अतुल सुलाखे
भोळे भाबडे ‘रामचरण’ विनोबांना अंतर्दृष्टी देऊन गेले. परमेश्वराचे दर्शन हुकले म्हणून खंतावलेल्या विनोबांना देवाने फार काळ तिष्ठत ठेवले नाही. मंदिरप्रवेश, जातिनिर्मूलन, शिक्षण अशा रचनात्मक कार्याची उपाख्याने जोडत भूदान नावाचे महाकाव्य सर्वाना आनंद देत विस्तारत होते. एका टप्प्यावर त्याने विसावा घेतला. पंढरपूर ही अत्यंत अचूक निवड होती. भूदान यज्ञाचे हे सार होते.
साम्ययोगाचा पूर्वार्ध म्हणजे विनोबांचे गीता चिंतन. ते विविध रूपांत वाचकांच्या समोर आहे. यातही तीनच ग्रंथ निवडायचे ठरवले- गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन आणि गीताई चिंतनिका- विवरणासह. यांना ओलांडून पुढे जाता येणार नाही.
भूदान यज्ञाचा पैस इतका मोठा की त्यातून सारांश काढणे मोठे मुश्किलीचे काम वाटते. तरीही संपूर्ण भूदान यज्ञाचे सार दोन प्रसंगांमधून सांगता येईल. पहिला प्रसंग मागच्या लेखात येऊन गेला. भोळय़ा रामजीने दिलेले भूदान ‘व्यापुनी दशांगुळे उरणारे’ होते. वस्तुत: ते परमेश्वराचे सगुण दर्शन होते. विनोबा त्याला मुकले. तथापि परमेश्वराने त्यांना तिष्ठत ठेवले नाही.
पंढरपूरला श्रीविठ्ठलाची आणि विनोबांची भेट झाली ते निर्गुण निराकाराचे दर्शन होते. ‘बाबा रे, तुझ्यासाठी निर्गुणाची तजवीज केली आहे, तो प्रसाद तू ग्रहण कर.’ राम, लक्ष्मण, भरत, श्रीकृष्ण आणि उद्धव यांचे स्मरण व्हावे एवढा हा क्षण अमोल होता. सामाजिक आणि आध्यात्मिक या दोन पैलूंचे दर्शन या निमित्ताने झाले. या निमित्ताने विनोबा म्हणाले, ‘‘पंढरपुरात वयाच्या ६३व्या वर्षी प्रथमच मी येत आहे. पण इतके दिवस त्या ठिकाणी मी गैरहजर होतो, अशी ज्या कुणाची समजूत असेल, त्याला माझ्या जीवनाचा पत्ताच लागलेला नाही. जेव्हापासून मला समजू लागले, तेव्हापासून आजतागायत मी पंढरपूरलाच आहे.’’
२९ मे १९५८ रोजी पहाटे साडेचार वाजता विनोबा पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. आधी पुंडलिकाचे दर्शन घेऊन मग पांडुरंगाच्या देवळात गेले. त्यांनी विठ्ठल-मूर्तीला आिलगन दिले. डोळय़ांतून अश्रुधारा झरत होत्या. नंतर रुक्मिणी मंदिरात. तेथे थोडे बोलताना ते म्हणाले, ‘‘आज इथे जी घटना घडत आहे, ती सबंध हिंदूस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी अंकित होण्यासारखी आहे. त्या प्रसंगाने तुम्ही हिंदूस्थानला व्यापक विश्वधर्माकडे नेणार आहात.’’
हाच धागा पकडून विनोबा संध्याकाळच्या भाषणात म्हणाले : ‘‘अजून महाराष्ट्रात चार महिने माझी यात्रा चालणार आहे. तेवढय़ात मला कोणी कितीही जमीन देवो, अथवा न देवो, कोणी मला ग्रामदान देवो अगर न देवो, पण आज मला जे दान दिले, ते देऊन महाराष्ट्राने अधिकात अधिक जे देणे शक्य होते, ते मला देऊन टाकलेले आहे.ही जी घटना आज घडली, ती माझ्या दृष्टीने सर्वोदयाच्या इतिहासातील अपूर्व घटना आहे. या घटनेच्या आधारावर आपल्याला जीवन उभारायचे आहे. जीवनात जे नाना आर्थिक, सामाजिक इत्यादी भेद आहेत, ते आता आपण नाहीसे करू या.’’
काशीची गंगा रामेश्वराला नेण्याची आपली संस्कृती आहे. विनोबांनी भूदानाची ‘कृष्णा’ देशभर श्रमवली आणि शेवटी विठोबाच्या चरणी ती अर्पण केली.
jayjagat24@gmail.com