साम्ययोगाच्या अर्थविचारात गाव आणि श्रीकृष्ण या दोहोंना कळीचे स्थान आहे. साम्ययोगाची अर्थनीती मुख्यत: गावाची अर्थनीती असेल असे सांगताना विनोबा या अर्थनीतीला कृष्णाची अर्थनीती म्हणतात. खेडय़ांच्या प्राथमिक गरजा खेडय़ातच पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यासाठी खेडे परावलंबी असू नये, असे त्यांचे म्हणणे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोकुळातील माणसांनी दूध, लोणी आदी वस्तू मथुरेत जाऊन विकाव्यात आणि तिथून पैसा आणावा ही गोष्ट कृष्णाला मान्य नव्हती. मथुरेला लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणींना कृष्ण अडवतो हे आपल्यासाठी शृंगाररसाचे दर्शन असते. विनोबांना मात्र यात कृष्णाचे अर्थशास्त्र दिसते.

गोवर्धनाची पूजा करा- इंद्राची नाही असे बजावणारा कृष्ण स्वयंपूर्ण गोकुळासाठी प्रयत्न करणार, यात सुसंगती आहे. शिवाय त्याच्या समकालीनांमध्ये तो सर्वोच्च राजनीतिज्ञ होता. राजनीतीमध्ये अर्थविचार येतो ही गोष्ट लक्षात घेतली तर कृष्णाची अर्थनीती ध्यानात येते. विनोबांनी गीताईमधील पुढील श्लोक अर्थशास्त्राचे सूत्र म्हणून सांगितल्याचे दिसते.

तोषला ज्ञान-विज्ञानें स्थिर जिंकूनि इंद्रियें
तो योगी सम जो देखे सोनें पाषाण मृत्तिका

(गीताई अ. ६, श्लो. ८)
श्लोकातील दुसरा चरण म्हणजे अर्थशास्त्र इतक्या थेटपणे विनोबांनी आपले मत मांडले होते. थोडक्यात गोकुळ ते कुरुक्षेत्र एवढा श्रीकृष्णाच्या अर्थशास्त्रज्ञतेचा पैस होता.

विनोबांनी भारतातील खेडय़ांचा ऐतिहासिक प्रवास मोजक्या शब्दांत सांगितला आहे. ‘भारत हा स्वतंत्र खेडय़ांचा देश होता. मुस्लीम राजवटीत तो स्वतंत्र खेडय़ांचा गुलाम देश बनला. आणि ब्रिटिश राजवटीत तो गुलाम गावांचा गुलाम देश झाला. भारताला स्वतंत्र गावांचा स्वतंत्र देश बनवणे हे आपले ध्येय आहे.’विनोबांच्या अर्थकारणात, प्रत्येक निरोगी आणि प्रौढ व्यक्तीला काम असणे, हा विचार केंद्रस्थानी दिसतो. देशातील प्रत्येक व्यक्तीला राज्यकर्त्यांनी उत्पादक काम दिले आणि त्यांनी दुसरे काही केले नाही तरी चालेल असे ते म्हणत. यावरून उत्पादक कामाला त्यांच्या लेखी असणारे स्थान समजते. आता सर्वाना काम द्यायचे असेल तर ग्रामोद्योगाशिवाय दुसरा पर्याय नाही. विनोबांना रोजगाराच्या बाबतीत थेट कृती अपेक्षित आहे. आश्वासने नाहीत. यासाठी ग्रामोद्योग निवडण्याचे कारणही त्यांनी दिल्याचे दिसते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशाची अर्थनीती प्रामुख्याने ग्रामीण अर्थनीतीच राहणार. शेतीसाठी खेडी अनिवार्य आहेत. खेडी राहणारच हे लक्षात ठेवून उद्योगांचा विचार करावा लागेल. भुकेलेल्या माणसाला आजच खायला मिळाले पाहिजे. तेसुद्धा केवळ शरीर टिकून राहण्यापुरते नव्हे. मानवी मूल्ये कायम राहिली पाहिजेत. मनुष्याला दीन बनवले जाऊ नये. बेकारी भत्ता देणे नैतिक दृष्टीने हानीकारक आहे. त्यामुळे गावा-गावांत उद्योग उभे राहिले पाहिजेत. गावात निर्माण होणाऱ्या कच्च्या मालापासून गावातच पक्का माल बनला पाहिजे.

विनोबांच्या अर्थशास्त्राची ही रूपरेषा आहे. भूदान, ग्रामदान या त्यांच्या कार्यामागे ही भूमिका आहे. गीतेचा प्रवक्ता श्रीकृष्ण आहे हे सर्वविदित असते. तथापि भूदानाचा प्रवक्ताही तोच होता हे लक्षात घ्यावे लागते. तो विनोबांच्या मुखातून बोलला आणि चालला इतकेच. भूदानाचा घोष ‘‘सबहि भूमी गोपालकी’’ असा होता यातच सर्व काही आले.- अतुल सुलाखे
jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog skylark thought artical about acharya vinoba bhave amy