‘मी संजय, महाभारतातला समालोचक. तसा मी राजा नसलो तरी कुणाशी बोलायचे व कुणाशी नाही हे ठरवत असतो. पण आता अगदीच नाईलाज झाल्याने मला तुझ्या स्वप्नात यावे लागले. तर सांगायचा मुद्दा असा की, अलीकडे तू जे काही बोलू (मी बरळू म्हणणार नाही) लागला आहेस त्यातून माझीच बदनामी होतेय असे मला तीव्रतेने वाटू लागले आहे. नामसाधर्म्यामुळे असेल पण हे योग्य नाही. सत्तेच्या विरुद्ध युद्ध लढतोय असा दावा रोज सकाळी तू करतोस. पण हे करताना तू असत्य व निराधार कल्पनांचा आधार का घेतोस? मी २१ दिवस चाललेल्या १८ औक्षिणीच्या युद्धात सहभागी झालो पण जे दिसले तेच धृतराष्ट्राला सांगितले. त्यामुळे मी त्यांचे डोळे होऊ शकलो. तू ही किमया कधी साधणार? तू तुझ्या पक्षाचा प्रवक्ता. तेव्हा तू पक्षातल्या घडामोडींची माहिती देणे व सत्ताधाऱ्यांनी काही चुकीचे केले तर त्यावर प्रहार करणे समजून घेता येईल. पण सत्ताधाऱ्यांच्या पक्षात काय चालले हे सांगण्याचा तुला अधिकार काय? विश्वप्रवक्ता समजायला लागलास की काय स्वत:ला? तुझ्या या कलागतीने त्यांच्यात भांडणे होतील असे तुला वाटते काय? मध्यंतरी तू वर्षा बंगल्यात हाडे पुरलीत. काळ्या जादूचे प्रयोग होणार असे काहीबाही बोलला. तुझा हाही फासा उलटा पडला. द्याुतात हाडांच्या कवळ्या घेऊन प्रतिस्पर्ध्यांना चीत करणारा शकुनीमामा कुठे व तू कुठे? कधी विचार केला का यावर? की नुसते तोंडाला येईल तेच बोलत सुटणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे व फडणवीसांमध्ये भांडणे लावून तुझा पक्ष सशक्त होईल असे वाटते का तुला? आधी स्वत:च्या पक्षाचे बघ ना! रोज कुणीतरी सोडून चाललाय. जे आहेत तेही मारूनमुटकून असल्यागत. या साऱ्यांना अडथळा वाटतो तो तूच. हे कधी लक्षात घेणार आहेस? अरे, सार्वजनिक जीवनातली एकनिष्ठता ही त्यात सक्रिय असलेल्या साऱ्यांच्या विश्वासावर अवलंबून असते. मी धृतराष्ट्राच्या जवळ होतो म्हणून इतरांना कमी लेखले नाही. त्यामुळेच सर्वांचा आदरार्थी होऊ शकलो. अडीच हजार वर्षांपासून चालत आलेले हे वैश्विक सत्य तू लक्षात कधी घेणार? अरे, मी ज्यांच्याशी एकनिष्ठ होतो त्यांच्या भलेपणाचा विचार सर्वांत आधी केला. तू निष्ठा तर सोड, त्यांनाच शक्तिहीन करायला निघाला आहेस, हे तुला जाणवत कसे नाही? आमचे युद्ध श्रीकृष्ण, भिष्मासारख्या धुरंधरांशी होते. त्या तुलनेत तुझी लढाई फारच चिल्लर. तीही तुला नीटपणे लढता येऊ नये? युद्धाचे वर्णन करताना मी थोडे जरी खोटे वा अतिरंजित बोललो असतो तर धृतराष्ट्राने मला चटकन बाजूला सारले असते.

मुद्दा यशाचा असो वा अपयशाचा. जे युद्धभूमीवर दिसले तेच मी सांगत राहिलो. तू अपयश दडवून यशाचे फुगे रोज फुगवतोस. त्यातले अनेक फुटतातही, तरीही तुला दूर का सारले जात नाही असा प्रश्न मला पडलाय. तू ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी इतकी घट्ट कशी हे किमान मला तरी न उलगडलेले कोडे. अर्थात याची उत्तरेही मला नकोत. मात्र तू दुरुस्त व्हावास अशी आशा आहे. तेही संजय या नावाची आणखी बदनामी नको म्हणून! असेल तुझी तयारी तर हो दुरुस्त, अन्यथा तू आणि तुझे नशीब. चाललो मी आता. बाय!’ स्वप्न संपताच राऊतांना जाग आली. घशाला पडलेली कोरड शमविण्यासाठी ते गटागटा पाणी प्याले. मग सकाळच्या सत्रातील बडबडीसाठी एखादी अतर्क्य कल्पना सुचते का यावर त्यांचे डोके खाजवणे सुरू झाले.