राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महात्मा गांधी व तुकडोजी महाराजांचे जिव्हाळयाचे संबंध असले तरी गांधीजींचा अहिंसेचा अत्याग्रह महाराजांना कधीच मानवला नाही असे म्हणता येईल. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी क्रांतीचे रणशिंग फुंकून १९४२ सालच्या क्रांतीलढयात चिमूर, आष्टी, यावली व बेनोडो ही गावे दोन दिवस ‘ब्रिटिशमुक्त’ केल्याने महाराजांना तुरुंगात डांबले गेले. अनेक जण शहीद झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रथम अध्यक्ष क्रांतिसिंह गुलाबराव वाघांना फाशीची शिक्षा इग्रंजानी सुनावली. केवळ भजने व भाषणे न करता अन्याय, अनीतीच्या विरुद्ध तुकडोजी महाराजांनी नेहमीच क्रांतिकारक भूमिका घेतली, म्हणूनच महाराजांना संतांमधील ‘क्रांतियोद्धा’ संत असेही म्हटले जाते. एका भजनात महाराज म्हणतात :

कहे तुकडया आँधी लाऊ।

मैं भी मरकर जी जाऊ।

कुछ क्रांती करू लगता है,

इस जोशकी लाट उठा दे।।

हेही वाचा >>> लोकमानस : आताची परिस्थिती आणीबाणीहून भयानक

जनतेवर ब्रिटिशांचे अत्याचार पाहून महाराज लोकांना म्हणत, अरे पूजापाठ, यज्ञयागाने आता भागायचे नाही !गोऱ्या साहेबांच्या जाचाचा प्रतिकार करण्यासाठी गीतेतील कृष्णनीतीप्रमाणे धार्मिक लोकांनी अधार्मिक परिस्थिती बदलणं हे आपलं काम नाही काय ? ब्रिटिशांचा पूर्वानुभव पाहता तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमात १९४२ मध्ये ‘श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म शिक्षणवर्गा’ची स्थापना करून त्यात लाठीकाठी, धनुर्विद्या, तलवारबाजी, मैदानी खेळ यांसोबत बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देऊन  राष्ट्रसंरक्षणार्थ वीर तरुणांच्या फौजा तयार करण्याचे देशकार्य सुरू केले. ‘‘इग्रंजानी देशाची केलेली दुर्दशा, जनतेवर चालविलेले अत्याचार याचे दारुण चित्र तरुणांपुढे उभे करताना महाराज म्हणतात : अरे ऊठ, कसला कर्मजंजाळ आणि पूजापाठ घेऊन बसला आहेस! दाराशी गुंडांचा गोंधळ चालू असता तू देव्हाऱ्यापुढे टिन्मणी वाजवून येतो म्हणतोस? मर्दा! हातात न्याय्य शस्त्र घे आणि देवाला सांग की मानव धर्माचा पुरस्कार करीत जगलो तरच वापस येईन नाहीतर दुर्जनांशी लढून प्राणाची आहुती देईन! कोटयवधी दीन जीवांच्या उजाड झालेल्या झोपडय़ांना फिरून स्वर्गाचे सौंदर्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्व शक्ती/युक्ती उपयोगात आणणे हीच आता माझी देवपूजा व धर्मसेवा आहे. यातच श्रेष्ठत्वाची निर्मिती भरली आहे! महाराज साधूसंतांना, कीर्तनकार-पुराणिकांना देखील अधिकारवाणीने असेच सांगायचे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महाराज ज्वलंत स्फूर्तिकेंद्र बनले होते. महाराज भजनात म्हणतात : 

राष्ट्र जागवा- राष्ट्र जागवा;

जागृत व्हा तरुणांनो ! अमुच्या ।

वीरवृत्तिचा दिवा उजळवा,

जागृत व्हा तरुणांनो ! अमुच्या ।

तुकडयादास म्हणे ही कहाणी,

सांगा हो ! जनतेला ।।

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant tukdoji maharaj revolutionary role against injustice and iniquity zws