अतुल सुलाखे
काँग्रेसवर आरोप, सत्तेचा अव्हेर, अशी नकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी पदयात्रा सुरू केली नव्हती. त्यांच्याजवळ ‘खेडय़ाकडे जा’ हा गांधीजींचा संदेश होता. खेडय़ांची स्थिती सुधारत नाही तोवर देश उभा राहणार नाही याची गांधीजींना कल्पना होती. बलुतेदारांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे भारताचे स्वातंत्र्य गेले असे ते म्हणत. ही स्थिती नष्ट व्हावी म्हणून आश्रम व्रतांमध्ये शरीरश्रमांना अग्रस्थान मिळाले. विनोबांनी गांधीजींच्या श्रमाधिष्ठित तत्त्वज्ञानाचे ‘अध्यात्माला प्राप्त झालेला नवा आयाम’ असे वर्णन केले आहे.
पदयात्रेमध्ये विनोबांनी व्यक्ती, समूह आणि समाज हा मोक्षाचा त्रिकोण सांगितला त्याचा आधार मानवसेवा आणि शरीरपरिश्रम असा आहे. वासाहतिक काळात मानव सेवेवर आधारित नववेदांत, सर्वोदय आणि साम्ययोग ही तीन दर्शने भारतामध्ये उदयास आली ही अत्यंत विलक्षण घटना म्हणावी लागेल.
यातील दोन दर्शनांमधे लक्षणीय योगदान असणाऱ्या विनोबांनी, आर्थिक विकास आणि मूल्यव्यवस्था यांचा मार्ग दाखवला. खेडय़ांची दुर्दशा संपल्याखेरीज देशाचा विकास होणार नाही यावर ते ठाम होते. त्यांच्या मते, हिंदूस्थान खेडय़ांचा देश होता. मुस्लीम राजवटीत तो स्वतंत्र गावांचा गुलाम देश बनला आणि ब्रिटिश कालखंडात तो गुलाम गावांचा गुलाम देश बनला. आपल्याला स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र गावांचा देश घडवायचा आहे.
खेडे हाच देशाचा आत्मा आणि कणा आहे. खेडे वाचले तरच देश तगेल. खेडे टिकवायचे आणि उन्नत करायचे तर खेडय़ाबाहेर जाणारे धन, शक्ती आणि बुद्धी यांना रोखले पाहिजे. हे विचार ते जनतेला परोपरीने सांगत. एखाद्या गावात शेती, शिक्षण आणि रोजगाराची समस्या आढळली की विनोबा तिच्यावरचा उपाय सांगूनच ते गाव सोडत.
अशा चर्चामधून विनोबांना तीन उपाय गवसले. पहिला शेतसाऱ्याशी जोडलेला होता. सरकार पैशाच्या रूपात शेतसारा घेते त्याऐवजी तो धान्याच्या रूपात घेतला जावा असे विनोबांनी सुचवले. गावांमधील पैसा मुख्यत: कपडय़ांसाठी खर्च होतो आणि ही संपत्ती शहरांमध्ये जाते. चरखा हा या प्रश्नावरील उत्तम तोडगा आहे हे त्यांनी सांगितले. जिथे दवाखाना नाही तिथे निसर्गोपचाराचा मार्ग स्वीकारता येईल अशी त्यांची भूमिका त्यांनी घेतली.
विनोबांचा लौकिक त्यांच्या शैक्षणिक प्रयोगांमध्ये आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी काळाच्या कितीतरी पुढचा विचार केल्याचे दिसते. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि व्यवहार या तिन्ही अंगांनी त्यांनी हे क्षेत्र गाजवले. स्वत:ला ते प्राथमिक शिक्षक म्हणवून घेत. कारावासामध्येही स्वत:चा व्यवसाय सांगताना त्यांनी शिक्षकी पेशाची निवड केली होती.
शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या विनोबांनी पदयात्रेमध्ये शाळा नसणारी गावे पाहिली आणि तिथल्या शिक्षणाला दिशा दिली. यातूनच त्यांना रोज एक तास चालणारी शाळा हा उपक्रम त्यांना गवसला. जीवन आणि शिक्षण यांचा मेळ घालण्यापेक्षा जीवन म्हणजेच शिक्षण अशी त्यांची भूमिका होती. गीता प्रवचनांच्या १७ व्या अध्यायाला ‘साधकाचा कार्यक्रम’ हे नाव दिले आहे. त्यातील साधकावस्था प्रत्येक गावकऱ्याला लाभावी ही त्यांची तळमळ होती. संतांना नामस्मरणाची ओढ असते तशी विनोबांना परम साम्याची ओढ होती. गीता प्रवचनांमध्ये ठिकठिकाणी लौकिक समस्या सांगत विनोबांनी तत्त्वज्ञान सांगितले तर संपूर्ण भूदानाचा पाया साम्ययोगाचा होता.
jayjagat24@gmail.com