अतुल सुलाखे
सत्याग्रह म्हणजे शत्रूची हृदयशुद्धी. तीही सत्य, प्रेम व अहिंसेच्या आधारे, हा आदर्श आपल्यासमोर गांधीजींनी ठेवला. या मार्गाचे संशोधन विनोबांनी केले म्हणजे नेमके काय केले? समोरच्याकडचे सत्य ग्रहण करण्याचा विचार मांडला. स्वराज्य, लोकशाही आणि विज्ञान हे युगधर्म ध्यानी घेऊन भविष्यातील सत्याग्रहांची आखणी केली पाहिजे ही ठाम भूमिका मांडली. सरकार बधत नसेल तर तुम्ही तुमचे विचार घेऊन लोकांमध्ये जा. त्यांच्याशी बोलून लोकशाही मार्गाने सत्तेत या असे त्यांचे म्हणणे होते. यापुढील सत्याग्रह हे रचनात्मक आणि अहिंसेच्या पलीकडे जाणारे हवेत, असे ते म्हणत.
तथापि तत्कालीन सत्ताधारी आणि विरोधक या दोहोंना सत्तेचा मोह सुटला. स्वातंत्र्य चळवळीची परंपरा ही सत्ताधाऱ्यांची ताकद होती तर हे सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्णपणे अक्षम असून या स्वातंत्र्याने आमचा भ्रमनिरास झाला, ही विरोधकांची तक्रार होती. परिणामी गांधीजीप्रणीत सत्याग्रहाला जवळपास सोडचिठ्ठी मिळाली. अहिंसा, सत्य हे शब्द अक्षरश: कुणीही वापरू लागले. तसे आचरण करण्याची आवश्यकता नाही यावर जवळपास एकमत झाले. तो मार्ग घेऊन समाजकारण करू पाहणारे समूह उघडच मुख्य प्रवाहातून फेकले गेले.
गांधीजींनी सत्याग्रह करताना प्रल्हादाचा आदर्श समोर ठेवला तर विनोबांनी जीवन्मुक्त शुक मुनींचा. सत्याग्रहाच्या मार्गात विनोबांनी केलेले हे संशोधन मान्य होण्यासाठी अक्षरश: काही शतके लागतील इतके ते सूक्ष्म तरीही भव्य आहे. इथेही विनोबा परंपरेचा नवा अर्थ लावतात. त्यांच्या मते, आपल्या शत्रूविरुद्ध सत्याग्रह करणे फार सोपे आहे, तथापि सज्जनांचा गट अथवा व्यक्ती चुकीच्या दिशेने जात असतील तर त्यांना मुक्तीच्या मार्गाला लावणे हे खरे आव्हान आहे.
प्रल्हादाचा सत्याग्रह हा दुष्ट पित्याविरुद्ध होता. त्याचा मार्ग आदर्श असला तरी शेवट तसाच झाला असे म्हणता येणार नाही. शुकाचार्याचे तसे नव्हते. आपल्या महाकवी पित्याला त्यांना जीवन्मुक्तीच्या मार्गावर आणायचे होते. बालपणीच ते सर्वज्ञ बनले. पित्याकडूनच त्यांनी विद्या ग्रहण केली आणि त्याच्या आज्ञेनुसार परीक्षिताकडे भागवत सांगण्यासाठी ते गेले. पुढे लहान वयात तपश्चर्येसाठी ते निघाले तेव्हा व्यासांना मुलाचा विरह असह्य झाला. दिगंबरावस्थेत तपश्चर्येसाठी निघालेले आणि त्यांच्या नावाचा पुकारा करत मागे जाणारे दु:खी व्यास असे चित्र होते. वाटेमध्ये स्नान करणाऱ्या काही स्त्रिया व्यासांना दिसल्या. त्यांना पाहून त्या महिलांनी वस्त्रे परिधान केली. दिगंबरावस्थेतील शुक पाहून त्या विचलित झाल्या नाहीत, पण माझ्यामध्ये त्यांना विकार दिसले. व्यासांना जीवनार्थ समजला. केवळ कृतीमधून जीवनाचे सार सांगणे हा विनोबांच्या दृष्टीने आदर्श सत्याग्रह होता.
रामायणातील भरत-रामभेट आणि भरताने रामाची आज्ञा मान्य करणे, संत एकनाथ आणि हरिपंडितांचा संवाद, चांगदेव आणि ज्ञानेश्वरांची भेट, मुक्ताबाईने ज्ञानदेवांना केलेला उपदेश, अशी सज्जनांच्या हृदय शुद्धीकरणाची असंख्य स्थळे परंपरेत आहेत.
खुद्द गांधीजी आणि विनोबांच्या चरित्रात अशा सत्याग्रहांची एवढी उदाहरणे की त्याआधारे त्यांचे चरित्र सांगता येईल. विनोबांचे हे संशोधन ‘सत्याग्रह’ ते ‘सत्यसंधता’ असे आहे.
jayjagat24@gmail.com