नाटककार सतीश आळेकर यांनी गेल्या पाच दशकांत मराठी रंगभूमीवर जे नवनवे प्रयोग केले, त्याने रंगभूमीचा चेहरामोहराच बदलून गेला. नाटककार विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्याबरोबरीने रंगभूमीकडे नव्याने पाहणारा नाटककार म्हणून त्यांची जी ओळख झाली, ती त्यांच्या संवादातील वेगळेपणामुळे आणि त्याच्या सादरीकरणामुळेही. ‘महानिर्वाण’, ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, ‘शनिवार-रविवार’, ‘दुसरा सामना’ आणि ‘एक दिवस मठाकडे’ या सतीश आळेकर यांच्या नाटकांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला. वास्तववादाच्या चौकटीतून बाहेर पडून ‘ब्लॅक ह्यूमर’ आणि ‘अॅबसर्डिटी’ने रंगलेल्या त्यांच्या नाटकांनी मध्यमवर्गीयांचे जगणे रंगमंचावर उभे केले. आळेकरांच्या या नाटकांचे इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्ये रूपांतर झाले आहे. ‘थिएटर अॅकॅडमी’चे ते संस्थापक सदस्य आहेत.
फोर्ड्स फाऊंडेशनच्या सहकार्याने घेतलेल्या नाटककारांच्या कार्यशाळा, महाराष्ट्रभर नाटय़विषयक केंद्राची केलेली उभारणी यातून प्रायोगिक नाटकाच्या सीमा पुण्या-मुंबईबाहेर नेण्याचे श्रेय आळेकर यांना जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटय़विषयक अभ्यासक्रमाची बांधणी आणि ललित कला केंद्राच्या स्थापनेमध्ये आळेकर यांचे मोलाचे योगदान आहे. संगीत नाटक अकादमी, पद्मश्री असे अनेक महत्त्वाचे सन्मान लाभलेल्या आळेकर यांनी परदेशी विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. एवढे महत्त्वाचे पुरस्कार मिळाल्यानंतरही विष्णुदास भावे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे महत्त्व उरतेच. मराठी रंगभूमीची संकल्पना मांडणारे अतिशय दूरदर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून भावे यांची कामगिरी अतिशय मोलाची होती. ‘नाटकाचा खेळ’ ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्यापाशी असलेले साहित्य आणि त्याचा केलेला उपयोग याकडे आता मागे वळून पाहिले, तर त्याचे महत्त्व अधिक लक्षात येईल. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या या कला प्रकाराशी आळेकर यांचा संबंध आला, तो महाविद्यालयीन काळात. तेव्हा त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सादर केलेली ‘झुलता पूल’ ही एकांकिका सादरीकरणाच्या दृष्टीने अतिशय वेगळी ठरली. मध्यमवर्गीय मुलांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण टिपणारी ही एकांकिका. त्यातील अल्पाक्षरी वाक्ये आणि त्यांचे विशिष्ट उच्चारण यामुळे तिला वेगळाच रंग मिळाला. त्यानंतरच्या त्यांच्या सगळय़ाच नाटकांमध्ये मध्यमवर्गाची ओढगस्त, त्या वर्गाची मानसिकता, त्यातील अगदी नित्याचे प्रसंग यांची जोडणी करतानाही आळेकरांनी आपली वेगळी शैली प्रस्थापित केली. संवादाचे रंगदर्शित्व त्यांच्या सगळय़ाच नाटकात अधिक उठून दिसते, कारण त्यांतील पात्रे, त्यांचे नातेसंबंध, त्यातील ताणतणाव यांचा अतिशय सुरेख मिलाफ दिसतो. वक्री वाक्ये आणि त्यातून प्रतीत होणारा गर्भितार्थ हा त्यांच्या नाटय़लेखनाचा वेगळेपणा. त्यामुळे विषयाची निवड, त्याची मांडणी आणि त्याचा नेमका परिणाम साधण्यासाठी रंगमचीय आविष्कारातील वेगळेपणा यामुळे सतीश आळेकर हे नेहमीच चर्चेत राहिलेले नाटककार राहिले आहेत. विष्णुदास भावे पुरस्काराबद्दल ‘लोकसत्ता’तर्फे त्यांचे अभिनंदन.