ढाल तलवारे गुंतले हे कर।
म्हणे मी जुंझार कैसा जुंझो।।
– तुकोबा
अशी सुरुवात असणारा संत तुकोबारायांचा हा एक अभंग आहे. शत्रूच्या हातात ढाल आणि तलवार असेल तर आपल्या दोन्ही हातांत ढाली ठेवणे उत्तम. प्रतिकाराची ही नित्यनूतन रीत आहे, असेही ते म्हणत. त्यांच्या सत्याग्रह विचाराला ही भूमिका अगदी लागू होते. विनोबांनी सत्याग्रहाच्या चिंतनाला गांधीजींच्या हयातीतच सुरुवात केली होती. गांधीजींचे काही सत्याग्रह दबावामुळे यशस्वी झाले होते, असे विनोबांचे म्हणणे होते. दबाव वेगळा आणि प्रभाव वेगळा. विनोबांनी आपले मत गांधीजींच्या समोर मांडले.
कम्युनल अवॉर्ड, राजकोटचा सत्याग्रह आणि अहमदाबादचा सत्याग्रह हे लढेही ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ म्हणजे अक्रिय प्रतिकाराची रूपे होती. ते सत्याग्रह नव्हते. इतरही सत्याग्रहांत ही उणीव राहून गेल्याचे त्यांनी मान्य केले.
बापूंच्या निर्णयाविषयी शंका निर्माण झाली की त्यांच्या समोर आपले मत ठेवावे. मत ठाम पण ते व्यक्त करण्याची रीत नम्र अशी विनोबांची वृत्ती होती. गांधीजीही समोरच्या व्यक्तीचे मत पटले तर ते स्वीकारत आणि आपली चूक झाली हे कबूलही करत. सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान याहून अधिक सुंदर रीतीने सांगता येणार नाही.
सत्याग्रह हा मध्यम पदलोपी समास आहे असेही विनोबा म्हणत. या समासाचा, सत्याग्रह म्हणजे ‘सत्यासाठी प्रेमाद्वारे केलेला आग्रह,’ असा विग्रह ते करत. सत्य आणि प्रेम यांच्या ऐक्यातून समस्या सुटतील. उत्पादन वाढेल आणि समाज पुढे जाईल, अशी विनोबांची धारणा होती.
विनोबा म्हणत, एखादी व्यक्ती कधी सुधारूच शकत नाही असा कोणाबद्दलही विचार करू नका. सद्भावना, विश्वाकडे पाहण्याची शुभमंगल दृष्टी, हीच सर्वोदयाची मूळ शक्ती आहे. सत्याग्रह त्यातूनच येतो. प्रतिपक्षाबद्दल, दोषी मानलेल्याबद्दल, आपल्या मनात प्रेम असेल, त्याच्या उन्नतीसाठी आवश्यक म्हणूनच आपण एखादे पाऊल उचलले असेल तेव्हा अिहसेची शक्ती प्रकट होते.
सत्य, प्रेम, करुणा यांच्या आधारे विरोधकाचेही हृदय परिवर्तन व्हावे आणि तेही प्रेमाने व्हावे, प्रतिपक्षाकडील सत्याचा अंश ग्रहण करावा, विज्ञानाची आव्हाने अभ्यासावीत आदी अंगांनी विनोबांनी गांधीजींच्या सत्याग्रह मार्गाचे शोधन केले. जी तत्त्वे आदर्श म्हटली गेली, ग्रंथांमधे अडकून पडली ती रोजच्या जगण्यात आणून गांधीजींनी सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान विकसित केले होते. विनोबांनी सत्याग्रहाच्या दर्शनात दबावापेक्षा प्रभावाला अग्रस्थान दिले. समोरच्याकडे असणाऱ्या सत्याचे ग्रहण केले.
पूर्वपक्ष-उत्तर पक्ष, श्रमण, भिक्खू आणि ब्राह्मण, आर्ष, संत आणि भक्त, वैश्विक धर्मचिंतन, सामाजिक राजकीय गटतटांमधे सद्भाव, सर्व प्रकारच्या भेदांना आदरपूर्वक निरोप अशा समन्वयात्मक कार्याचे मूळ साम्ययोगात आहे. गांधीजींच्या नंतरचे विनोबांचे हे कार्य म्हणजे सर्वोदयाचा विकास आहे.
धर्म, परंपरा, श्रद्धा, संस्कृती, लौकिक समस्या या सगळय़ांचा विनोबांनी समन्वय साधला आणि साम्ययोगासारख्या दर्शनाचा पट उलगडला. त्याकडे श्रद्धापूर्वक पाहिले पाहिजे.- अतुल सुलाखे
jayjagat24 @gmail.com