अतुल सुलाखे
इये मऱ्हाठीचिये नगरीं
ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं।
घेणें देणें सुखचिवरी
हों देई या जगा।।
ज्ञानेश्वरी १२.१६
भूदानाच्या अनुषंगाने या ओवीतील ब्रह्मविद्या आणि ब्रह्मविद्येचा व्यवहार हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. ही ब्रह्मविद्या म्हणजे साम्ययोग. ‘अभिधेयं परम साम्यम्’ ऐवजी ! ‘परम ब्रह्मम्’ म्हणायलाही हरकत नव्हती. ‘साम्य’ हा या युगाचा शब्द आहे म्हणून तो वापरला, असे विनोबांनी म्हटले आहे. माउलींची ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याची नम्र प्रतिज्ञा विनोबांनी भूदानाच्या रूपाने अनुसरली. साम्ययोगपर गीतार्थ आणि भूदान यज्ञ हा या दिशेने केलेला प्रयत्न होता.
माउलींनी ‘मराठी नगरी’ नजरेसमोर ठेवली. विनोबांनी ती भौगोलिकदृष्टीनेही विस्तारली. मुळात तो पायंडा संत नामदेवरायांनी पाडला होता. नामदेवांनी भागवत धर्माचा विस्तार संपूर्ण हिंदी मुलुखात केला. काव्य, अध्यात्म आणि प्रेमाचा संदेश यांचे संस्कार त्यांनी केले. विनोबांनी तोच धागा पुढे नेला. उत्तर आणि ईशान्य भारतातील संतांशी जोडून घेत विनोबांनी हे कार्य केले. विनोबांचे बहुतांश साहित्य हिंदी भाषेत आहे, हे यानिमित्ताने नोंदवायला हवे.
उत्तर भारतीयांनी गौरव केलेला संत म्हणजे एकनाथ महाराज. या एकनाथांना काशी नगरीने गौरविले. त्यांच्या भागवताचा सन्मान केला. विनोबांच्या मते एकनाथ आणि तुलसीदास यांची भेट झाली असण्याची शक्यता होती. म्हणजे रामभक्त आणि हरिभक्त परस्परांशी एकरूप झाले असणार.
विनोबांनी आधुनिक भारताचा इतिहास एकनाथांना अनुसरत मांडला. न्यायमूर्ती रानडे ते गांधीजी या सर्वामधे त्यांना नाथांचे दर्शन झाले. विनोबा गांधीजींचे म्हणजे पर्यायाने एकनाथांचेही अनुयायी म्हणायचे. नाथांनी दिलेला ‘खांब’ म्हणजे भागवत तर विनोबांचे भूदान त्याच तोडीचे होते.
विनोबांनी माउलींची ब्रह्मविद्या मराठी मुलुखाच्या पल्याड नेली. तिला वैश्विक संदर्भ दिला. तो तुकोबांचाही कित्ता होता. ‘आमुचा स्वदेश भुवनत्रयामाजी वास’ याचे आधुनिक रूप म्हणजे ‘जय जगत्’. अर्थात याचा पाया ज्ञानोबांनी घातला होता हे नव्याने सांगायची गरज नाही.
ऋषी, मुनी, साधू, संत यांची भूतदयेची कल्पना विनोबांनी भूदानाच्या रूपाने मांडली. व्यक्तिगत सद्गुण त्यांनी सामूहिक पातळीवर आणण्याचे प्रयत्न केले.
विनोबाप्रणीत भूदान यज्ञाची ही पृष्ठभूमी आहे. त्यांची संतशरणता एवढी मोठी होती की
गीतेतील तत्त्वज्ञ शब्दासाठी त्यांनी ‘संत’ शब्दाची योजना केल्याचे दिसते. संत कोणत्याही भाष्यकारापेक्षा श्रेष्ठ आहेत असे विनोबांचे म्हणणे होते.
या मालेत विनोबांचे स्थान कोणते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जनतेने त्यांना भूदानाच्या अनुषंगाने अपार मान दिला. तथापि जनतेचे प्रेम ही काही शास्त्रीय कसोटी नाही. विचारक लोक विनोबांकडे आणि भूदानाकडे कसे पहात होते हा मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे. समकालीन बुद्धिमंतांच्या विश्लेषणातून समोर येणारे विनोबांचे आणि भूदानाचे चित्र नेमके कसे होते?
jayjagat24@gmail.com