अतुल सुलाखे
विनोबांची एक वेदना होती. ती महात्मा गांधींच्या हत्येशी जोडलेली होती. मी आश्रमातून थोडा लवकर बाहेर पडलो असतो तर बापू ज्या जातीय वणव्यात होरपळले तो वणवा मी झेलला असता. विनोबा गांधीजींचे अनुयायी होते तसेच ते त्यांचे मानसपुत्रही होते त्यामुळे विनोबांच्या वेदनेची तीव्रता ध्यानी येते. अर्थात नियतीने त्यांना या वेदनेतून बाहेर पडण्याची संधी दिली.
सर्वोदय समाज स्थापनेच्या त्या संमेलनानंतर पंडित नेहरूंनी त्यांना निर्वासितांच्या प्रश्नासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. विनोबांनी तिचा मान राखला आणि या प्रश्नासाठी सहा महिने काम करण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे विनोबा ३० मार्च १९४८ रोजी दिल्लीला पोहोचले. बापूंच्या समाधी शेजारी एका झोपडीत राहू लागले.
निर्वासितांची सेवा हा त्यांचा उद्देश असला, तरी या निर्वासितांचे मानसिक परिवर्तन व्हावे आणि त्या पातळीवर ते शांत व्हावेत यावर त्यांचा भर होता. भेद आणि विखार यांना जन्म देणारी वृत्ती त्यांना साफ अमान्य होती. गीता प्रवचनांमधे त्यांची ही भूमिका स्पष्टपणे दिसून येते.
हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर आदी भेदांचे वर्णन त्यांनी ‘डबकी’ या शब्दात केल्याचे दिसते. आत्मा मुक्त होण्यासाठी तडफडत असताना आपण त्याला देहाच्या खोलीत कोंबतो आणि मानवनिर्मित भेदांच्या साखळदंडाने जखडून टाकतो, असे विनोबांच्या भूमिकेचे वर्णन करता येईल.
ही भूमिका आपल्या प्रदीर्घ परंपरेची आहे. सत्ताकारणाच्या अंगाने तिच्याकडे पाहणे हा त्या परंपरेचा अपमान आहे. डबक्यात राहून परंपरा आणि सुधारणेचे गोडवे गायचे, अशी ती हास्यास्पद अवस्था आहे.
असा प्रेमाचा आणि सांत्वनेचा संदेश विनोबा निर्वासितांपर्यंत पोहोचवत होते. दिल्ली परिसरातील कालका, पुराना किला, बेला रोड, हरिजन वस्ती जवळील किंग्ज वे कॅम्प, कुरुक्षेत्र, पूर्व पंजाब आणि मेव या भागात विनोबांची प्रवचने झाली. भेदभाव दूर करण्यासाठी सर्वोदय कसा अपरिहार्य आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
सर्वोदयाची दृष्टी गीतेने सांगितलेल्या ‘सर्व भूतांचे कल्याण साधणे’ याच्याशी अनुकूल आहे. या महान तत्त्वज्ञानाचा अंगीकार करायचा, त्यानुसार आचरण करायचे आणि त्याचा जप करायचा. ‘मार्गी हळूहळू चाला मुखाने सर्वोदय बोला’ अशी शिकवण त्यांनी निर्वासितांना दिली.
विनोबांनी या कार्याचे वर्णन ‘स्थूल सेवा’ असे केले. त्याला यश मिळाले, पण विनोबा त्यावर समाधानी नव्हते. त्यांना सर्वोदयाचा क्रियात्मक आरंभ होईल अशी पद्धती हवी होती. ती मात्र मिळाली नाही.
या कामामुळे विनोबांना प्रशासनाच्या अनास्थेचाही अनुभव आला. पंजाबमधे काम करताना विनोबांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. गोपीचंद भार्गव यांना एक विनंती केली. निर्वासितांना वितरित करण्यात येणाऱ्या जमिनीपैकी ५ टक्के जमीन दलितांना देण्यात यावी. तांत्रिकदृष्टय़ा तसे करणे शक्य होणार नाही, या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर विनोबांनी तो प्रयत्न थांबवला. याच सुमारास विनोबांना, नेहरूंनी तेलंगणाचा दौरा करण्याची विनंती केली. विनोबा त्यासाठी तयार झाले तथापि त्यांना एक वेगळा प्रयोग खुणावत होता.
jayjagat24@gmail.com