अतुल सुलाखे
गांधीजींनी प्रथम सत्याग्रही म्हणून निवड करेपर्यंत विनोबांचा जगाला परिचय नव्हता. सर्वोदयी परिवारातील बिनीचे नेते, त्यांची ताकद जाणत असले तरीही आध्यात्मिक अधिकारी, विद्वान, गीतेचा भाष्यकार आणि गांधीजींचा सल्लागार शिष्य हाच विनोबांचा परिचय होता.
गांधीजींच्या हत्येनंतर काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी विनोबांवर मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवली. हा घटनाक्रम १९४८ मधील होता. पाकिस्तानशी युद्ध, गांधीजींची हत्या, देशांतर्गत हिंसा, अशा बिकट काळात विनोबा कोणतीही ठोस कृती करत नाहीत, असे कुणालाही वाटावे, अशी स्थिती होती.
गांधी-हत्येनंतर चार वर्षांनी विनोबांचा भूदान यज्ञ सुरू झाला. जमिनीचा प्रश्न सोडवल्याखेरीज या देशाची अर्थव्यवस्था उभी राहणार नाही याची गांधीजींना जाणीव होती. या दृष्टीने त्यांना कार्य करायचे होते. तथापि तसे घडले नाही. गांधीजींचे उत्तराधिकारी म्हणून विनोबांच्यावर ही जबाबदारी आली. ती त्यांनी पेलली पण त्यासाठी अवलंबलेल्या मार्गात गांधीजींच्या सत्याग्रहाला स्थान नव्हते. गांधीजी ‘आतला आवाज’ महत्त्वाचा मानत असत तथापि त्यावर ते सर्वस्वी अवलंबून नसत. भूदानाला विनोबांनी अक्षरश: ईश्वरेच्छा मानले. त्यासाठी योजलेल्या सर्व संकल्पना आध्यात्मिक आणि हिंदू धर्मातील होत्या. भूदानाच्या विचारात प्रेम आणि करुणेचा जो अंश होता तो पडताळायचा कसा हा मोठाच प्रश्न होता.
सरकार, प्रस्थापित विशेषत: जमीनदार वर्ग यांचे हितसंबंध जपणारा उपक्रम म्हणूनही भूदानाकडे पाहिले गेले. विनोबांच्या आर्थिक आकलनावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. खरे तर विनोबांच्या विचारांची रीत रूढ समजुतींना धक्का देणारी होती. त्यामुळे त्यांना कोणताही गट मान्यता देणे शक्य नव्हते. त्यांच्या गीतार्थाबद्दल आणि उपनिषदांच्या अभ्यासाबद्दलही शंका उपस्थित झाल्या. या दृष्टीने प्राच्यविद्येचे सखोल अभ्यासक आणि विनोबांविषयी अपार श्रद्धा असणारे स्व. म. अ. मेहेंदळे यांचे लेखन जरूर वाचावे.
ज्या साम्यवादावर विनोबांनी परखड टीका केली त्या साम्यवादाच्या अध्ययनाची त्यांची रीत कशी होती? कारावासात असताना त्यांची एका साम्यवाद्याशी चर्चा झाली. ‘तुम्ही आमचे साहित्य वाचलेले दिसत नाही. ते वाचून मग मत द्या.’ यावर विनोबा उत्तरले, ‘मी काततो तेव्हा तुम्हीच मला वाचून दाखवा.’ त्या गृहस्थांनी तसे केले. त्यापूर्वी विनोबांनी ‘कॅपिटल’ वाचले होते. विनोबांनी या विचारधारेचा सखोल अभ्यास केलाही असेल तथापि साम्यवादाचे गुण आणि दोष सांगताना त्यांनी आधुनिक अध्ययन पद्धती नाकारली. दरवेळी तसे करता येत नाही.
परंपरा आणि व्यवहार अशा दोन्ही पातळय़ांवर विनोबा नको इतके आदर्शवादी होते. परिणामी भूदानाची नवलाई होती तोवर लोक त्यांना प्रमाण मानत होते. आयुष्याच्या उत्तरार्धात विनोबा बेदखलही झाले आणि विखारी टीकेचे धनीही झाले. अति आदर्शवादी भूमिका अपयशी ठरते. विनोबांच्या बाबतीत तसे घडले.
विनोबांवर सातत्याने होणाऱ्या टीकेचे रूप काहीसे असे दिसते. ही टीका एकवेळ समजून घेता येते कारण ती सर्वोदय परिवारातून झालेली नाही. तथापि सर्वोदयी परिवार तरी विनोबांच्या बाजूने होता का, या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला हवे.
jayjagat24 @gmail.com