सध्या शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वांत चर्चेचा विषय म्हणजे शाळेची वेळ. राज्यपालांच्या सूचनेनुसार शालेय शिक्षण विभागाने चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक खासगी शाळांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. परवानगीविना सकाळी नऊपूर्वी शाळा भरवल्यास कारवाईचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. शारीरिक, मानसिकदृष्ट्या मुलांसाठी आणि नियोजनाच्या दृष्टीने पालकांसाठी योग्य वेळ काय, याच मुद्द्याकडे शाळा, पालकांचे दुर्लक्ष होत आहे.

पूर्वी बहुतांश शाळा शनिवार वगळता सकाळी उशिराच असायच्या. दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांमध्ये काही वर्ग सकाळी लवकर असायचे. मात्र गेल्या काही वर्षांत एकच सत्र असूनही शाळा लवकर भरण्याची पद्धत रुजली आहे. मुलांनी लवकर उठले पाहिजे, या भूमिकेतून पालकांनीही ती वेळ स्वीकारली आहे, तर काही पालकांना ती वेळ मान्य नसूनही नाइलाजास्तव स्वीकारावी लागली आहे. सकाळी सात वाजल्यापासून शाळा असल्यास मुलांना, पालकांना लवकर उठून आवरावे लागते. सध्याच्या कामाच्या संस्कृतीनुसार बरेच पालक रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. पालक रात्री उशिरापर्यंत जागे असल्याने अनेकदा मुलेही उशिराच झोपतात. परिणामी, सकाळच्या शाळेत मुले झोपाळलेली असतात. त्यांचे वर्गात लक्ष लागत नाही. दुपारी शाळा संपवून घरी आल्यावर अर्धवट राहिलेली झोप पूर्ण करणे किंवा टीव्ही-मोबाइल पाहण्यात त्यांचा वेळ जातो किंवा खासगी शिकवणी वर्ग, पाळणाघरात जावे लागते. यात मुलांच्या शारीरिक, भावनिक विकासाचा प्रश्न निर्माण होतो. महत्त्वाचे म्हणजे, मुले घरी येतात तेव्हा पालक घरी नसतात. त्यामुळे पालक-मुलांचा संवाद होत नाही.

हेही वाचा – अन्वयार्थ : आशादायी बांगलामैत्रीकडून फलदायी अपेक्षा

शाळा सकाळी लवकर असल्यास मुलांना, पालकांना, शिक्षकांनाही त्रास सहन करावा लागतो, असे ज्येष्ठ बालविकासतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले सांगतात. ‘शाळेची वेळ सकाळी सात, आठ वाजता शाळा असू नये. लवकरच्या शाळेमुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लवकरच्या शाळेमुळे मुले प्रातर्विधी, व्यवस्थित न्याहारी न करताच शाळेत जातात. त्यामुळे दिवसच चुकीच्या पद्धतीने सुरू होतो. परिणामी, मुलांना बद्धकोष्ठता, ॲसिडिटी असे त्रास सुरू होतात. शरीरातील डोपामिनसारखे हार्मोन्सची तीव्रता सकाळी अधिक असते आणि सायंकाळी कमी होत जाते. मात्र, सकाळी लवकरच्या शाळेमुळे मुलांचा उत्साह, शारीरिक, मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. सकाळच्या शाळेसाठीच्या धावपळीत मुलांची तयारी, त्यांचे आवरणे पालकांना करावे लागते. त्यामुळे मुलांना स्वत: आवरण्याची शिस्त लागत नाही. विद्यार्थी, पालकांप्रमाणे सकाळची शाळा शिक्षकांसाठीही त्रासदायक आहे. कारण, शिक्षक हे पालकही असतात. त्यांना त्यांच्या मुलांनाही वेळ द्यायचा असतो. मात्र, त्यांचीच शाळा सकाळची असल्याने मुलांना वेळ देता येत नाही,’ असे गोडबोले सांगतात.

डॉ. गोडबोले यांनी सकाळी नऊनंतर शाळा ठेवण्याबाबत सकारात्मकता दर्शवतानाच जोडून आणखीही काही मुद्दे मांडले, तेही महत्त्वाचे आहेत. ते सांगतात, ‘सकाळी उशिरा शाळा असली, तरी मुलांनी सकाळी लवकर उठून प्रातर्विधी करणे, न्याहारी, स्वयंअध्ययन, व्यायाम, पालकांशी संवाद अशा पद्धतीने सकाळचा वेळ वापरला जाणे महत्त्वाचे आहे. शाळा सकाळी उशिरा असली, तरी सगळ्याच गोष्टी उशिराने करणे योग्य नाही. मुलांनी रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे. पालकांची कामे, स्क्रीन टाइम यामुळे मुलांच्या झोपेची वेळ पुढे ढकलली जाऊ नये.’

हेही वाचा – चतु:सूत्र : कायद्यांतील लिंगभेद आणि सांविधानिक समानता

अजूनही काही शाळा दोन सत्रांत भरत असल्यास त्यांच्या तांत्रिक अडचणी समजून घेता येऊ शकतात. त्याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा करून मार्ग काढणे शक्य आहे. मात्र, शाळा एकाच सत्रात असूनही सकाळी लवकर शाळा भरवण्याची आग्रही भूमिका मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हितावह नाही. म्हणूनच सकाळी लवकरची शाळा म्हणजे झोपलेले शिक्षण अशी अवस्था आहे. या सगळ्याचा विचार करता पालक, शिक्षक, संस्थाचालक या सर्वच घटकांनी आपापली मत-मतांतरे बाजूला ठेवून केवळ विद्यार्थिकेंद्रित विचार करण्याची गरज आहे.

chinmay.patankar@expressindia.com