथे आली.
प्रत्यक्ष भूदान यात्रा सुरू झाली आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर विनोबांची आणि भूदानाची कीर्ती झपाटय़ाने पसरली. भूदानावर कविता लिहिल्या गेल्या. मान्यवरांचे लेख आले. या अनोख्या आंदोलनावर हिंदीमध्ये नाटकही उपलब्ध आहे. विनोबांचा आवडता कवी टेनिसन. याच्या नातवाने म्हणजे हॅल्लम टेनिसन याने ‘इंडियाज वॉकिंग सेन्ट’ या शीर्षकाखाली विनोबा आणि भूदान या दोहोंचा विस्ताराने परिचय करून दिला. टेनिसनपासून ते यदुनाथजी थत्ते, यांच्यापर्यंत श्रीनारायण, आदी मान्यवरांनी भूदान प्रवर्तक विनोबांचे चरित्र सांगितले. भूदानाचे महत्त्व विशद केले.
आचार्य जावडेकर यांनी ‘भूदान ही जनतेच्या हृदयातील सुप्त राम जागृत करणारी क्रांती आहे.’ इतक्या नेमक्या शब्दांत भूदानाची महती गायल्याचे दिसते. या कामासाठी विनोबांचीच गरज का होती हे सांगताना आचार्य लिहितात, ‘मानवी अंत:करणातील धर्मभावनेला व आत्मप्रेरणेला जागृत करून सामाजिक क्रांती घडवून आणण्यास केवळ मुत्सद्दी किंवा समाजाचा भौतिक दृष्टीनेच विचार करणारा क्रांतिकारक पुरेसा ठरणार नव्हता. ते कार्य करण्यास एका क्रांतिकारक स्थितप्रज्ञ यतीची अथवा संताची आवश्यकता होती. असा संत विनोबांच्या रूपाने आज भारतात संचार करत आहे.
त्यांनी भारतीय जनतेची खात्री करून दिली आहे की आज समाजात सर्वागीण क्रांती घडवून आणल्यावाचून मानवाची धर्मभावना व मोक्षवृत्ती जिवंत राहू शकत नाही. आजच्या मानवाचा भौतिक मृत्यू ओढवलेला आहे, ही खरी आपत्ती नसून त्याचा आत्मिक मृत्यू ओढवला आहे ही त्याहूनही अधिक घोर आपत्ती आहे. ही निष्ठा मानवी अंत:करणात जागृत करून विनोबांनी सर्वागीण क्रांतीची ज्वाला प्रज्वलित केली आहे.’
भूदानाची सविस्तर नोंद घेणारे भरपूर साहित्य आज उपलब्ध आहे. त्याच वेळी बरेचसे संशोधन अद्यापही बाकी आहे, असे म्हटले जाते. कारण एका तपाहून अधिक काळ विनोबांनी, जनतेशी जो संवाद साधला त्याचे समग्र संकलन ही प्रक्रिया फार प्रदीर्घ आहे. अर्थात भूदानाच्या भौतिक इतिहासापेक्षा त्यामागचा विचार अधिक महत्त्वाचा होता आणि असेल. विनोबांच्या कल्पनेत जे ‘परम साम्य’ होते ते प्रस्थापित झाले नाही, हे उघडच आहे. तथापि ‘परमसाम्य, शरीरश्रम आणि कांचन मुक्ती’ या तत्त्वांमधूनच मानवी समाजाला निरंतर वाटचाल करावी लागेल.