राजेश बोबडे
‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेचे प्रवर्तक असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जपान येथील विश्वधर्म परिषदेत १८ राष्ट्रांनी सल्लागार म्हणून निवडले होते. त्याच अनुषंगाने तुकडोजी महाराजांनी ५ डिसेंबर १९५६ मध्ये दिल्ली येथे विज्ञान भवनात आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को परिषदेत विविध राष्ट्रप्रमुखांसमोर व परिषदेचे अध्यक्ष तत्कालीन लोकसभाध्यक्ष अय्यंगार व उद्घाटक पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, देशातील नेतेच एकत्र येत नाही तर इतर समाज कसा येणार? राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये ऐक्य कसे निर्माण होणार? प्रत्येक जण विश्वव्यापी बोलतो, पण प्रत्येकाचा सवतासुभा अलग! अशाने कसं व्हायचं? मी कोणत्याही जाती, धर्माचा व पंथाचा नाही. मी मानवता हाच माझा धर्म मानतो. ‘आज जगाची अवस्था अत्यंत विस्फोटक आहे. या परिस्थितीत शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या सिद्धान्ताला फाटा मिळणार की काय अशी भीती वाटत आहे. विचारवंत आज घाबरलेल्या मन:स्थितीत आहेत.
हेही वाचा >>> चिंतनधारा : मानवधर्माचा पुरस्कार करीत जगा..
युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून ही स्थिती सावरली जाऊ नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा देखावा करण्यात येत असला, तरी मुळात राष्ट्रे एकहृदयाने, एकमेकांच्या साहाय्यार्थ संघटितच झालेली नाहीत असे वाटते. तेव्हा प्रश्न आहे तो सर्वांनी मिळून हृदयपूर्वक जगातील जीवनसमस्या सोडविण्याचा! त्याकरिता मानवी मनाची अवस्था एका अत्युच्च पातळीपर्यंत उंचावणे जरुरीचे आहे. मानवी जीवनाचा व्यापक साक्षात्कार होऊन जीवमात्राविषयी सहृदयताच नव्हे, तर आत्मभाव निर्माण झाल्याशिवाय कुणी कुणावर उगाच प्रेम करणार नाही.. आपण प्रत्येकाने या भावनेचे पालन केले आणि जगाला आपले कुटुंब मानले तर जगात शांती प्रस्थापित होऊ शकते..’ विज्ञानाचे सामर्थ्य आणि चमत्कार अवर्णनीय असले तरी ते मानवी समाजासाठी उपयुक्त नसून मानवतेचा नाश करणारे असेल तर त्याला काही किंमत नाही.. ही आपली परम शक्तिहीनता आहे, तरीही अणुबॉम्बची सज्जतेची भीती आहेच. आपल्या या शक्तीचा उपयोग काय, ही भीती जगातून काढून टाकण्यासाठी प्रत्येक राष्ट्रामध्ये आत्मविश्वासाची गरज आहे. आत्मविश्वासाशिवाय शांततापूर्ण सहअस्तित्व आणि नि:शस्त्रीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही प्रभावी मार्ग असू शकत नाही. ही समस्या कोणत्याही भौतिक तत्त्वज्ञानाने सोडवली जाऊ शकत नाही. भारताचे आदर्श, जीवनाचे तत्त्वज्ञान, आध्यात्मिक विचार या दिशेने खूप उपयुक्त आहे. ‘नि:शस्त्रीकरण आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचा विचार नुकताच युनोमध्ये मांडण्यात आला. ज्या राष्ट्राने ही कल्पना मांडली ते तरी आज या तत्त्वाचे पालन करते काय? एखाद्या राष्ट्राने मानवजातीच्या अंतिम विकासासाठी स्वत:ची शस्त्रे समुद्रात बुडवली, तर त्याची नुसती घोषणा करण्याचा सक्रिय परिणाम राष्ट्रावर होतो. राष्ट्रांच्या विकासाकरिता व जागतिक शांततेसाठी प्रथम नेत्यांनीच एकत्र येण्याची गरज आहे.’ महाराज भजनात म्हणतात.
दिल-मनसे गाऊंगा तेरा भजन ।
सब नेताओंमे कर दे मिलन ।
तब दुर हो मेरे दिलकी जलन ।।
rajesh772@gmail.com