अतुल सुलाखे
मार्गाधारें वर्तावें। विश्व हें मोहरें लावावें।
अलौकिक नोहावें। लोकांप्रति॥ ३. १७१॥
संताने धर्ममार्गाने वागावे आणि जगालाही त्या मार्गाला लावावे. लोककल्याणासाठी ब्राह्मीस्थितीत राहू नये. सामान्य लोकांकरिता अलौकिक होऊ नये. विधीचे बंधन नसते म्हणून लोकबाह्य वर्तन करू नये आणि लोकांच्या हिताहिताचीही उपेक्षा करू नये.
– ज्ञानेश्वरी
‘मी घटना समितीला आणि पर्यायाने माझ्या सर्व देशबांधवांना सांगितले की, आपण या देशातील प्रत्येक व्यक्तीस मतदानाचा हक्क देऊन राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत; परंतु या लोकशाहीस सामाजिक आणि आर्थिक समतेचे अधिष्ठान नसेल तर ती टिकणार नाही.’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
‘गांधीजींनी देशाला दोन मंत्र दिले त्यातील स्वराज्य आपण मिळवले, परंतु गांधीजींचा सर्वोदय हा मंत्र प्रत्यक्षात येत नाही तोवर खरे स्वराज्य आले असे म्हणता येणार नाही. दिल्लीत सूर्योदय झाला एवढय़ाने गावाने त्यावर का विश्वास ठेवावा?’ -विनोबा
भारतीय राज्यघटना आणि सर्वोदय समाज यांना आकार देणाऱ्या दोन भिन्न प्रकृतीच्या नेत्यांचे हे उद्गार आहेत. सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य साध्य करण्याचे एकमेकांचे मार्ग सर्वस्वी भिन्न होते. परंतु समत्वाधिष्ठित समाजरचनेचा दोहोंचा ध्यास सच्चा होता. विनोबांनी सर्वोदय समाजाच्या निर्मितीस चालना देऊन आणि पुढे भूदानाशी तिचे नाते जोडून आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला.
रचनात्मक कार्यकर्त्यांच्या संमेलनात या समूहाचे नामकरणही झाले. आरंभी ही रचना ‘सत्याग्रह मंडळ’ अशी ओळखली जावी, असा निर्णय घेण्यात आला. तथापि विनोबांनी त्याऐवजी ‘सर्वोदय समाज’ हे नाव सुचवले. सर्वोदय समाज या शब्दांमध्ये शोषितांच्या समस्यांचा समावेश होतो. परंतु सर्वोदयाचा अर्थ त्याहून व्यापक आहे. समाजातील शोषकांचेही प्रबोधन करणे तितकेच आवश्यक असते.
समाजातील सर्व घटकांचे सर्वोदयाच्या दिशेने प्रबोधन करणे, अंतर्बाह्य बदल होईल हे पाहणे आणि त्यासाठी विधायक कार्यावर भर देणे असा सर्वोदयाचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात हे प्रबोधन चराचर सृष्टीशी ऐक्य आणि आत्मज्ञान असे रूप घेते. यामुळे सर्वोदय अनावश्यक आहे असे म्हणता येत नाही.
सर्वोदयाचे ध्येय गाठू इच्छिणाऱ्यांचा समूह असेल तर त्याचा समाजावर अधिक प्रभाव पडेल अशी धारणा असल्यामुळे सर्वोदय समाज ही अनौपचारिक आणि सहज संघटना आकाराला आली.
सर्वोदय समाजाच्या चिंतनाचे फलित म्हणून २१ मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्यातही पुढील चार मुद्दय़ांचा ऊहापोह झाला. हे चार मुद्दे असे-
१. अहिंसेच्या निष्ठेची अनिवार्यता
२. रचनात्मक संस्थांचे एकीकरण
३. गांधीविचार मानणाऱ्यांचे संघटन
४. सरकार आणि काँग्रेस यांच्याशी असणारे संबंध
सत्य आणि अहिंसेवर आधारित समाजरचना करण्यासाठी प्रयत्न करणे. जात-पात, धर्म यांचा समावेश नसलेला शोषणरहित समाज निर्माण करणे. त्याचप्रमाणे समाज आणि व्यक्ती यांच्या समग्र विकासाला वाव मिळेल हे पाहणे आदी मुद्देही चर्चेत होते.
या संमेलनाच्या निमित्ताने सर्वोदय या संकल्पनेचा उपस्थित जाणकारांनी जो वेध घेतला तो जाणून घेणे आवश्यक आहे. साम्ययोग आणि सर्वोदय यांचा परस्परसंबंध त्यामुळे ध्यानात येतो.
jayjagat24@gmail.com