अतुल सुलाखे
सत्याग्रह मार्गाला विनोबांनी नेमके कोणते रूप दिले हा कधी तत्त्वचर्चेचा तर कधी अनभ्यस्त टिप्पणीचा विषय असतो. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचे विनोबांनी नेमके काय केले हे त्यांच्याच शब्दात जाणून घेणे योग्य होईल.
‘अनेकांना वाटते की विनोबांनी गांधीजींच्या काळच्या सत्याग्रहाचा बराच विकास केला. परंतु विनोबा तसा दावा करत नाहीत. मी फक्त बापूंच्या काही विचारांचे विवरण करून काही विचार दिले आहेत. ज्यामुळे चिंतनाला, आकलनाला मदत होईल. गांधीजींसमोर याची मांडणी केली तर त्यांना असेच वाटेल की माझा हा मुलगा चांगला विवरणकार आहे. त्याने चांगले विवरण केले आहे. काही बिघडवले नाही.
सारांश मी सत्याग्रह-विचारात काही वाढ केलेली नाही. केली असती तर तसे मी निश्चितच सांगितले असते. परमेश्वराच्या कृपेने माझ्यात व्यर्थ विनय नाही. मी एखादी नवी गोष्ट सांगितली असती तर मी सांगितले असते की अमुक गोष्ट बापूंच्या विचारात नव्हती; ती मला सापडली आहे. सत्याग्रहाचा विचार गांधीजींचाच आहे, ज्यात मी काहीही वृद्धी, परिवर्तन वा शुद्धी केलेली नाही. केवळ त्याचे विवरण तेवढे केले आहे.’ विनोबांनी मांडलेली ही भूमिका अतिस्पष्ट आहे. विनोबांनी सत्याग्रह विचार पुढे नेला अथवा त्यांनी गांधीजींचा मार्ग कुंठित केला या उभय भूमिका किती टिकतात हे सहजपणे लक्षात येते. नकळत गांधीजी आणि विनोबा यांचे वैचारिक पितापुत्राचे नाते जाणवते. विनोबांनी केलेल्या विवरणाचे ठळक मुद्देही पाहायला हवेत.
विनोबांच्या मते, स्वराज्यात नकारात्मक सत्याग्रह चालणार नाही. पारतंत्र्यातील सत्याग्रह नकारात्मक होते. सत्याग्रहाच्या एका प्रक्रियेला जेव्हा यश मिळत नाही तेव्हा त्याहून सौम्य प्रक्रिया स्वीकारली पाहिजे. सत्याग्रह सौम्यातून सौम्यतराकडे जातो ही त्याची प्रक्रिया आहे. कुठे सत्याग्रह होत आहे, हे ऐकल्यानेच आनंद व्हावा. नंतर त्यातील दोष दिसले आणि नावड उत्पन्न झाली तरी हरकत नाही. तथापि पहिली प्रतिक्रिया आनंदाची हवी.
सत्याग्रहात आमच्याकडून नव्हे तर सत्याकडून आग्रह झाला पाहिजे. आपण फक्त सत्यपालन करायचा आग्रह ठेवावा. सर्वानी ते सत्य मानण्यात फलवासना आहे. सत्य-चिंतनाचाच आपला आग्रह असावा.
विनोबांनी सत्याग्रह विचाराचे जे विवरण केले त्याला दोन पैलू आहेत. पहिला जवळपास १९१६ पासून अस्तित्वात होता. गांधीजींना एखादी कल्पना सुचायची आणि तिचा विस्तार करण्यासाठी, तिच्यावर प्रयोग करण्यासाठी ते विनोबांना पाचारण करायचे. आध्यात्मिक आणि विधायक प्रयोगांबाबत ही बाब अधिकच खरी होती. गांधीजींसारखा प्रतिभावंत मी पाहिला नाही असे विनोबांनी त्यांचे उचित वर्णन केले आहे.
त्याच वेळी अनेक गोष्टींमध्ये बापूंना स्पष्ट सल्ला देताना विनोबा कचरत नसत. तरीही दोघेही वात्सल्याच्या नात्याने बांधले गेले
होते. भारतीय राजकारणातील प्रतिभेचा हा मिलाफ मोठा मनोज्ञ आहे. तो अतिशय सखोल होता म्हणून विनोबा भूदान यज्ञाची दीक्षा भारतीयांना आणि सत्य प्रेम करुणेचा संदेश विश्वाला देऊ शकले.
jayjagat24@gmail.com