अतुल सुलाखे
पातंजल योगदर्शनामध्ये यम आणि नियम यांना अत्यंत कळीचे स्थान आहे. यम आणि नियमांना अनुसरले नाही तर पुढची साधना गौण ठरते. आपण नेमक्या गोष्टी विसरतो आणि आसन आणि प्राणायाम यांना प्राथमिकता देतो. सर्वोदयाच्या बाबतीतही असेच घडले का?
गांधीजींच्या हत्येनंतर सर्वोदय समाजाच्या स्थापना संमेलनासाठी देशभरातून सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. राजकारण आणि विधायक क्षेत्रातील मातब्बर मंडळींचा यात समावेश होता. वस्तुत: हे संमेलन महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली होणार होते पण तत्पूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
संपूर्ण काँग्रेस या धक्क्याने हादरली. जवळपास सर्व प्रमुख नेते मार्गदर्शनासाठी विनोबांच्याकडे पाहात होते. गांधीजींचा निकटचा सहकारी आणि त्यांच्या हत्येमुळे विचलित न झालेला नेता अशी त्यांची ओळख होती. स्वराज्यानंतरचे ध्येय सर्वोदय असून त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा साम्ययोग हा मार्ग आहे ही त्यांची भूमिका निवडक मंडळींना परिचित होती.
त्याच वेळी एखादी संस्था आणि संघटना स्थापन करण्याला त्यांची हरकत होती. कोणत्याही संस्थानिर्मितीपेक्षा विनोबांना नुसते काम करणे महत्त्वाचे वाटत होते. संस्था संघटनेत न जाता सेवाकार्य करायचे याकडे त्यांचा कल होता. ही भूमिका त्यांनी गांधीजींच्या समोरही मांडली आणि बापूंनी तिला संमती दिली.
इथे आणखी एक गोष्ट ध्यानात घेणे गरजेचे आहे. संधी असतानाही नेहरू जसे हुकूमशहा झाले नाहीत, तसे विनोबांचेही होते. शक्यता असतानाही विनोबा ‘गांधी’ झाले नाहीत. गांधी म्हणजे संघटनेवर विलक्षण ताबा असणारे व्यक्तिमत्त्व, असा अर्थ घ्यायचा. ब्रिटिशांच्या विरोधात लढताना गांधीजींना अशी भूमिका घेणे गरजेचे होते. आंदोलन सुरू करणे आणि थांबवणे यावर गांधीजींची कमालीची पकड होती. याबद्दल कॉ. डांगे यांनी महात्मा गांधींना आदर्श मानले होते. ते म्हणत ‘एखादे आंदोलन केव्हा सुरू करायचे हे मी लेनिनकडून शिकलो तर ते मागे केव्हा घ्यायचे हे गांधींकडून,’ असे ऐकिवात आहे.
आध्यात्मिक आणि नैतिक अधिकारांत विनोबा गांधीजींच्याही एक पाऊल पुढे होते. नवीन सत्तेला अशा अधिष्ठानाची गरज असते. निव्वळ दंडशक्तीवर शासन करता येत नाही. तसेच सत्ताधाऱ्यांना सत्तेत राहून असा आवसुद्धा आणता येत नाही. अशोक, अकबर यांनी घेतलेला धर्माश्रय बोलका आहे. काँग्रेसने विनोबांकडे मार्गदर्शन मागितले याचा हा अर्थही असावा.
उद्घाटनाच्या भाषणात विनोबांनी अशा शक्यता पिटाळून लावल्या. ‘मैं बापू का पाला हुआ जंगली जानवर हूँ’ या वाक्याने श्रोत्यांना थोडी मजा वाटली पण विनोबांचा संदेश स्पष्ट होता. पुढे विनोबांनी साधनशुचितेचा आग्रह धरला. साधनांचा रंग साध्यावर चढायचा म्हणून उत्तम ध्येयासाठी साधनेही उत्तम असली पाहिजेत. दरेकाला आपले ध्येय योग्य वाटते. परंतु किती का भिन्न ध्येये असेनात त्यांच्या पूर्तीसाठी हिंसा आणि असत्य यांचा उपयोग तर करायचाच नाही. याबाबतीत सर्वजण मिळून एक आघाडी करू शकले तर ती फार मोठी कामगिरी ठरेल.
पहिल्यांदा हाच विचार स्थिर करा, की आम्हाला शुद्ध साधनेच वापरायची आहेत. ज्यांचा असा निश्चय असेल ते सगळे आमचेच सहकारी आहेत असे समजावे. गांधीजींचा विचार घेऊन आम्हाला जनतेत जायचे आहे. त्यांचा मुख्य विचार साधनशुद्धीचा होता. हाच विचार दृढ करून इतर सारे विचारभेद आपण जर गौण समजू तर किती चांगले होईल! सर्वोदय अथवा साम्ययोग दर्शनाचे हे यम-नियम सदैव स्मरणात ठेवावेत असे आहेत.
jayjagat24 @gmail.com