आठवड्याच्या वारांना आणि महिन्यांना नावं सगळेच देतात. पण वर्षांनादेखील नाव देणाऱ्या मोजक्या कालगणनांमध्ये शालिवाहन शकाचा समावेश होतो. अशी साठ नावं आहेत. कोणती आणि साठच का?
आज फाल्गुन अमावास्या. शालिवाहन शक १९४६ चा शेवटचा दिवस. उद्यापासून शालिवाहन शक १९४७ सुरू होणार. नव्या वर्षानिमित्त तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
कालगणना म्हटली की दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष असे चार भाग आलेच. आता गंमत पाहा. यातल्या दिवसांना काही कोणी नावं देत नाही. आणि बरं आहे ते. नाही तर आणखी दिवसांची नावं पाठ करत बसायला लागलं असतं! दिवसांना फक्त क्रमांक देतात – ‘दिनांचा अंक’ म्हणून तर ‘दिनांक’. अर्थात, शालिवाहन शकामध्ये महिन्यातले दोन दिवस क्रमांकाने नाही तर नावाने ओळखतात – ‘अमावास्या’ आणि ‘पौर्णिमा’. पण तो अपवाद झाला.
आठवड्यातल्या वारांना मात्र सगळ्या कालगणनांमध्ये नावं आहेत. त्यातल्या त्यात अपवाद फक्त हिजरी कालगणनेचा. तिथेही सहाव्या आणि सातव्या वाराला नाव आहेच, पण पहिल्या पाच वारांना फक्त क्रमांक आहेत.
सगळ्या कालगणनांमध्ये महिन्यांना मात्र निश्चितपणे नावं आहेत आणि क्रमांकही आहेत. इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी; शालिवाहन शकात चैत्र, वैशाख; हिजरी सनात मुहर्रम, सफर, वगैरे वगैरे. आणि वर्ष? वर्षांना क्रमांक सगळ्याच कालगणना देतात. पण वर्षालादेखील नाव ठेवणाऱ्या मोजक्या कालगणनांमध्ये शालिवाहन शकाचा समावेश होतो!
हो हो. शालिवाहन शकात वर्षाला क्रमांक तर असतोच. पण नावदेखील असतं. उदाहरणार्थ आज शालिवाहन शक १९४६ संपेल. या वर्षाचं नाव होतं ‘क्रोधी’. आणि उद्यापासून सुरू होणार शालिवाहन शक १९४७ आणि त्या वर्षाचं नाव आहे ‘विश्वावसु’.
ही नावंदेखील मोठी गमतीची आहेत. एक तर सगळीच नावं अर्थपूर्ण आहेत. उदाहरणार्थ आज संपत असलेल्या संवत्सराचंच नाव पाहा. ‘क्रोधी’! कोण आहे एवढं तापट? कोणास ठाऊक.
ही बाकी काही नावं पाहा: विक्रम, प्रमोद, श्रीमुख, नंदन, विजय, जय, मन्मथ (प्रेमदेवता), शुभकृत, शोभन, आनंद अशी नावं आहेत आणि प्रमाथी (त्रास देणारा), विरोधी, विकृती, दुर्मुख, विलंबी, विकारी, पराभव, विरोधकृत, दुर्मती अशीही नावं आहेत.
एकूण साठ नावं आहेत. आणि ती त्याच क्रमाने पुन:पुन्हा येतात. ही सारी नावं भृगू संहितेत दिली आहेत असं म्हणतात. आता प्रश्न असा आहे की साठच नावं का? १२ आणि ३० चा लसावि (लघुतम साधारण विभाज्य) ६० आहे म्हणून! पण हे कोड्यात बोलणं झालं. तसं नको. नीट स्पष्ट करू सगळं.
पण त्यासाठी आधी ग्रहांच्या भ्रमणाचा अभ्यास करावा लागणार. क्रांतिवृत्तावर चंद्र आणि सूर्य फिरताना दिसतात हे पाहिलंच आहे आपण. पण यांखेरीज क्रांतिवृत्तावरच इतरही ग्रह फिरताना दिसतात. पुरातन काळापासून माहीत होते असे ग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी. ग्रहांचे दोन मुख्य प्रकार – अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह. ‘अंतर्ग्रह’ म्हणजे सूर्याला पृथ्वीपेक्षा जवळ असलेले ग्रह आणि ‘बहिर्ग्रह’ म्हणजे पृथ्वीच्या भ्रमणकक्षेपलीकडे ज्यांची भ्रमणकक्षा आहे असे ग्रह. बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहेत, तर मंगळ, गुरू आणि शनी हे बहिर्ग्रह.
क्रांतिवृत्ताची एक फेरी पूर्ण करायला अंतर्ग्रहांना साधारण एक वर्ष लागतं. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी १० मे रोजी बुधाने मेष राशीत प्रवेश केला. यावर्षी ६ मे रोजी तो पुन्हा मेष राशीत प्रवेश करेल. हेच गेल्या वर्षी २४ एप्रिलला शुक्राने मेष राशीत प्रवेश केला. यावर्षी ३१ मे रोजी तो पुन्हा मेष राशीत प्रवेश करेल.
पण बहिर्ग्रहांचं तसं नाही. क्रांतिवृत्ताची एक फेरी पूर्ण करायला त्यांना एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. उदाहरणार्थ, क्रांतिवृत्ताची एक फेरी पूर्ण करायला मंगळाला साधारण दीड-एक वर्ष लागतं, तर गुरूला सुमारे १२ वर्ष. आणि शनीला यासाठी सुमारे ३० वर्ष लागतात.
सध्या गुरू रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीत आहे आणि शनी पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात मीन राशीत. आता पुन्हा एकदा गुरू वृषभ राशीत आणि शनी मीन राशीत असं कधी घडेल? अर्थातच, सुमारे ६० वर्षांनी – १२ आणि ३० चा लसावि! हे गणित अगदी अचूक आहे असं नाही. पण साधारण ठोकताळा म्हणून चालण्यासारखं आहे. आणि तेवढ्या कालावधीत क्रांतिवृत्तावर गुरूच्या पाच प्रदक्षिणा झाल्या असतील आणि शनीच्या दोन. असं म्हणतात की संवत्सरांना साठ नावं आहेत यामागे हेच कारण आहे.
सध्या गुरू रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीत आहे आणि शनी पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात मीन राशीत. आता पुन्हा एकदा गुरू वृषभ राशीत आणि शनी मीन राशीत असं कधी घडेल? अर्थातच, सुमारे ६० वर्षांनी – १२ आणि ३० चा लसावि! हे गणित अगदी अचूक आहे असं नाही. पण साधारण ठोकताळा म्हणून चालण्यासारखं आहे. आणि तेवढ्या कालावधीत क्रांतिवृत्तावर गुरूच्या पाच प्रदक्षिणा झाल्या असतील आणि शनीच्या दोन. असं म्हणतात की संवत्सरांना साठ नावं आहेत यामागे हेच कारण आहे.
@KalacheGanit kalache.ganit@gmail.com