अतुल सुलाखे
ऋत (महान् सत्य), प्रखर नैतिक आचरण, शुभ कार्याचा निश्चय, तपश्चर्या, वैदिक स्वाध्याय किंवा ब्रह्मज्ञान आणि विश्वकल्याणासाठी समर्पित जीवन यामुळे पृथ्वीची धारणा होते. या पृथ्वीने भूतकाळात सजीवांचे पालन आणि रक्षण केले आणि ती भविष्यातही करेल. अशा प्रकारे ही पृथ्वी आम्हाला आधार देते. – अथर्ववेद
भारतीय परंपरेत वैश्विक कल्याणाचा विचार सहजगत्या दिसतो. आपल्या देवाचे नावच ‘विश्व’ आहे. भौगोलिकदृष्टय़ा हे विश्व लहान असले तरी त्याचा आध्यात्मिक आकार विशाल आणि प्रभाव अविनाशी आहे.
या विश्वाभोवती केलेल्या कल्पना आजही मार्गदर्शक आहेत. विश्वाप्रमाणेच ही पृथ्वीही श्रमणीय आणि नमनीय आहे. या पृथ्वीचे जतन केले पाहिजे. तिची सेवा केली पाहिजे, असा आग्रह प्राचीन ग्रंथांमध्ये दिसतो. जोवर पर्वत आहेत, दाट वनराजी आहे तोवर ही पृथ्वी टिकून राहील आणि पर्यायाने आपली संतती टिकून राहील ही शहाणीव आहे.
विनोबांनी केलेला ‘जय जगत्’ हा घोष या संस्कृतीचे वहन करणारा आहे. या घोषाला भूदानाचा संदर्भ आहे. ही गोष्ट १९५७ मधील. भूदान यात्रा तेव्हा अगदी जोशात होती. ही पदयात्रा कर्नाटकातील, तुमकुर जिल्ह्यात पोचली. तिथल्या ‘कडवा’ गावात विनोबांनी ‘जय जगत्’ हा घोष पहिल्यांदा केला. आज हा घोष म्हणजे विनोबा विचारांची अतूट ओळख आहे.
आधुनिक काळात जगताचे समग्र ऐक्य हा विचार महात्मा गांधींचा. त्यांनी, दुसऱ्या महायुद्धानंतर, ‘हे जग एक झाले नाही तर किमान मी तरी तिथे राहणार नाही,’ असे स्वच्छ शब्दांत सांगून टाकले होते. गांधीजींच्या नंतर त्यांच्या अनेक कल्पनांना विनोबांनी मूर्त रूप दिले त्यामध्ये ‘जय जगत्’चाही समावेश होता. या ‘जय जगत्’ला, भारतीय परंपरेचे अधिष्ठान आहे.
कर्नाटकात एकदा हा घोष केल्यानंतर, विनोबांनी नंतरच्या आपल्या स्वाक्षरीत, ‘जय जगत्’चा आवर्जून समावेश केला. भविष्यात जय भारत किंवा कोणत्याही एका देशाच्या जयजयकाराने काम होणार नाही तर अखिल विश्वाचा जयजयकार करावा लागेल, असा विनोबांचा विचार होता. त्यांची कृतीही या विचाराला साजेशीच राहिली. विनोबांनी १९५८ मध्ये या अनुषंगाने एक पुस्तकही लिहिले.
श्रीविष्णुसहस्रनामामध्ये पहिल्याच नामावर ‘विश्वम्’वर टिप्पणी करतानाही, त्यांनी ‘जय जगत्’चा संदर्भ दिला आहे. आधी विश्व मग विष्णू ही आपली परंपरा आहे अशी विनोबांची भूमिका होती. वेद, उपनिषदे, पसायदान, संतपरंपरा, श्रमण संस्कृती आणि सर्वोदय, हे सर्व त्यांनी ‘जय जगत्’मध्ये पाहिले. विजय दिवाण लिखित विनोबा चरित्रात या घोषाची अत्यंत नेमकेपणाने उकल केल्याचे दिसते. दिवाण, त्याला एक मंत्र मानतात. त्यांच्या शब्दात सांगायचे तर ‘शासनमुक्त अहिंसक समाजरचना निर्माण व्हावी म्हणून विनोबांनी अनेक विचार मांडले. त्यासाठी त्यांनी काही योजना आणि कार्यपद्धतीही आखून दिली. मात्र त्यांच्या विचारांचे सर्व सार, त्यांनी लिहिलेल्या जय जगत् या मंत्रात आहे. हा मंत्र म्हणजे विनोबांचा संदेश आहे. उपदेश आहे. आदेश आहे. जगाला संदेश भारताला उपदेश आणि आपल्या अनुयायांना आदेश.’
jayjagat24 @gmail.com