खासगीकरणाला ब्रिटनमध्ये विरोध होत असताना- म्हणजे १९८६ च्या सुमारास- शीला गौडा लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’मध्ये शिकत होत्या. तिथे जाण्यासाठी त्यांना ‘इन्लॅक्स फाउंडेशन’ची शिष्यवृत्ती मिळाली होती. तेव्हापासून त्यांना भारतात आणि परदेशांतही अनेक पुरस्कार मिळाले, पण अमेरिकेतल्या ‘डिआ सेंटर’तर्फे दिला जाणारा ‘सॅम गिलियम अॅवार्ड’ या सर्वांपेक्षा प्रतिष्ठेचा. ७५ हजार डॉलर (सुमारे ६४ लाख १० हजार रु.) या रकमेचे महत्त्व या पुरस्कारात आहेच, पण २०२३ मध्ये स्थापन झालेला आणि २०२४ पासून प्रत्यक्ष दिला जाऊ लागलेला हा पुरस्कार पहिल्या वर्षी घाना या देशाचे जगप्रसिद्ध चित्रकार इब्राहीम महामा यांना दिला गेला होता आणि यंदाच्या दुसऱ्या वर्षी हा मान शीला गौडा यांना मिळतो आहे. पाश्चात्त्य कलेच्या रूढ पद्धतींपासून फटकून असल्यासारख्या वाटणाऱ्या कलाकृतींही पाश्चात्त्य देशांचे लक्ष वेधून घेत असल्याचा घडता इतिहास या पुरस्कारामुळे पुढे जातो आहे.

शीला गौडा या प्रामुख्याने मांडणशिल्प (इन्स्टॉलेशन) प्रकारात काम करणाऱ्या दृश्यकलावंत. साध्या, भारतात सहज मिळणाऱ्या वस्तूंना आपल्या दृश्यकलेतून संवेदनांच्या पातळीवर पोहोचवणे ही त्यांची खासियत. उदाहरणार्थ- पीळ भरलेले साधे दोरे, त्याला कुंकू लावून लालजर्द केलेले, त्या दोऱ्यांची एखाद्या वस्तीचा नकाशा असावा तशी रचना आणि त्याखाली जळत्या उदबत्त्या… या उदबत्त्यांची धग दोऱ्यांना लागणार आहे, दोरे काळवंडणार आहेत, कदाचित त्यांची राखही होणार आहे… अशा मांडणशिल्पामधून त्यांनी ‘नवऱ्याची वाट पाहात गावी राहिलेल्या स्त्रियांची व्यथा’ दृश्यमान केली होती… या मांडणशिल्पातून ‘दिसत’ होते ते गावातल्या अनेकींचे झुरणे, दिवसरात्र जळत, विझून जाणे. प्रतीकांच्या रूढ अर्थापेक्षाही पुढल्या पातळीवर शीला गौडा यांची मांडणशिल्पे प्रेक्षकाला नेतात. संवेदनांची ही जाण शीला यांच्यामध्ये येण्यासाठी काही प्रमाणात, त्यांचे वडीलही कारणीभूत ठरले. कर्नाटकच्या गावोगावी बदलीची नोकरी करावी लागत असताना त्या-त्या ठिकाणच्या जुन्या वस्तू जमवणारे वडील! आंतरराष्ट्रीय यश मिळाल्यावर शीला यांनी, वडिलांच्या या वस्तूंचे संग्रहालयही म्हैसूर- बेंगळूरु मार्गावर उभारले.

शीला गौडांनी केलेल्या अनेक कलाकृती काळाचा परिणाम स्वत:वर घडू देणाऱ्या आहेत. शेणाच्या गोवऱ्या, जळता ऊद किंवा त्याची राख, लांब केस अशा प्रकारच्या साहित्याचाही वापर त्यांनी अनेकदा केलेला आहे. या मांडणशिल्पांचा एकंदर परिणाम जगण्यातल्या संघर्षाकडे, मानवी आयुष्याच्या गांभीर्याकडे नेणारा असतो.

कर्नाटकच्या शिमोग्यात जन्मलेल्या, तिथेच वाढलेल्या शीला गौडा ‘केन स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिकून १९७९ मध्ये बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाविभागात उच्चशिक्षणासाठी आल्या. तिथे त्यांना ‘इन्लॅक्स’ शिष्यवृत्ती मिळाली. युरोपमध्ये १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात एकंदरीत, सपाट रंगचित्रांपेक्षा निराळ्या आणि त्रिमित कलाकृती घडवण्याचा उत्साह सार्वत्रिक होता, पण के. जी. सुब्रमणियन आणि त्याआधी आर. एम. हडपत यांनी केलेला देशीयतेचा संस्कार न विसरता शीला गौडा यांची वाटचाल झाली. देशीयता जपूनही आंतरराष्ट्रीय यश मिळवता येते, याचा वस्तुपाठ पुढल्या काळात त्यांनी घालून दिला.