दैनंदिन घडामोडी आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवून या नोंदींचा वापर समाजाला जाणते करण्यासाठी कार्यरत असलेले पत्रकार आणि काळाबरोबर राहून नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे व त्यांच्याही नवसर्जनाला दाद देणारे पत्रकारितेतील स्वीकारशील गुरू, असेच दिवंगत ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांचे यथार्थ वर्णन करता येईल. पारंपरिक पठडीतील पत्रकारिता करतानाच नव्या सहस्राकाच्या प्रारंभी नव्याने सुरू होत असलेल्या वेब आवृत्त्यांचा त्यांनी केलेला चिकित्सक अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुणे डेली’मध्ये उपसंपादक आणि ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’ (यूएनआय) या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या कालखंडात वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधी म्हणून काम करणे हे अधिक जबाबदारीचे आणि जोखमीचे असते याची जाण ठेवून ठाकूर यांनी काम केले. ‘इंडियन पोस्ट’ आणि ‘द ऑब्झर्व्हर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स’ या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले.

हेही वाचा : पहिली बाजू : नेतृत्वमर्यादांमुळे ‘आघाडी’ विघटनाकडे…

पत्रकारांची पिढी घडविणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात, अर्थात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून २००१ मध्ये ठाकूर रुजू झाले. २००७ मध्ये विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. या कालखंडात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. वर्गामध्ये शिकविण्याची त्यांची एक खास पद्धत होती. ‘आज कोणती वृत्तपत्रे वाचली? अमुक वृत्तपत्राने एखादी बातमी कशा पद्धतीने दिली आहे,’ असे प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांना बोलते करत. एखाद्या बातमीमध्ये कोणते कंगोरे समाविष्ट केले गेले असते, तर ती बातमी परिपूर्ण झाली असती, याचे विश्लेषण करण्याची त्यांची हातोटी आणि संवादी भूमिका यामुळे ठाकूर सर विद्यार्थीप्रिय झाले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याबरोबरच मित्रत्वाने वागणारे शिक्षक म्हणूनही ते विद्यार्थीप्रिय होते. आपल्या विद्यार्थ्यांचे गुण आणि दोष अचूकपणे ओळखून त्याप्रमाणे त्यांना पुढील कारकीर्दीसाठी अगदी आपुलकीने सल्ला देणे हीदेखील त्यांची खासियत होती. कोणता विद्यार्थी चांगली बातमीदारी करू शकतो आणि कोण बातमीवर उत्तम संस्कार करू शकतो, कोणाला लेखनाचे तंत्र अवगत आहे आणि कोणाला बित्तंबातमी काढता येते हे त्यांना ठाऊक असायचे.

हेही वाचा : अन्वयार्थ : विद्यार्थ्यांशी विसंवाद

‘पुणे श्रमिक पत्रकार संघ’ आणि ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी त्यांनी पेलली. इंटरनेट वापर अजून तसा बाल्यावस्थेत असताना, इंटरनेटच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रांनी केलेल्या वेब आवृत्त्यांचा त्यांनी अभ्यास केला. आधुनिकतेशी सांधा जोडून घेताना ‘भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या’ या विषयावर प्रबंध सादर करून ठाकूर यांनी पीएच.डी. संपादन केली, जी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथील ‘मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च’, तसेच ‘फ्लेम’ आणि ‘विश्वकर्मा विद्यापीठा’मध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले. भारतीय विद्याभवनच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे कामही त्यांनी काही काळ केले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior journalist and professor kiran thakur loksatta article css