अतुल सुलाखे

‘कोणत्या तरी नित्य यज्ञाशिवाय राष्ट्र उभे राहू शकणार नाही.’ – विनोबा, विचारपोथी.

अहिंसा आणि सत्याग्रहाच्या पायावर सुरू झालेले स्वातंत्र्य लढय़ाचे अंतिम पर्व हिंसेचे ठरले. वस्तुत: अनेक कोंडींतून बाहेर पडणे ही गोष्ट तेव्हा महत्त्वाची होती. तथापि हिंसाचार समाप्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वेळ काँग्रेसवर आली.

या स्थितीत, काँग्रेस विसर्जित करायची, की तिचा कालपरत्वे अस्त होईल हे पहायचे, की तिला अनासक्त कार्यकर्त्यांची संस्था म्हणून रूप द्यायचे आदि मुद्दय़ांवर चर्चा सुरू झाली. सत्तेची चटक लागली म्हणून काँग्रेस समाप्त करावी हा गांधीजींचा आदेश काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी धुडकावून लावला, असा अपप्रचार होतो. मात्र सर्व पातळय़ांवर देशाची झालेली कोंडी आणि नवीन समस्यांची भर, अशा वेळी काँग्रेससारखा पक्ष तत्कालीन राजकारणातून निवृत्त झाला असता तर कोणत्या प्रकारच्या अराजकाला तोंड द्यावे लागले असते याची कल्पनाच केलेली बरी.

या काळात काँग्रेसचे नेते या पक्षाचे नवे रूप कोणते असेल याचा विचार करत होते हेच विशेष म्हणायला हवे. ढोबळमानाने प्लासीच्या लढय़ापासून सुरू झालेला स्वातंत्र्य संग्राम अहिंसा आणि सत्याग्रहाच्या वळणावर आला होता. सत्ता भोगायची की नवसमाजाची निर्मिती करायची या पर्यायांपर्यंत तो पोहोचला होता. काँग्रेसने जबाबदार राजकारणाचा मार्ग निवडला. किमान दोन शतकांचा पाया असणारा स्वातंत्र्य संग्राम वाया गेला नाही, हेच यामुळे सिद्ध होते.

काँग्रेस आणि गांधीजींचे विधायक कार्य यांचा मेळ घालणे हे नवीन राजकारणाचे सूत्र होते. विनोबा म्हणत, ‘गांधीजी नसते तरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असते. तथापि गांधीजींनी देशाला दिलेली चरख्याची देणगी मात्र दुसऱ्या कुणाला देता आली नसती.’

विनोबा हेही म्हणत की, देशाला स्वातंत्र्य मिळणारच होते कारण या देशात रामकृष्ण परमहंसांचा सर्वधर्म समन्वय, अरविंदांची मनाच्या पलीकडे जाण्याची शिकवण आणि गांधीजींची अहिंसा हे तीन स्वतंत्र विचार उदयास आले होते. तथापि विचार व्यापक पातळीवर पोहोचवायचा तर रचनात्मक कार्यक्रमाला पर्याय नव्हता. चरख्यामुळे हा पर्याय मिळाला. चरखा ही गांधीजींच्या प्रतिभेची कमाल होती. गांधीजी गेल्यावरही रचनात्मक कार्याच्या रूपाने देश घडवीत होते.

स्वातंत्र्य प्रत्यक्षात आणण्यासाठी दमदार कार्यक्रम गरजेचा असतो. वर उल्लेख केलेल्या तिन्ही दार्शनिकांनी तत्त्वांसोबत कार्यक्रमही दिला. रामकृष्णांचा सर्वधर्म समन्वय अगोदर त्यांनी अनुभवला आणि नंतर जगाला सांगितला. त्याला पूर्णविराम मानवसेवेनंतर मिळाला. अरविंदांची साधना निव्वळ बंद खोलीमध्ये झाली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी जे प्रकट चिंतन केले ते पाहिले की ही बाब पुरेशी स्पष्ट होते. शरीरश्रमाला प्रतिष्ठा देण्याचा मार्ग गांधीजींनी निवडला नसता तर अहिंसा आणि सत्याग्रह ही तत्त्वे जनतेपर्यंत पोहोचली नसती. या सर्वाच्या मुळाशी चरखा आहे.

सूत्रयज्ञ ते भूदान यज्ञ हा आधुनिक भारताचा प्रवास आहे. यापैकी भूदानाचे मुख्य कार्य नवभारताची घडण करण्याचे होते. लोकशाहीवर चालणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे असे म्हणत असताना आपल्याला सर्वोदयाचा विसर पडत असेल तर लोकशाहीचा घोष हा खोटारडेपणा ठरतो. तसा प्रयत्न या देशाला झेपणार नाही.

jayjagat24@gmail.com

Story img Loader