अतुल सुलाखे
विनोबांना संस्था नको होती. संघटनेच्या विरोधात त्यांचा कल होता. ही गोष्ट खरी असली तरी ही त्यांची भूमिका अव्यवहार्य नव्हती अथवा लहर म्हणूनही घेतलेली नव्हती. तो अहिंसेच्या प्रयोगाचा भाग होता. गांधीजींच्या अहिंसेचा, सत्याग्रहाच्या तत्त्वांचा स्वतंत्र भारतात कसा आविष्कार करायचा यावर चिंतन करणे आणि प्रयोग करणे गरजेचे होते. सर्वोदय समाज हा त्या प्रयोगाचा भाग होता. त्या प्रयोगाचा निष्कर्ष ‘सहज संघटना’ असा निघाला.
अर्थात संस्था नको, संघटना नको, अशी भूमिका घेतली तर व्यवहारात काम करणे अशक्य होते. तत्त्व कितीही चांगले असले तरी ते मूर्तरूपात येत नाही तोवर हेतू साध्य होत नाही. विनोबांनी संस्थांना विरोध केला तथापि तत्त्व अमलात आणणारी यंत्रणा नाकारली नाही. या यंत्रणेचे अथवा संघटनेचे रूप ‘सर्व सेवा संघ’ असे होते. या दोहोंविषयी त्यांनी सखोल चिंतन केले होते. यातील ‘सर्वोदय समाज’ आणि ‘सर्व सेवा संघ’ यांच्या परस्परसंबंधाचा जो भाग आहे तो पाहणे महत्त्वाचे आहे.
विनोबांनी सर्वोदयाची तुलना विशाल आनंद सागराशी केलेली दिसते. या सागराची खोली आपल्याला अद्यापही समजली नाही अशी त्यांची भूमिका होती. या समुद्रात डुबकी मारून शोध करा किंवा आनंद घेत तरून जा दोहोंची सोय आहे, असे ते म्हणत. सर्वोदयाचा मंत्र किती प्रभावी आहे याची भारतीयांना कल्पना नाही, असेही ते सांगत.
त्यांच्या मते या सर्वोदय समाजाचा प्रत्येक सेवक ‘स्वतंत्र’ आणि ‘सर्व तंत्र’ आहे. त्याला कसलेच बंधन नाही. तो एकटा काम करू शकतो किंवा संघटनापूर्वकही करू शकतो. रचनात्मक काम करणाऱ्या असंख्य संस्था त्या कार्यकर्त्यांला विरोध तर करणार नाहीतच; उलट पाठिंबाच देतील.
तथापि सेवेच्या या कार्यामध्ये सुसूत्रता हवी म्हणून एका रचनात्मक मंडळाची गरज असते. हे रचनात्मक मंडळ म्हणजे ‘सर्व सेवा संघ’. तत्त्वज्ञान ‘सर्वोदय समाजा’चे; तर अंमलबजावणीला साहाय्य म्हणून ‘सर्व सेवा संघ’ निर्माण झाला.
विनोबांनी ही विभागणी जाणीवपूर्वक केली. सर्वोदय समाज विचारक्रांतीचे काम करणार असल्यामुळे त्याचे औपचारिक संघटन केले तर त्यावर राजकारणाचा प्रभाव पडेल आणि अशी संघटना सत्ताधारी कशीही वापरतील अशी विनोबांना साधार भीती होती. विचारक्रांती राजकारणाची दासी नाही, असे ते स्पष्टपणे म्हणत.
या सर्वोदय समाजाला मार्गदर्शन हवे असेल तर ते काम ‘सर्व सेवा संघ’ करेल. सर्वोदय समाजाच्या संमेलनामध्ये जी उद्दिष्टे निश्चित केली होती ती किती पूर्ण होत आहेत याचा आढावा ‘सर्व सेवा संघ’ घेईल. तथापि केवळ आढावाच घेईल; कार्यक्रम निश्चित करणार नाही.
‘सर्वोदय समाज’ असो की ‘सर्व सेवा संघ’, या दोहोंना सर्वोदय विचारांचा पाया असल्याने त्यांची वाटचाल एकाच दिशेने होईल आणि विचार आणि तो अमलात आणण्याची रीत या दोन्हीमुळे विचार प्रत्यक्षात येताना गोंधळ उडणार नाही.
विचारक्रांतीच्या वाटेवर चालताना एका रचनेची गरज असते याचे विनोबांना पक्के भान होते.
jayjagat24 @gmail.com