धर्मनिरपेक्षता हे भारतीय संविधानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात सांगितल्यानुसार धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व संविधानाच्या पायाभूत रचनेचा भाग आहे. हे तत्त्व संविधानाच्या २५ ते २८ या अनुच्छेदांमधून आकाराला आले आहे. या चारही अनुच्छेदांनी धर्म आणि राज्यसंस्था या दोन्हींची कार्यकक्षा आणि व्यक्तीला धार्मिक बाबतीत असणारे स्वातंत्र्य याविषयी नेमके भाष्य केले आहे. संविधानातील पंचविसाव्या अनुच्छेदाने सद्सदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. ‘सद्सदविवेकबुद्धी’ या शब्दाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. सदसदविवेकबुद्धी याचा अर्थ होतो सत आणि असत यात भेद करू शकणारी बुद्धी. सत म्हणजे चांगले तर असत म्हणजे वाईट. या दोहोंचा साकल्याने, विवेकाने विचार करणारी बुद्धी. या शब्दाला नैतिक, तात्त्विक आणि वैचारिक आयाम आहेत.
‘नीरक्षीरविवेक’ हा शब्द येथे महत्त्वाचा ठरेल. नीर म्हणजे पाणी तर क्षीर म्हणजे दूध. दूध आणि पाण्यात फरक करता आला पाहिजे. बगळाही पांढराशुभ्र असतो आणि हंसही त्याच रंगाचा असतो. हंस आणि बगळ्यात फरक करता आला पाहिजे. राजहंसाकडे हा भेद करण्याची क्षमता असते, असे मानले जाते. सद्सदविवेकबुद्धी शब्द वापरताना हा नैतिक निवाडा करण्याची क्षमता अभिप्रेत आहे. प्रत्येकाच्या सद्सदविवेकबुद्धीनुसार श्रद्धा, विश्वास, धारणा वेगवेगळ्या असणे स्वाभाविक आहे. या स्वातंत्र्याचा उल्लेख संविधानाच्या उद्देशिकेतही आहे. पंचविसाव्या अनुच्छेदाने याबाबतचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. या अनुच्छेदाने व्यक्तीवर अमुक एखादा धर्म स्वीकारण्याचे बंधन घातलेले नाही. तसेच राज्यसंस्थेनेही अमुक एखादा धर्म स्वीकारलेला नाही. व्यक्तीने तिच्या पालकाचा धर्म स्वीकारला पाहिजे, असेही म्हटलेले नाही. थोडक्यात, व्यक्तीला कोणताही धर्म, श्रद्धा, विश्वास यानुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे. सद्सदविवेकबुद्धीचा वापर करत व्यक्तीला नास्तिक असण्याचेही स्वातंत्र्य या अनुच्छेदाने मान्य केले आहे.
सदसद्विवेकाच्या स्वातंत्र्यासह धर्माचे प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार याबाबतचे स्वातंत्र्यही या अनुच्छेदामध्ये आहे. आपल्याला हव्या त्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. केवळ धार्मिक विश्वासच नव्हे तर धार्मिक प्रथांचे आचरण करण्याचाही अधिकार आहे. हा अधिकार व्यक्तीला आहे तसाच तो समूहाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा वेगवेगळ्या असू शकतात. धार्मिक श्रद्धांनुसार वागणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या विसंगत वागणे नव्हे. हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, ख्रिाश्चन अशा विविध धर्मांच्या शिकवणुकीनुसार वागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. हा स्वातंत्र्याचा हक्क बजावताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये, हे अभिप्रेत आहे. अर्थातच या स्वातंत्र्यावर निर्बंध आहेत. राजकीय, आर्थिक किंवा धर्मनिरपेक्ष कृतींशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल. त्यातून धार्मिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या स्वातंत्र्याच्या अधिकारांवर गदा येऊ शकते; मात्र असे कायदे जरुरीचे असल्यास ते करण्याचा अधिकार राज्यसंस्थेकडे आहे. तसेच सामाजिक कल्याणाच्या बाबत काही योजना राबवायच्या असल्यास त्या अनुषंगाने कायदे करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे. त्या माध्यमातून राज्यसंस्था धर्माच्या क्षेत्रात हस्तक्षेप करू शकते; मात्र हा हस्तक्षेप सकारात्मक स्वरूपाचा आहे. तो समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अनुच्छेद १७ नुसार, अस्पृश्यतेवर बंदी आहे. अस्पृश्यता ही धर्मातील प्रथा आहे; मात्र त्यावर बंदी आणण्याविषयी संविधानातच भाष्य केलेले आहे. याशिवाय संसदेतही कायदे संमत केले जाऊ शकतात. थोडक्यात, पंचविसावा अनुच्छेद कोणत्याही धर्माचे आचरण करतानाच आपली सद्सदविवेकबुद्धी वापरून माणूसपण टिकवले पाहिजे, असे सांगतो. साहिर लुधियानवीच्या भाषेत सांगायचे तर ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा!’ पंचविसावा अनुच्छेद धार्मिक स्वातंत्र्य मान्य करतानाच अशी माणूसपणाची हाक देतो.
डॉ. श्रीरंजन आवटे
poetshriranjan@gmail. Com