अतुल सुलाखे
जैन परंपरेत स्यादवाद आणि अनेकांतवाद या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. एखाद्या गोष्टीचे उत्तर अनेकांगी असते. एकच एक उत्तर आहे असे मानणे हा दुराग्रह झाला. हा विचार म्हणजे अनेकांतवाद. तर माझ्या भूमिकेत काही चूक असू शकते आणि तुझ्या प्रतिपादनात सत्य. हा झाला स्यादवाद. ही भूमिका घेऊन चर्चा करायची म्हणजे स्वपक्षात अप्रियता आणि प्रतिपक्ष कौतुक करणार नाही ही मुश्कील अवस्था ओढवून घ्यायची.
विनोबांवर जैन तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे सर्वोदय आणि साम्यवाद ही चर्चा त्यांनी या अंगाने पुढे नेली. साम्यवादावर टीका करताना त्यांना हे माहीत होते की राज्यसंस्था संपुष्टात आणली पाहिजे असे मानणाऱ्या या दोनच राजकीय विचारसरणी आहेत. सर्वोदय आणि साम्यवाद. त्यामुळे विनोबांची साम्यवादाची टीका पाहताना त्यांनी साम्यवादाला दिलेले स्थान विसरता येणार नाही. विनोबांच्या मते, या पुढे जगात दोनच विचार टिकतील. साम्यवाद आणि सर्वोदय. जगातील अन्य राजकीय विचार टिकणार नाहीत. इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांकडे विश्वव्यापक विचारधारा नाहीत.
साम्यवाद आणि सर्वोदय यांच्यात कमालीची भिन्नता असली तरी साम्यही आहे याकडे विनोबा लक्ष वेधतात. ज्याला प्रेरक म्हणता येईल असे विचार दोन महर्षीनी जगाला दिले. टॉलस्टॉय आणि मार्क्स. या दोन्ही विचारांमध्ये टॉलस्टॉयचा विचार तारक असेल तर मार्क्सचा मारक. टॉलस्टॉयचा विचार ही सर्वोदयाची भूमिका आहे. राज्यसंस्था समाप्त झाल्याखेरीज मानवजातीला पूर्णता येणार नाही ही कल्पना केवळ साम्यवाद आणि सर्वोदय या दोनच विचारांमध्ये आहे. राज्यसंस्था कितीही उत्तम लोकांनी चालवली तरी अंतिमत: मनुष्याचा परिपूर्ण विकास करण्याची ताकद तिच्यात नाही. साम्यवाद आणि सर्वोदय या दोहोंच्या तत्त्वज्ञानातील या विचारामुळे जगाला त्यांचे आकर्षण वाटले, वाटणारही आहे. म्हणूनच या दोन विचारांमध्ये संघर्ष अटळ असेल, ही विनोबांची भूमिका होती.
त्यांचा सर्वोदयावर दृढ विश्वास आहे. कारण त्या विचारात दोन विश्वहिताची तत्त्वे आहेत. शरीरश्रम आणि कांचन-मोह-मुक्ती. विनोबांच्या मते हे गांधीजींच्या विचारांचे सार आहे. या दोहोंमध्ये भारताचा परिपूर्ण विकास करण्याची क्षमता आहेच, परंतु साम्यवाद आणि भांडवलशाही या दोहोंशी सहकार्य राखता येईल असेही विनोबांचे मत आहे. सर्वोदयाने हा वारसा जपला आणि वाढवला तरच तो साम्यवाद आणि भांडवलशाही यांना पर्याय ठरेल. विनोबांची भूमिका ५०च्या दशकातील आहे. ते गेले त्यालाही ५० वर्षे होतील. या काळात जगात मोठे बदल झाले. साम्यवाद संपला आणि सर्वोदयाची घसरण झाली असे शेरे दिसले. ‘विचार’ सर्वोच्च मानणाऱ्या विनोबांनी ही शेरेबाजी नजरेआड केली असती हे उघडच आहे. यापेक्षा आणखी महत्त्वाची गोष्ट आहे.
सर्वोदय विरुद्ध साम्यवाद अशी मांडणी केली जाते. त्यामुळे विनोबा साम्यवादाचे प्रखर विरोधक मानले जातात. विनोबांची सर्वोदयावर अपार निष्ठा होती म्हणून त्यांनी साम्यवादाचे विशेष नाकारले नाहीत. साम्यवादाकडे सर्वोदयाचा पर्याय म्हणूनही पाहिले. विनोबा, सर्वोदयाचे अपयश आणि साम्यवादाचे सकारात्मक विशेष सांगतात तेव्हा उदार श्रमण परंपरेचे दर्शन होते.
jayjagat24@gmail.com