अमेरिकेतील दोन बडया कंपन्यांना गेल्या काही आठवडयांमध्ये तेथील सरकार वा नियामकांनी पळता भुई थोडी केली आहे. तसे पाहायला गेल्यास दोन्ही नाममुद्रा या अमेरिकी यशोगाथा म्हणून मखरात बसवता येतील. पण बोईंग आणि अ‍ॅपल या दोन्ही कंपन्यांना त्याची गरज नाही आणि अमेरिकेची तशी कॉर्पोरेट संस्कृती नाही. बोईंग आणि अ‍ॅपलवरील आरोप गंभीर आहेत. अनुक्रमे अक्षम्य हेळसांड आणि अनियंत्रित मक्तेदारीचा ठपका दोन कंपन्यांवर लावण्यात आला आहे. बाजारवर्चस्वाची ईर्षां  व्यापारविश्वात सर्वाधिक आदिम. पण बाजारवर्चस्व आणि मक्तेदारी यांच्यातील सीमारेषा खूपच पुसट असते. तसेच, अव्वल स्थानावर जाण्यासाठी वा टिकून राहण्यासाठी मूल्यांचा बळी देण्याची प्रवृत्ती इतर क्षेत्रांप्रमाणेच उद्योग क्षेत्रातही असतेच. अ‍ॅपलने मक्तेदारीचा गैरवापर केला असा त्यांच्यावर ठपका. त्यासंदर्भात अमेरिकेतील १६ राज्ये आणि न्याय विभागाने अमेरिकेवर दावा दाखल केला आहे. बोईंगने एअरबसबरोबर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सुरक्षात्रुटींकडेच दुर्लक्ष केले, असा त्यांच्यावर आरोप. त्यावर अमेरिकी विमानवाहतूक आयोगाकडून संभाव्य कारवाई होण्याआधीच बोईंगच्या उच्चपदस्थांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

Police seized 70 lakh rupess in suspicious car traveling from mp to Maharashtra
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
10 kg ganja seized in pune
मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
sugar workers salary
कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू
TRAI New Rule, Jio, Airtel, Vi customers
TRAI New Rule : Jio, Airtel आणि Vi ग्राहकांचे ‘या’ तारखेपासून वाढणार टेन्शन! OTP बाबतच्या नियमात केला मोठा बदल

बोईंगचे प्रकरण अधिक गंभीर आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांमध्ये त्यांचे अद्ययावत बनावटीचे बोईंग – ७३७ मॅक्स हे विमान दोन वेळा दुर्घटनाग्रस्त झाले. एकदा इंडोनेशियात आणि एकदा इथियोपियात. दोन्ही दुर्घटनांमध्ये मोठया प्रमाणावर जीवितहानी झाली. चौकशीअंती विमानाच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आले. चाचणीदरम्यानच या त्रुटींची कल्पना बोईंग व्यवस्थापनाला आली होती. पण नवीन विमान त्वरेने बाजारात आणण्यासाठी त्रुटींकडे दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे याची कबुली व्यवस्थापनाला द्यावी लागली. तरीही यातून कंपनीने काहीच बोध घेतला असे दिसले नाही. कारण ५ जानेवारी रोजी अलास्का एअरलाइन्सचा, वापरात नसल्याने सांध्यांची निगा न राखलेला दरवाजाच उड्डाणादरम्यान निखळला. त्याच्या सांधेखिटया पुरेशा खबरदारीने बसवल्या नसल्याचे नंतर चौकशीत आढळून आले. जीवघेण्या अपघातांनंतरही बोईंगच्या ‘संस्कृती’मध्ये फरक पडलेला नाही. झटपट उत्पादनाच्या मोहापायी सुरक्षा तपासण्या उरकण्याकडे कल वाढू लागला आहे. बोईंगकडे विमान सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्या पुरेशी नाही आणि या मूलभूत समस्येकडे हवे तितके लक्ष दिले गेलेले नाही, असे अनेक मुद्दे फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या अमेरिकी विमान वाहतूक नियमन संस्थेने अधोरेखित केले आहेत. खुद्द बोईंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह कॅलहाउन या वर्षअखेरीस पायउतार होत आहेत; तर प्रवासी विमाननिर्मिती प्रमुख स्टॅन डील यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

अ‍ॅपल ही वैयक्तिक तंत्रज्ञान क्षेत्रातली अग्रणी कंपनी असली तरी निकोप स्पर्धेच्या मूल्यावर या कंपनीचा विश्वास नसावा. अ‍ॅपलचा ग्राहक इतर कंपन्यांच्या उत्पादनांकडे वळणारच नाही, अशा प्रकारे तिला वा त्याला मर्यादित पर्याय उपलब्ध राहतील याकडे कंपनीने कटाक्ष पुरवला, असा अमेरिकी न्याय विभागाचा आरोप आहे. खुल्या बाजारकेंद्री व्यवस्थांमध्ये स्पर्धा वा स्पर्धक मारणे हे पातकच. आयफोनसह अ‍ॅपलची उत्पादने ‘बंदिस्त’ असतात, त्या परिघामध्ये स्पर्धक कंपन्यांना सहज शिरकाव करू दिला जात नाही हा अ‍ॅपलवरील मुख्य ठपका आहे. दोन्ही कंपन्यांचे वर्तन आदर्श नाही. पण अमेरिकेतील प्रशासन वा नियामकाने त्यांच्या कारभारात सुरुवातीपासून हस्तक्षेप केला नाही किंवा पाळतही ठेवली नाही. दखलपात्र त्रुटी आढळल्यानंतर मात्र, योग्य प्रकारे दोन्ही कंपन्यांचे ‘वस्त्रहरण’ होऊ दिले जात आहे. प्रवासी विमानवाहतूक क्षेत्रामध्ये बोईंग विरुद्ध एअरबस ही स्पर्धा अतितीव्र आहे आणि तिला ‘अमेरिका विरुद्ध युरोप’ हा रंगही आहेच. या स्पर्धेत अलीकडे सातत्याने एअरबस कुरघोडी करत आहे. तरीदेखील बोईंगला सरकारी कुबडया पुरवाव्यात अशी गरज अमेरिकेला वाटत नाही. बाजारकेंद्री अर्थव्यवस्था म्हटल्यावर बाजारकेंद्री मूल्यांवर विश्वास आणि त्यांचे पालन केले पाहिजे. ते होत नसेल, तर त्याविषयी संबंधित कंपन्यांचे कानही पकडता आले पाहिजेत. मोजक्याच कंपन्यांचे अपरिमित लाड करायचे, त्यांनाच ‘कडेवर’ घेऊन फिरवायचे नि मिरवायचे या स्वरूपाच्या कुडमुडया भांडवलशाहीला अस्सल बाजारकेंद्री देशांमध्ये स्थान नाही. बोईंग आणि अ‍ॅपलविषयी सुरू असलेल्या कारवाया वा चौकशांमधून हेच अधोरेखित होते.