शांता गोखले हे इंग्रजीप्रमाणेच मराठीतही लिखाणाची ताकद दाखवून देणारं नाव. ‘त्या वर्षी’,‘रीटा वेलिणकर’ या त्यांच्या मराठी कादंबऱ्या निराळ्या ठरल्याच, पण ‘गुरुदत्त- तीन अंकी शोकान्तिका’, ‘श्यामची आई’, ‘ब्राह्मणकन्या’, ‘माझा प्रवास’ आणि ‘स्मृतिचित्रें’ ही कालदर्शी मराठी पुस्तकं त्यांनी इंग्रजीत नेली. सतीश आळेकर, मकरंद साठे यांची नाटकं शांता गोखले यांच्या अनुवादांमुळे सत्त्व टिकवून इंग्रजी झाली. गोखले यांनी नाट्यकलेविषयी इंग्रजीत अनेक पुस्तकं लिहिली किंवा संपादित केली; तसेच ‘वन फूट ऑन द ग्राउंड’ या आत्मपर पुस्तकातून स्त्रीत्वाची अंतर्बाह्य तपासणी केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’त मराठी/ हिंदी/ इंग्रजी नाटकांची परीक्षणंही त्या लिहीत (पण त्याचंच संकलन करून पुस्तक काढायचं, असला प्रकार त्यांनी केला नाही हे त्यांचं आणखी एक मोठेपण).
या शांता गोखले यांना कारकीर्द-गौरव पुरस्कार (लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड) नवे नाहीत. मुंबईच्या ‘टाटा लिटलाइव्ह’तर्फे त्यांचा गौरव २०१९ मध्येच झाला होता. त्याहीआधी २०१५ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार त्यांना मिळाला होता. गेल्या आठवड्यात मात्र एकाच शहरात सलग दोन दिवस दोन कारकीर्द-गौरव पुरस्कारांचा स्वीकार करणाऱ्या त्या बहुधा एकमेव ठरल्या.
यापैकी ‘मेटा अॅवॉर्ड्स’ – म्हणजे ‘महिंद्र एक्सलन्स इन थिएटर अॅवॉर्ड’ हे नवी दिल्लीत देशभरच्या नाटकांचा (आणखी एक) महोत्सव भरवून, त्याच्या अखेरीस दिले जाणारे पुरस्कार. त्याच सोहळ्यात एखाद्या ज्येष्ठ रंगकर्मीला प्रदीर्घ नाट्यसेवेबद्दल ‘मेटा लाइफटाइम अचीव्हमेंट’ पुरस्कार दिला जातो. गोखले या रूढार्थानं ‘रंगकर्मी’ नसल्या तरी त्यांची नाट्यसेवा प्रदीर्घच आहे, यावर या पुरस्कारानं मोहोर उमटवली. २० मार्चच्या गुरुवारी हा ‘मेटा’ सोहळा झाला आणि लगेच २१ मार्चला ‘जेके पेपर’ कंपनीतर्फे खास महिला साहित्यिकांसाठी ‘ऑथ-हर अॅवॉर्ड्स’ची लगबग होती.
ललित, ललितेतर, नवलेखिका, बालसाहित्यिका आणि जनप्रिय लेखिका अशा पाच विभागांखेरीज, एका ज्येष्ठ लेखिकेला दिला जाणारा कारकीर्द गौरव शांता गोखले यांनाच देण्यात आला. कदाचित हे दोन्ही सोहळे, गोखले यांच्या तारखा पाहूनही लागोपाठ ठरवलेले असू शकतात. अर्थात तसं नसेल, तरीही या ‘बुकबातमी’च्या वाचकांना शांताबाईंबद्दल वाटणाऱ्या अभिमानात काही फरक पडणार नाही!
डब्लिनची पुस्तक दालने…
आयर्लंडमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर देशाची राजधानी डब्लिन. जनगणना आकडेवारी पाहिली तर (एकक, दशक, शतक हजार मोजत) जेमतेम सहा लाखांइतकी भरणारी. मोठी ग्रंथदालने मात्र दीड डझनांहून अधिक. जेम्स जॉईलच्या ‘डब्लिनर्स’ या कथाग्रंथाने शहराची जगभर ओळख झाली. ‘जेन-झी’ पिढीतील एका पुस्तकवेड्याच्या ग्रंथांसंबंधित अनेक व्हिडीओपोस्ट्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ‘जॅक इन द बुक्स’ नावाने. त्या तर पाहाच. पण डब्लिन शहरातील महत्त्वाच्या ग्रंथदालनांचा एकत्रित आढावा घेणारा फेरफटका येथे पाहता येईल. उत्तम संगीताची जोड देत ही १५ मिनिटांची भटकंती चालते.
https://tinyurl.com/kecrfs57
एक लक्ष युरोचा पुरस्कार…
‘डब्लिन लिटररी अवॉर्ड’ नामक एक लाख युरोचा पुरस्कार. गेली तीस वर्षे तो नियमित होत असला तरी बुकरइतकी आपल्याकडे त्याला प्रसिद्धी मिळत नाही. तरी त्याचे महत्त्व बुकरइतकेच. परवा या पुरस्कारासाठीची लघुयादी जाहीर झाली. त्यात गेल्या वर्षी बुकर पारितोषिक विजेते ठरलेले पॉल लिंच यांचे ‘प्रॉफेट साँग’ आणि यंदाच्या बुकरस्पर्धेत मिरविणारे पर्सिव्हल एव्हरेट यांचे ‘जेम्स’देखील आहे. इतर चार कोणती आहेत, हे पाहण्यासाठी ही वृत्तलिंक उपयुक्त.
https://tinyurl.com/y3f6v4xf
बुकर बॅनव्हीलची विस्तृत मुलाखत…
आयर्लंड या देशाला पहिले बुकर पारितोषिक मिळवून दिले १९७८ मध्ये आयरिस मरडॉक या लेखिकेने. पुस्तकाचे नाव होते ‘द सी’. तर त्यानंतर पंचवीसएक वर्षांनी जॉन बॅनव्हील या आयरिश लेखकाला बुकर मिळाले. त्याही पुस्तकाचे नाव होते ‘द सी’! ७९ व्या वर्षांत बॅनव्हील यांनी कादंबरी लिहिण्याला तिलांजली दिली असून आता साहित्यिक आयुष्याचे आत्मचरित्र लिहिण्यास घेतले आहे. तर त्याची एक विस्तृत मुलाखत इथे वाचता येईल.
https://shorturl.at/MxouV
दिशा बोस यांच्याशी चर्चा
आयर्लंडमध्ये राहणाऱ्या नव्या लेखकांचा तपशील शोधायला गेलात, तर दिशा बोस या तीन आंतरराष्ट्रीय प्रकाशनांनी काढलेल्या आणि गाजलेल्या पुस्तकांच्या तरुण लेखिकेचा तपशील समोर येईल. भारतातील जन्म आणि जडण-घडण असलेल्या दिशा बोस यांची ‘डर्टी लॉण्ड्री’ अमेरिकेच्या खूपविक्या पुस्तकांच्या यादीत बराच काळ होती. या लेखिकेची मुलाखत येथे ऐकता येईल. https://shorturl.at/KtrTf