संकष्टीचा उपास सोडण्याची वेळ, श्रीकृष्णजन्माची वेळ आणि नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाची वेळ यातलं समान सूत्र ‘काळाचे गणित’ सोडवताना लक्षात येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकष्टीचा उपास करणाऱ्या मंडळींना त्या दिवशीचा चंद्रोदय कधी होणार हे नेमकं माहीत असतं. कारण चंद्रोदय झाल्याशिवाय उपास सोडायचा नाही अशी पद्धत आहे. कधी कधी चंद्रोदय नऊ-सव्वानऊच्या सुमारास होतो आणि मंडळी हुश्श करतात. पण कधी कधी मात्र या चांदोबाचा रात्री दहा-साडेदहा वाजले तरी पत्ता नसतो. भुकेने जीव अगदी कासावीस होतो.

आता हे नेमकं का होते ते पाहू. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र उगवतो तेव्हा नेमका सूर्यास्त होतो. रात्रभर हा चंद्र पूर्व ते पश्चिम असा प्रवास करून मावळतो तेव्हा नेमका सूर्योदय होत असतो. पण सूर्याच्या तुलनेत चंद्र दर दिवशी पाऊण तास मागे पडतो. त्यामुळे होतं काय तर कृष्ण प्रतिपदेला सूर्यास्त झाला तरी चंद्र काही दिसत नाही. तो सूर्यास्तानंतर सुमारे पाऊण तासाने उगवतो.

आणि कृष्ण चतुर्थीला, अर्थात, संकष्टीला तो सूर्यास्तानंतर सुमारे तीन तासांनी उगवतो. चार दिवस × पाऊण तास = तीन तास. हिवाळ्याच्या दिवसांत सूर्यास्त साधारण सहाच्या सुमारास होतो. त्यामुळे नऊ-सव्वानऊपर्यंत चंद्रोदय होतो. पण हेच उन्हाळ्याच्या दिवसात मुळात सूर्यास्तच सात-सव्वासातच्या सुमारास होतो. साहजिकच चंद्रोदयाची वेळ दहा-साडेदहापर्यंत पुढे जाते.

तरी नशीब, हा चंद्रोदय पाहून सोडण्याचा उपास कृष्ण चतुर्थीला असतो. हा जर कृष्ण एकादशीला करायचा असता तर पार उत्तररात्रीपर्यंत उपास करावा लागला असता!

आता पुढची गंमत पाहा. कृष्ण अष्टमीला सूर्यास्तानंतर सुमारे सहा तासांनी चंद्रोदय होतो. आठ दिवस × पाऊण तास = सहा तास. सूर्यास्तानंतर सहा तास म्हणजे जवळजवळ मध्यरात्रीचा सुमार. म्हणून तर श्रीकृष्ण जन्मले (गोकुळाष्टमी – श्रावण वद्या अष्टमी) तेव्हा मिट्ट काळोख असणार. सूर्य कधीचाच मावळला. आणि चंद्र नुकताच उगवतो आहे. हा चंद्रही अर्धामुर्धा. आणि त्यातून पावसाचे दिवस!

आणखी पुढे जाऊ. कृष्ण चतुर्दशी. या दिवशी सूर्यास्तानंतर सुमारे दहा-साडेदहा तासांनी चंद्र उगवतो. किंवा, सूर्योदयापूर्वी सुमारे तासभर. आणि आश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी अभ्यंगस्नान करायचं असतं हे माहीत असतं आपल्याला. बहुतेकांना असं वाटतं की ते पहाटे कधीतरी करायचं असतं. काहींना वाटतं की ते सूर्योदयापूर्वी करायचं असतं. पण तसं नाही. हे स्नान चंद्रोदयापूर्वी करायचं असतं. आणि त्या दिवशी चंद्रोदय सूर्योदयापूर्वी सुमारे अर्धा-पाऊण तास होतो. पूर्व क्षितिजावर ही चंद्रकोर मोठी मोहक दिसते.

संकष्टीचा उपास, श्रीकृष्णजन्मोत्सव आणि नरकचतुर्दशीचं अभ्यंगस्नान यांमागचं हे ‘काळाचं गणित’ पाहिलं की मोठं आश्चर्य वाटतं, आपल्या पूर्वजांविषयी आदर वाटतो आणि थोडं वाईटही वाटतं. कारण हे सगळं इतकं बांधीव आहे, तर्कशुद्ध आहे आणि आपलं मात्र याकडे कधी लक्षही जात नाही. असो.

मागे शुक्लपक्षात सूर्यास्ताच्या वेळेस चंद्राची स्थिती दर्शवणारी आकृती दिली होती. कृष्णपक्षात सूर्यास्ताच्या वेळेस चंद्राचं स्थान दाखवणारी आकृती काढणं शक्यच नाही. कारण कृष्णपक्षात सूर्यास्ताच्या वेळेस चंद्र आकाशात नसतोच. म्हणून तर कृष्णपक्षात चंद्रास्त दिसत नाही. पण चंद्रोदय मात्र निश्चित दिसतो. आणि आजची आकृती सूर्योदयाच्या वेळेस आकाशात चंद्राचं स्थान काय असतं ते दाखवणारी आकृती आहे.

एक लक्षात घ्या, हा ‘कृष्णपक्ष’. कृष्ण म्हणजे काळा पक्ष. आणि त्याचीही कारणं दोन. एक तर चंद्राची कोर दिवसेंदिवस आक्रसत जाते आणि ती आक्रसलेली कोरदेखील कमी-कमी काळ आकाशात दिसते.

आता, या सगळ्या विवेचनाचा सारांश असा:

● शुक्लपक्षात चंद्राची कोर अधिकाधिक मोठी होते. ती जास्त-जास्त काळ आकाशात दिसते. कृष्णपक्षात ती अधिकाधिक क्षीण होते आणि कमी-कमी काळ आकाशात दिसते.

● शुक्लपक्षात चंद्रोदय दिसणं अशक्य. चंद्रास्त मात्र निश्चित दिसतो. तेच कृष्णपक्षात चंद्रास्त दिसणं अशक्य. पण चंद्रोदय मात्र नक्की दिसतो.

कृष्ण अष्टमी. गोकुळाष्टमी. मध्यरात्री चंद्रोदय. सूर्योदयाच्या सुमारास चंद्र माथ्यावर

कृष्ण चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. सूर्यास्तानंतर सुमारे तीन तासाने चंद्रोदय. सूर्योदयाच्या सुमारास सूर्य पश्चिम आकाशात

कृष्ण चतुर्दशी. नरकचतुर्दशी. सूर्योदयापूर्वी सुमारे तासभर चंद्रोदय. पूर्व क्षितिजावर नाजूक कोर

@KalacheGanit
kalache.ganit @gmail.com