अतुल सुलाखे
कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं
मी माझ़ें न म्हणे सोशी सुख-दु:खें क्षमा-बळें
गीताई – १२.१३
गांधीजी आणि विनोबांचे सत्याग्रहाचे दर्शन पाहिले की दोन गटांना आपल्या भूमिकांचा विचार करावा लागेल, अशी स्थिती निर्माण होते. गांधीजींच्या विचारांचा विनोबांनी ऱ्हास केला असे म्हणणारा एक गट तर विनोबांच्या विषयी आम्हाला आदर आहे, पण गांधी नकोत ही भूमिका असणारा दुसरा गट. वस्तुस्थिती अशी आहे की, या दोन्ही नेत्यांचे विचार परस्परांसाठी अत्यंत पूरक आहेत. या जोडीच्या विचारांत कोणताही बदल केला तर तसे करणाऱ्यांना त्यांचा वैचारिक वारसा सांगता येणार नाही. याचा अर्थ गांधीजी आणि विनोबांच्या विचारविश्वात बदल करूच नये असे नाही. अन्यथा सर्वोदयाचे साचेबद्ध रूप निरुपयोगी ठरेल. परंतु भारतीय आणि वैश्विक विचारपरंपरेशी जोडलेले सर्वोदय दर्शन कोणत्या टप्प्यावर बदलता येणार नाही, हे ‘गांधी उणे अध्यात्म’ आणि ‘विनोबा उणे विधायक कार्य’ अशी कल्पना केल्यास सूत्ररूपाने सांगता येते :
(गांधी – अध्यात्म) + (विनोबा – विधायक कार्य) = ० (शून्य.)
थोडक्यात, अध्यात्माचे अधिष्ठान कायम राखत निरंतर विधायक कार्य करणे हे सत्याग्रहाचे मुख्य तत्त्व आहे. इथे विनोबांचे महत्त्व काय आहे, हा प्रश्न उद्भवणे साहजिक आहे. कोणत्याही भाबडेपणाने अथवा समाजसेवेच्या हुक्कीने विनोबांनी सत्याग्रहाच्या शोधनाला हात घातला नाही. जवळपास दोन तपे विनोबा विधायक कार्यात गढून गेले होते. वर गीताईतील श्लोकात जे वर्णन आले आहे त्या भावनेने त्यांच हे कार्य सुरू होते.
समाजसेवा या शब्दापेक्षा ते समाजभक्ती हा शब्द पसंत करत. सेवा व्यक्तीची आणि भक्ती समाजाची अशी आपली धारणा असते. त्यामुळे समाज बाजूला पडतो आणि व्यक्तीचे स्तोम माजते. विधायक कार्याच्या प्रत्येक पैलूवर हुकमत गाजवून ते भूदानासाठी बाहेर पडले. त्या वेळच्या परिस्थितीचे त्यांचे वर्णन पुरेसे बोलके आहे.
‘आज भारताची परिस्थिती मोठी विचित्र आहे. विचार स्वैर होत चालला आहे. चिंतन खोलात जात नाही. आचारात संयम नाही. निष्ठा तुटत आहेत. जुने विश्वास टिकत नाहीत आणि नव्या निष्ठा बनू लागलेल्या नाहीत. परिणामी केव्हा कोणती दुर्घटना घडेल हे सांगता येत नाही. सत्याग्रहच या भयंकर स्थितीत बचाव करू शकतो.’ समाजकारणातील प्रत्येक व्यक्तीने कायमचे लक्षात ठेवावे असे हे चिंतन आहे. विनोबांनी वर्णन केलेली परिस्थिती १९४०च्या दशकात जगभर होती. १९४८ नंतर देशात आणखी अस्थिरता होती. अशा वेळी रस्त्यावर उतरून सत्याग्रह करणे योग्य नव्हते आणि ती विनोबांची वृत्तीही नव्हती. गीतेतील भक्त लक्षण अंगी बाणवत ते विधायकतेचा म्हणजे सत्य, प्रेम आणि करुणेचा संदेश सांगत देशभर फिरू लागले. त्यांची मानवी समाजाविषयची नव्हे तर साऱ्या सृष्टीविषयीची धारणा त्यांच्या एका उक्तीमधून ध्यानात येते : ‘सृष्टीची पूजा होऊन चुकली आहे. माझा नमस्कार तेवढा बाकी आहे.’
या भूमिकेपासून मानवी समाज ढळतो आणि पुन्हा त्याच भूमिकेकडे वाटचाल सुरू करतो. या प्रवासात त्याला प्रत्येक काळात ‘विधायकाचार्य’ सोबत करतात. गेल्या शतकात ही भूमिका विनोबांनी बजावली.
jayjagat24@gmail.com