अतुल सुलाखे

बुद्धिवादी मंडळींनी विनोबांच्या कार्याबद्दल असंख्य शंकाकुशंका घेतल्या तरी सामान्य भारतीय जनतेने भूदानावर अलोट प्रेम केले. खरे तर शंका सामान्य माणसांनी घ्यायला हवी होती. कारण नुसते मागून जमीन मिळत नाही. बांध इकडचा तिकडे केला एवढय़ाच कारणावरून एकमेकांचा जीव घेणाऱ्या या देशात केवळ आवाहन करून जमीन मिळणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे, हा त्यांचा आजवरचा अनुभव होता. अशा स्थितीत सामान्यजन भूदानाचे स्वागत करत आहेत आणि ज्यांचा ग्रामीण जीवन पद्धतीशी संबंध नाही अशी मंडळी नानाविध आक्षेप घेत आहेत, असे काहीसे विपरीत चित्र उभे राहिले. बुद्धिवाद्यांना विनोबांचे एक बलस्थान समजले नाही. त्यांना भारतीय जनतेची मानसिकता पुरेपूर ज्ञात होती.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
maharashtra vidhan sabha election 2024, chiplun sangameshwar assembly,
चिपळूण-संगमेश्वरमधील लढतीला निष्ठा विरुद्ध गद्दारी असे स्वरुप
Ramdas Athawale, RPI pune, office bearers of RPI,
महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
maharashtra assembly election 2024 three way fight between bjp rebels jat assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीयवादाकडे झुकणारी लढत

भूदान जमिनीशी संबंधित होते आणि त्यापलीकडेही खूप काही होते. भारतीय जनमानसातील सुसंस्कृतता या यज्ञाने जागवली. आजही हे संस्कार टिकून आहेत. विनोबांचे भूदानाचे कार्य लोक विसरले नाहीत. या कालखंडातील विनोबांची जनसामान्यांविषयी असणारी कळकळ लोकांच्या लक्षात आहे.

लोकांचे प्रेम एकीकडे तर आपली भूदान यात्रा असे काही वळण घेईल याची विनोबांनाही कल्पना नव्हती. ऋषी शेती आणि कांचन मुक्ती या दोन प्रयोगांत ते मग्न होते. नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी ते पायी दिल्लीला गेले. त्या वेळी त्यांनी आपली भूमिका मंडळासमोर मांडली तथापि त्यांच्या सूचनांचा मंडळाने स्वीकार केला नाही.

त्याच सुमारास तेलंगणातील हिंसाचाराच्या शमनासाठी विनोबा त्या भागात गेले. तिथल्या दलित समाजातील शेतमजुरांशी त्यांनी संवाद साधला. उपजीविकेसाठी त्या मंडळींना जमीन हवी होती. विनोबा ती कशी देणार होते? इथे त्यांना रामचंद्र रेड्डी भेटले. त्यांनी १०० एकर जमीन दान देण्याचे ठरवले. विनोबा म्हणतात, ‘‘त्या रात्री मला झोप आली नाही. हा ईश्वरी संकेत असून परमेश्वर माझ्याकडून हे काम करून घेऊ इच्छितो.’’ भूदानाचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे ही अंत:प्रेरणा जनतेपर्यंत पोचवण्यात विनोबांना यश आले आणि लोकांनीही ती प्रेरणा जाणली.

भूदान ही राज्यसंस्थेने पुरस्कृत केलेली गोष्ट असती तर या कार्याने मूळ धरलेच नसते. कारण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात बहुतेक सर्व पुढारी प्रचारासाठी निघून गेले. ‘सूर्य नेहमी एकटाच असतो’ अशी प्रतिक्रिया देत विनोबांनी यात्रा सुरूच ठेवली. सत्ताकारणासाठी हे कार्य असते तर ते केव्हाच बाजूला पडले असते. सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी नसली तरी भूदान ही व्यापक अर्थाने राजकीय कृतीही होती.

भूदानाचा विशेष असा की आजही तिचे शुभस्मरण केले जाते. त्या काळात भूदानाशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्यांच्या तिसऱ्या पिढीतही विनोबांविषयीचा आदरभाव टिकून आहे. त्याचा प्रत्यय येतो. प्रत्यक्ष भूदान चळवळ सुरू होती तेव्हा जनतेला आदरभाव असेल यात नवल नाही. तथापि आजही तो आहे. त्या काळातील अनुभवांचे उत्तम संकलन झाले आहे आजच्या आस्थेची मात्र नोंद नाही. ती नाही यातच खरी गोडी आहे. भूदान ही गीताईप्रमाणेच एक अजोड कृती होती याची साक्ष या आस्थेमुळे मिळते. भूदानाचे स्मरण इतक्या सहजपणे संपणारे नाही. त्याचा आधार घेऊन आजच्या विखारी वातावरणाचा मुकाबला करणे सहजशक्य आहे.

jayjagat24 @gmail.com